दासबोधातील स्वगुण परीक्षानाम तिसºया दशकात समर्थ रामदास स्वामी जन्म दु:खाचे वर्णन करताना पुढे म्हणतात, जन्म म्हणजे विषयांची आवड . विषय शब्दाचा अर्थ. विशेषण सिंचन्ति इंद्रियाणि मन, ज्यांच्या ठिकाणी इंद्रिये व मन बुडून जातात, मग्न होतात असे पदार्थ, म्हणजे इंदियोभोग, अर्थात देहातून सुख घेण्याची स्वाभाविक आवड असते. जन्म ही दुराशेची बेडी आहे. कधी तृप्त न होणाºया आशेच्या साखळीने माणूस जणू काय बांधलेला असतो. जन्म म्हणजे काळाची काकडी असून तो ती खातो. माणूस जितक्या सहजपणे काकडी खातो तितक्या सहजपणे काळ शरीर खाऊन टाकतो.
म्हणून समर्थ म्हणतात, जन्म हाच वाईट काळ असतो. भगवंताचा विसर पडणे हाच जीवाचा वाईट काळ समजावा. जन्म हीच वाईट वेळ असते. देह हेच मुळी सगळ्या दु:खांना आमंत्रण असल्याने ते कोणत्याही वेळी जन्मले तरी दु:ख दिल्याशिवाय राहात नाही. जन्म म्हणजे घाणेरड्या नरकात पडल्यासारखे आहे. आत्मबुद्धी लोपून देहबुद्धीत घसरणे हे स्वर्गातून नरकात पडल्याप्रमाणेच समजावे.
त्यानंतर पुढील अठरा ओव्यांमध्ये श्री समर्थ शरीराच्या जन्माची क्रिया व त्याचा मालमसाला वर्णन करतात. ते वाचून शरीराची किळसच येते. किंबहुना वैद्यकशास्त्र शिकण्यासाठी हे फार महत्त्वाचे वर्णन आहे. हा देह कसा उत्पन्न होतो हे पाहायला गेले तर त्यासारखे दुसरे अमंगल काही नाही असे खात्रीने वाटेल. समर्थ म्हणतात, शरीर म्हणजे अंत, बाहेर घाणीने लडबडलेले, बरबटलेले व नरकाने भरलेले कोठार आहे. शरीर म्हणजे दुर्गंधीने भरलेली मुताची पिशवी आहे. शरीरात जंत व किडे असतात. आतडी म्हणजे अनेक प्रकारच्या घाणीने भरलेली पिशवी आहे. शरीरात गलिच्छ कातडे सगळीकडे लोंबत असते.
सर्व अवयवांमध्ये डोके श्रेष्ठ आहे. त्याला उत्तमांग म्हणतात. पण तेथे नाकातून शेंबूड वाहतो, आणि कान फुटला तर त्यातून येणारा दुर्गंध सहन होत नाही. डोळ्यांतून चिपडे निघतात, नाकांमध्ये मेकडे दाटतात. रोज सकाळी तोंडातून विष्ठेसारखी घाण पडते. ज्या तोंडामध्ये लाळ, थुंकी, इतर घाण आणि पिवळा दाट शेंबूड असतो त्याला कमळाची आणि चंद्राची उपमा देतात. तोंड असे घाणेरडे तर पोटामध्ये विष्ठा भरलेली असते. या गोष्टी प्रत्यक्षच आहेत. त्यांना दुसºया प्रमाणाची गरजच नाही. अति उत्तम अन्न पोटामध्ये घातले तर त्याची काही विष्ठा बनते. कधी कधी ते ओकून पडते तेव्हा त्याकडे बघवत नाही. अगदी गंगेचे पाणी प्यायले तरी त्याचे मूत बनते. सारांश मल, मूत्र आणि ओक यावरच देह जगतो. यांनीच देह वाढतो यात संशय नाही. मल, मूत्र आणि ओक जर पोटात नसतील तर माणसे मरून जातील. राजा असो की रंक असो त्याच्या पोटात विष्ठा असतेच असते. देहातील ही घाण टाकून तो स्वच्छ करण्याचा अट्टाहास केला तर देह मरून जाईल. अशी एकंदर या देहाची व्यवस्था आहे. जोपर्यंत देह धडधाकट आहे तोपर्यंत तो कसा आहे याचे वर्णन करताना आता सांगितलेली गलिच्छ दशा सांगावी लागते. पण ती मनाला खरी वाटत नाही. देह खराच इतका खराब आहे काय, अशी शंका मनात येते.
त्यानंतर पुढील वीस ओव्यांमध्ये आईच्या पोटात जीवाचे कसे व किती हाल होतात याचे सविस्तर वर्णन समर्थ करतात. अशा या देहरूपी तुरुंगात वस्तीला आल्यामुळे जीवाला नऊ महिने फार यातना भोगाव्या लागतात. गर्भाशयामध्ये वायू नसतो त्यामुळे दोन डोळे, दोन कान, नाकाची दोन भोके, तोंड, गुद् आणि उपस्थ अशी देहाची नऊ दारे बंद राहतात. ती आपले कार्य करू शकत नाहीत.
