Friday, September 18, 2026

दशक तिसरा : समास दुसरा : स्वगुणपरीक्षा अ/१


समर्थ रामदास स्वामींनी दासबोधात स्वगुण परीक्षानाम तिसºया दशकात प्रथम तान्हेपणाचे वर्णन केले आहे. ही सर्व दृश्यरूप सृष्टी दु:खाचे मूळ आहे. अर्थात, माणूस जगात जन्मास आला की तो दृश्य विश्वाचा भाग होतो. मग दु:खाचे निखारे त्याच्या देहाला चटके देतात. मागच्या समासात गर्भवासातील यातनांचे वर्णन सांगितले. जन्म झाल्यानंतर गर्भवासातील यातना मूल विसरते. पुढे दिवसेंदिवस ते वाढू लागते. तान्हेपणी त्वचा अगदी नाजूक असते. जरा काही दु:ख झाले की, ते मूल व्याकूळ होते. पण आपल्याला होणारे सुखदु:ख त्याला शब्दांनी सांगता येत नाही. देहाला काही दु:ख झाले किंवा भूक लागली म्हणजे ते मूल मोठ्याने रडते. परंतु त्याला अंतरी काय दु:ख होत आहे हे काही आईला कळत नाही. आई त्याला जवळ घेते, कुरवाळते. पण हा बाहेरून उपाय होतो. त्याच्या अंतर्यामी काय दु:ख आहे हे काही आईला बरोबर कळत नाही. ते मूल पुन्हा पुन्हा हुंदके देते व रडते. आई त्याला कडेवर घेऊन रडे थांबविण्याचा प्रयत्न करते. पण त्याची पीडा, व्यथा न कळल्याने मूल बिचारे तळमळतच राहते.


अनेक रोगांचा जोर होऊन त्यांच्या दु:खाने त्या पोराचा जीव खालीवर होतो. ते पोर रडते, पडते किंवा कधी विस्तवाने पोळते. आपल्या शरीराचे रक्षण करता येत नाही म्हणून नाना प्रकारचे अपाय त्या मुलाला सोसावे लागतात. खोड्या करताना अपाय होऊन हात, पाय किंवा एखादा अवयव गमविण्याचा प्रसंग येतो.

कालांतराने मूल आईला ओळखू लागते व तिच्याशिवाय त्याला क्षणभर करमत नाही. पण पूर्वपुण्य समोर उभे राहिले आणि असले अपाय चुकले. मग मूल हळूहळू आईला अधिकाधिक ओळखू लागते. क्षणभरसुद्धा आई दिसेनाशी झाली तर मूल दु:खाने रडते व ओरडते. त्या वयामध्ये आईशिवाय दुसरे काहीच त्याला महत्त्वाचे वाटत नाही, आवडत नाही. ते मोठ्या आशेने आईची वाट पाहते, केव्हाही आईपासून दूर राहात नाही. आणि एकदा आईची आठवण झाली की, मग क्षणभरही तिचा वियोग त्याला सहन होत नाही. ब्रह्मादिक देव जरी आले किंवा प्रत्यक्ष लक्ष्मीने प्रेमाने बोलविले तरी आईवाचून दुसरे कोणी त्याची समजूत घालू शकत नाही. आई कुरूप असो, हीन लक्षणी असो अथवा सर्वांपेक्षा दुर्दैवी असो, त्या मुलाला जगात तिच्यासारखे दुसरे कोणी नसते. आई नसेल तर ते पोर केविलवाणे होते व दीन दिसते. आईने रागावून त्याला दूर सारले तरी मोठ्याने रडून ते तिलाच मिठी मारते. आईपाशीच त्या मुलाचे सर्व सुख केंद्रित असते. आईपासून दूर झाले की ते तळमळू लागते. अशा रीतीने त्या काळात आईवर अत्यंत प्रेम जडलेले असते.


यानंतर समर्थ या समासात मातेच्या वियोगाचे दु:ख होते त्याचे वर्णन करतात. ते म्हणतात, अशा अवस्थेत आई मरण पावली. ते मूल पोरके झाले. ‘आई, आई’ असे म्हणत दु:खाने ते झुरणीस लागते. ते आईला शोधते, पण ती काही दिसत नाही. दीनवाणे होऊन ते लोकांकडे बघते. आई येऊन आपल्याला भेटेल अशी आशा त्याच्या मनाला वाटते. आपली आई समजून एखाद्या बाईच्या तोंडाकडे ते पाहते. पण ती आपली आई नाही हे त्याला उमगते. मग ते हिरमुसले होऊन दीन बनते. आईच्या वियोगाने त्याला कष्ट होतात. त्याचे मन दु:खीकष्टी राहते. त्यामुळे त्याचा देहही अतिशय रोडावतो.

