समर्थ रामदास स्वामींनी दासबोधातील तिसºया दशकातील चौथ्या समासात स्वगुणपरीक्षेचे महत्त्व सांगितले आहे. हा समास जणू लोकसंख्या नियंत्रण, कुटुंब नियोजन या सुधारणेला प्रेरणा देणाराच आहे. लेकुरे उदंड झाली असे म्हणत पुष्कळ मुले झाली, पण घरात साठवून ठेवलेला पैसा संपला. खायला धड मिळेना, मुलांवर भीक मागण्याची पाळी आली. काही कडेवर बसणारी तान्ही, काही रांगणारी, अशी लहान मुले घरात खेळू लागली. मुलामुलींची घरभर नुसती गर्दी होऊन गेली. दिवसेंदिवस खर्च वाढत चालला. पैशांची आवक बंद पडली. मुली लग्नाच्या झाल्या. पण त्यांच्या लग्नासाठी जवळ पैसा उरला नाही. आईबाप पैसा बाळगून होते. त्यांच्यापाशी खूप द्रव्य होते. त्यामुळे त्याला लोकात मान होता, प्रतिष्ठा होती. लोकात वागताना पूर्वीच्या श्रीमंतीचा भ्रम त्याने अजून ठेवला होता. परंतु घरामध्ये पहिली सुबत्ता राहिली नव्हती. घरात दिवसेंदिवस दारिद्र्य येत चालले. अशा रीतीने घरप्रपंच वाढला, खाणारी माणसे वाढली. त्यामुळे त्याला दु:ख आणि काळजी वाटू लागली. मुली उपवर झाल्या, मुलांना मुली सांगून येऊ लागल्या. आता मुलामुलींची लग्ने केली पाहिजेत अशी परिस्थिती आली. जर मुले तशीच लग्नावाचून राहिली तर पुन्हा लोक नावे ठेवणार. लोक म्हणतील की, हे जन्मदरिद्री होते. मग यांनी इतक्या मुलांना जन्म तरी का दिला?
अशी लोकात आपली इज्जत जाईल, आपल्या वडिलांचे नाव जाईल. मग मोठी समस्या पुढे उभी राहते ती ही की, लग्नापुरते कर्ज देणारा कोण भेटेल? मागे ज्याच्याकडून कर्ज घेतले होते ते फेडले नव्हते. असे दु:खाचे आभाळ कोसळले. आपण अन्न खातो खरे, पण तेच आपल्याला खाते, म्हणजे खाल्लेले अन्न अंगी लागेनासे झाले. त्याचे मन रात्रंदिवस चिंतेने ग्रासले. लोकांत त्याची पत उरली नाही. घरातील चीजवस्तू गहाण पडली. तो म्हणू लागला देवा, आता दिवाळे काढण्याची वेळ आली.
मग काही चीजवस्तू मोडली, घरातील जनावरे विकली आणि व्याज देऊन काही रोकड पैसा उभा केला. अशा रीतीने कर्ज काढून लोकांत खोटा मोठेपणा मिरविला. त्याने वडिलांचे नाव राखले असे सर्व जण म्हणाले. पण कर्जाचा भार फार झाल्याने तो दोन वर्षे परदेशी गेला आणि कष्ट करून पैसा घेऊन आला. याप्रमाणे त्याला अतिशय कर्ज झाले. पैसा देणाºयांनी त्याच्या भोवती गराडा घातला. तेव्हा त्याने परदेशी जाण्याचा निश्चय केला. दोन वर्षे तो परदेशात राहिला, त्याने हीन लोकांची नोकरी पत्करली, शरीराने अतिशय हाल काढले. परदेशात त्याने काही पैसा मिळविला, मग घराच्या माणसांकडे जीव ओढ घेऊ लागला. त्याने मालकाची परवानगी काढली आणि घराकडे जाण्यास निघाला.
घरी बायकोमुले त्याची आतुरतेने वाट बघतच होती. तो आल्याने त्यांना आनंद झाला. तो घरी आला तेव्हा घरातील माणसे अतियातना भोगीत असलेली व आतुरतेने वाट पाहात असलेली त्याला दिसली. ती म्हणत होती, देवा, कोणत्या कारणाने त्यांना परत येण्यास इतके दिवस लागले? आता आम्ही काय खावे, उपाशी तरी किती दिवस राहावे! देवा, अशा दरिद्री माणसाच्या संगतीस आम्हाला का ठेवलेस?
अशा रीतीने घरातील माणसे वाट पाहात असता तो एकाएकी त्यांना दिसला. बाबा, तुम्ही थकलात असे म्हणत मुले त्याच्याकडे धावत गेली. त्याला बघून बायकोलाही आनंद झाला. आपली दैना आता संपली असे ती म्हणाली. तेव्हा आपले पैशांचे गाठोडे त्याने तिच्या हाती दिले. घरातील सगळ्यांनाच आनंद झाला. हा आनंद चार दिवसच टिकला. पुढे लगेच कुरबुर सुरू झाली. घरातील माणसे म्हणू लागली की, हा आणलेला पैसा खर्च झाल्यावर आमचे हाल पुन्हा सुरू होतील. म्हणून त्याने जे द्रव्य आणले आहे ते इथेच ठेवावे आणि पुन्हा परदेशास जावे. आम्ही हे खाऊन संपविण्याच्या आत नवीन द्रव्य मिळवून घरी परत यावे.
त्याला धड विश्रांतीसुद्धा मिळाली नाही, लवकरच पुन्हा परदेशी जाण्यास निघावे लागले. प्रपंचातील सारी नाती केवळ सुखापुरती असतात. बायको आपल्यावर अत्यंत प्रेम करते हे खरे; पण तीही आपल्या स्वत:च्या सुखाकडे लक्ष देऊन असते. परदेशात त्याला फार दगदग झाली म्हणून विश्रांती घेण्यासाठी तो घरी आला. पण जरा थोडी विश्रांती घेतो न घेतो तोच पुन्हा जाण्याची पाळी आली. गाठोडे बांधले, सगळ्या मुलाबाळांना एकदा प्रेमाने पाहिले आणि तो मार्गाला लागला. आपल्या प्रारब्धात कुटुंबाशी एवढाच ऋणानुबंध आहे असा मनात विचार आला. त्याचा गळा दाटून आला. गहिवर आवरेना, बापलेकरांची ताटातूट होणार म्हणून त्याला फार दु:ख झाले. जर ऋणानुबंध असेल तर पुन्हा आपली भेट होईल. नाही तर हीच आपली शेवटची भेट समजावी असे बोलून तो घोड्यावर बसला.
कामवासनेच्या बळाने आपण चांगले वागलो नाही हे पटले. प्रपंचात सगळा स्वार्थाचा बाजार आहे हे लक्षात आले. माझे हितकर्ते मित्र मला लबाड वाटू लागले. म्हणून जी प्रापंचिक माणसे आईबापाशी भक्तिभावाने वागतात ती धन्य होत. आपल्या जिवलगांच्या बाबतीत ती आपले मन कठोर करीत नाहीत. या गोष्टी मी पूर्वी ऐकल्या होत्या. पण तारुण्याच्या मस्तीमध्ये त्या कळल्या नाहीत. ज्यांना मी आपले मित्र मानले ते लबाड होते. माझ्यापाशी असणाºया पैशांच्या निमित्ताने ते माझ्याभोवती गोळा झालेले होते. आता काय वाटेल ते करावे परंतु द्रव्य मिळवून नेले पाहिजे. आपण मोकळे (द्रव्य न मेळविता) गेलो तरी तेथे सहजच दु:ख होणार. अशा प्रकारचे विचार त्याच्या मनात येऊ लागले. त्याचा जीव कष्टी झाला आणि तो चिंतेच्या महापुरात बुडून गेला. या विचारांच्या प्रभावाने आपला जन्म प्रपंचापायी फुकट गेला असे त्याला क्षणभर वाटले. पण लगेच ममत्वाचा जोर होऊन मुलेबाळे आठवली आणि तो मोठ्याने गळा काढून रडू लागला. पण तेथे अरण्यात कोण विचारणार! अशा रीतीने त्याच्या मनात त्याला पश्चात्ताप झाला. मुलींची व मुलांची त्याला आठवण झाली आणि अगदी मनापासून वाईट वाटले. आपलीं मुलेबाळे आपल्याला अंतरली असे तो म्हणाला. जे जे दु:ख त्याने पूर्वी भोगले होते त्याचे स्मरण त्याला होऊ लागले. मग मोठा लांब गळा काढून त्याने रडण्यास आरंभ केला. अरण्यात कोणी रडू लागला तर तेथे त्याचे सांत्वन करणारा कोणी भेटत नाही.
प्रफुल्ल फडके/ बोध दासबोधाचा
No comments:
Post a Comment