आईच्या पोटातील ओक आणि विष्ठा यांचे पाणी पाझरते. ते जठराग्नीच्या उष्णतेने तापते आणि त्यामुळे गर्भाचे मांस व त्याची हाडे उकडून निघतात. गर्भाला कातडी नसते. तो मांसपिंड खोळीत असतो, पातळ वेष्टनात असतो. तेथे तो हालचाल करू लागतो तोच आईला डोहाळे सुरू होतात. डोहाळ्यामुळे ती कडू व तिखट पदार्थ खाऊ लागते. त्या अन्नाने पोटातील पोराचे अंग होरपळते. गर्भ म्हणजे काय म्हणाल तर चामड्यात गुंडाळलेले गाठोडे असते. त्याच्या आत विष्ठेचे पोतडे असते. गर्भाच्या नाळेमधून, बेंबीच्या नळीमधून त्याला जगण्यास लागणारे रस मिळतात. मल, मूत्र, ओक आणि पित्त या रसांमुळे नाकातोंडातून जंतू बाहेर पडतात. अर्थात त्या गर्भाचा जीव अतिशय घाबरा होतो. अशा कैदखान्यात अतिशय अडचणीत सापडलेला जीव कळवळून देवाला विनवितो की, देवा, आता येथून सुटका कर. देवा येथून सुटका केलीस तर मी स्वत:चे कल्याण करून घेईन. मी गर्भवास चुकवीन. पुन्हा या जागी जन्मास येणार नाही. श्वासोच्छवास कोंडल्यामुळे त्याला फार कष्ट होतात. कासावीस झालेल्या त्या पोराला बाहेर पडण्याचा मार्ग दिसेनासा होतो. अतिशय घाबरलेल्या चित्ताने मूल बाहेर येण्यासाठी धडपड करू लागते. ते भलत्याच जागी अडकते. मूल आडवे झाले, त्याला कापून तुकडे करून काढा, असे लोक म्हणतात. याप्रमाणे शरीराचे लचके तोडले जात असता त्या मुलाचे प्राण जातात. पूर्वपुण्याईने योनीतून सरळ बाहेर येण्याचा मार्ग सापडला तरी त्याचा गळा, खांदा, वगैरे अवयव कुठेतरी अडकतो व तो बाहेर पडू शकत नाही. मग त्या अरुंद मार्गातून पोराला जोराने खेचून बाहेर काढतात. ओढून काढता काढता ते पोर गतप्राण होते. या सर्व खटाटोपात त्या जीवाच्या अंतर्यामी काय चालते त्याचे वर्णन आता सुरू होते. जीवाच्या अंतर्यामीची अवस्था फक्त अतिंद्रियज्ञानी संतच जाणतात. जन्मास येण्याच्या धडपडीत बाळाचे प्राण जात असता अखेरच्या क्षणी त्याला भगवंतांचा विसर पडतो. गर्भात असताना असणारी भगवंतांची आठवण तो विसरून जातो.
गर्भात असताना मूल म्हणते, ‘सोहं सोहं’- म्हणजे मी तो आहे, मी ईश्वर आहे. जीवाला आत्मबुद्धी असते, स्वस्वरूपाची जाणीव असते. बाहेर पडताच ते म्हणू लागते ‘कोहं, कोहं’- म्हणजे मी कोण आहे? मी कोण आहे? जीवाला देहबुद्धी येते, स्वस्वरूपाची जाणीव लोपून जाते. सारांश गर्भवासामध्ये प्राणी अशा पुष्कळ यातना सोसतो. गर्भावस्थेमध्ये तो दु:खाने दडपला गेला होता, मोठ्या कष्टाने एकदाचा बाहेर आला, पण बाहेर आल्याबरोबर लगेच गर्भवासाच्या यातना विसरून गेला. त्याचे मन शून्याकार झाले म्हणजे मनाचे व्यवहार पूर्णपणे थांबले. त्याला पूर्वीचे काही स्मरण उरले नाही. अज्ञानाचे आवरण, झाकण आल्याने ही भ्रांत अवस्था आली. तरी जन्मलेल्या बालकाला त्यामध्ये बरेच वाटते. देह विकार पावू लागला, त्याची वाढ होऊ लागली म्हणजे सुखदु:खाचे हेलकावे असू लागतात. असो अशा रीतीने हे शरीर मायेच्या जाळ्यात सर्व बाजूने अडकलेले आहे, देहबुद्धीने व्यापलेले आहे.
या गर्भवासाच्या यातनांतून सुटका होण्यास भगवंताला शरण जावे असे समर्थ सांगतात. सर्व प्राण्यांना गर्भवासामध्ये अशा प्रकारचे दु:ख सोसावे लागते. म्हणून प्राण्याने भगवंताला शरण जावे. जो भगवंताचा भक्त असतो तो जन्मापासून मुक्त असतो. त्याला पुन्हा जन्म येत नाही. अर्थात त्याला गर्भवासाच्या यातना नाहीत. आत्मज्ञानाच्या जोरावर तो सर्वकाळ विरक्त असतो. कशात गुंतलेला नसतो. याप्रमाणे गर्भवासातील दु:खपरंपरेचे वर्णन मला सुचले तसे मी केले, असे समर्थ इथे सांगतात.
प्रफुल्ल फडके/ बोध दासबोधाचा
No comments:
Post a Comment