पण सुदैवाने आई जगली. मग ते मूल आणखी वाढले की, त्याचे सगळे लक्ष खेळण्याकडे लागते. त्यात अपघात होतात त्यांचे वर्णन समर्थ या समासात पुढे करतात. ते म्हणतात, समजा आई जिवंत राहिली आणि दोघांची भेट झाली. मग दिवसेंदिवस त्या पोराचे बालपणही संपत जाते. बालपण मागे पडले की, दिवसेंदिवस पोर शहाणे होत जाते. मग आईवर जे प्रेम जडलेले असते तितके ते राहात नाही. मग पोराला खेळण्याचा नाद किंवा छंद लागतो. मुलांचा मेळा जमवून खेळ खेळण्यात तो रमतो. त्यामध्ये डाव जिंकला तर आनंद व हरला तर दु:ख असे सुखदु:ख होऊ लागते. आईबाप मनापासून त्याला शिकवतात, पण त्याला ते आवडत नाही. त्याचे त्याला अतिशय वाईट वाटते. पोरांच्या बरोबर खेळायची लागलेली चटक काही केल्या सुटत नाही.


अशा वेळी मुलांमध्ये खेळत असता त्याला आईबापाची मुळीच आठवण होत नाही. परंतु त्या खेळण्यात अचानक दु:ख ओढवते. कुठे दातच पडतात, डोळाच फुटतो, पायच मोडतो व लंगडा होतो. मग मात्र मस्ती जिरते आणि शरीराला व्यंग झाल्याने कुरूपता येते. ताप, देवी, गोवर असले आजार होतात. त्यांतून मोठ्या कष्टाने तो वाचला तर त्याला चोप देऊन देऊन आईबाप शहाणा करतात. पुढे त्या पोराला देवी निघतात, किंवा गोवर येते किंवा डोकेदुखी जडते, किंवा सारखा ताप येतो, किंवा पोटशूळ उठून वायगोळा उठतो. या आजारांचे कारण काय याबद्दल लोक तर्क करू लागतात. कोणी म्हणतो, त्याला भुताने झपाटले आहे; कोणी म्हणतो, पाण्यातील मायराणीने धरले आहे. कोणी म्हणतो, मुज्या, झोटिंग किंवा म्हसोबाची करणी बाधली आहे; कोणी म्हणतो, वेताळ खंकाळ लागला; कोणी म्हणतो, ब्रह्मसमंध संचारला; कोणी म्हणतो, मंतरलेली वस्तू ओलांडली काय, काही कळत नाही.

कोणी म्हणतो, वीरदेव; कोणी म्हणतो, खंडेराव; तर कोणी म्हणतो, हे सगळे खोेटे, त्याला खरा ब्रह्मसमंध लागला आहे. कोणी म्हणतो की मंत्र वापरून त्याच्या अंगात एखादी देवता सोडली आहे; तर कोणी म्हणतो त्याच्या देहाला हे नाना प्रकारचे रोग जडले आहेत. त्यासाठी चांगले वैद्य व मांत्रिक बोलावून औषधपाणी चालू होते. कोणी म्हणतो, हा काही जगत नाही; कोणी म्हणतो, हा काही मरत नाही, कारण पूर्वीचे पाप असल्यामुळे यातनांच्या रूपाने तो भोग भोगीत आहे. माणूस गर्भवासाचे दु:ख जरी विसरला तरी जीवनामध्ये त्रिविधतापांनी पोळला जातोच. एकंदर या संसाराच्या दु:खांनी माणसाला फार यातना सोसाव्या लागतात. या इतक्या सगळ्या भानगडीतून, अडचणीतून माणूस वाचलाच तर विद्या येण्यासाठी त्याचे आईबाप त्याला मार मारून शहाणा करतात. लोकात आपले नाव राखील असा तो चांगला बनतो.


प्रफुल्ल फडके/ बोध दासबोधाचा


No comments: