या समासात समर्थांनी आधिभौतिक तापाचे वर्णन केले आहे. भूतमात्राच्या म्हणजे बाह्य पदार्थांच्या संयोगाने जे सुखदु:ख निर्माण होते, त्या दुसºया तापसंतापाला यथार्थ रीतीने आधिभौतिक असे म्हणतात. सर्व भुतांच्या संयोगाने जे सुखदु:ख उत्पन्न होते, त्याचा ताप होऊन मन दु:खी होते, बेचैन होते त्याला आधिभौतिक असे म्हणतात. आधिभौतिक तापाची लक्षणे अगदी स्वच्छ आणि सोप्या रीतीने वर्णन करून सांगतो. ती समजली की तापत्रय संपूर्णपणे कळतील. ठेचा लागणे, काटे मोडणे, हत्यारांचे घाव लागणे, शरीरात धस म्हणजे लाकडाचा बारीक काट्यासारखा तुकडा शिरणे, सराटे लागणे, अंगाची आग करणारी आग्या वनस्पती अंगास लागणे, अंगाला खाज असणारी खाजकुहिरी एकाएकी अंगास लागणे, गांधील माशी येऊन चावणे, मगरीने ओढून नेणे, एकाएकी पाण्यात बुडणे, पाय घसरून ओढ्याच्या प्रवाहात पडणे, विषारी सर्प, अजगर, मगरी, इतर जलचर प्राणी, अनेक जंगली जनावरे यांच्यापासून दु:ख होणे हा आधिभौतिक ताप.
अनेक प्रकारच्या कू्रर पशूंपासून दु:ख होणे, यातना देणारी अनेक असह्य दु:खे, भिंती व माळवदे किंवा गच्ची अंगावर कोसळणे, कोणाचा शाप बाधणे, कोणाचा जादूटोणा त्रास देणे, अकारण वेड लागणे, कुणीतरी खोटा आळ घेणे, कुणीतरी फास घालणे, दगडाखाली हात सापडणे, पळताना अडखळून पडणे हा आधिभौतिक ताप.
एकाएकी शरीर पडणे, किल्ल्यावरून खाली कोसळणे, झाडावरून पडणे, त्या दु:खाने मोठ्याने रडणे, थंडीने ओठ फुटणे, हात, पाय व टाचा यांना भेगा पडणे, जीभ पोळणे, परावलंबी असल्याने शिव्यांचा मार सोसावा लागणे, अन्नवस्त्राची उणीव असणे, मुलींना सासुरवासापायी गालगुच्चे, चूक झाली की कान पिळला जाणे किंवा डोळ्यांत हिंग घालणे, निरंतर धारेवर धरणे, दुष्ट माणसांनी नाना तºहेची मारहाण करणे, आध्यात्मिक तापात सांगितलेले अनेक रोग होणे व त्यासाठी वैद्य, मांत्रिक बोलावणे हा ताप.
रोग बरा व्हावा म्हणून अतिकडक औषधे जबरदस्तीने पाजणे, निरनिराळ्या वनस्पतींचे रस, काढे व चाटणे घेताना जीव कासावीस होणे, नाना दु:खांचे आघात होणे, शिरा तोडणे, जळवा लावणे हा आधिभौतिक ताप असतो.
कितीतरी रोग आणि त्यांची कितीतरी औषधे आहेत. ते सांगू लागल्यास अमर्याद आहेत. त्यांच्यामुळे यातना होणे, आगीच्या जाळाचे चटके बसल्याने यातना होऊन व्याकूळ होणे, नुकसान झाल्यामुळे विव्हळणे हा त्रासच.
कितीतरी सुंदर मंदिरे, जडजवाहिराचे साठे, सुंदर किमती वस्त्रे, धान्ये, पदार्थ, पशू, घरात साठवलेला पैसा, भांडी, वस्तू, माणसे, शेते, धान्ये, गवताच्या गंजी, धान्याच्या सालपटांचे दिगरे, ऊस, इत्यादी एकाकी जळून जाते, अशी आग आपोआप लागली का कुणी मुद्दाम लावली हे जरी सोडले तरी तिच्यामुळे नुकसान होते व माणसे भाजतात. आग लागून होणारे अपघात पुष्कळच आहेत. पण त्यामुळे माणसाच्या मनाला होणाºया यातना आधिभौतिक ताप होय. क्रूर स्वभावाची बायको मिळणे, मुलगी विधवा होणे, मुलगा मूर्ख असणे, यामुळे मनासारखा संसार नसणे, भूतपिशाच्य लागणे, अंगावरून वारे जाणे, मंत्राचा जप चुकल्याने भ्रम होणे, एखाद्या ब्रह्मसमंध शरीरात शिरून बरीच वर्षे त्रास देणे, शनीची वाईट दशा येणे हाही आधिभौतिक ताप.
इतर ग्रहांची वाईट दशा येणे, काळवार, कालतिथी, चंद्राचे अशुभ योग असणारी काळवेळ, घातनक्षत्र, शिंकेचा अपशकुन, पालीची चुकचुक, पिंगळा, कावळा, होला या पाखरांची अपशकुनी कलकल इत्यादी अपशकुनांनी मनामध्ये काळजीचा काळोख पसरणे, दिवटा म्हणजे रात्री मशालीच्या प्रकाशात भविष्य सांगत फिरणारा व सरवदा म्हणजे भविष्य सांगणारा हे दोघे काही तरी अशुभ भविष्य सांगून गेले, त्याच्या मनाला धक्का लागणे, असे नाना प्रकारचे मार भोगावे लागणे, हे या प्रकारातच मोडते.
टांगणे, चाप लावणे, दोन्ही हात मागे खेचून बांधणे, वेड्या घालणे, झाडाच्या बुंध्यावर नाल्याप्रमाणे वाकायला लावून मार देणे, कोलदांडे घालणे, इकडेतिकडे हलू न देणे, चुन्याचे पाणी, मिठाचे पाणी, मोहरीचे पाणी, गुळाचे पाणी, नाकात किंवा कानात किंवा घशात ओतल्यामुळे यातना होणे, पाण्यात बुचकळणे, हातपाय बांधून हत्तीपुढे टाकणे, जनावराप्रमाणे फटके मारून हाकणे, छळ करणे, उगाच कष्ट देणे, कान, नाक, हात, पाय, जीभ, ओठ तोडून टाकणे, बाणांचा मार देणे, सुळी देणे, डोळे काढणे, वृषण कापणे, बोटांच्या नखांमध्ये सुया टोचणे, पारड्यामध्ये घालणे, कडेलोट करणे, तोफेच्या तोंडी बांधून उडविणे, हा यातील त्रास.
कानात खुंट्या ठोकणे, गुद्द्वारात मेख मारणे, अंगाचे कातडे सोलणे, पोत्यात भरून मारणे, बोटे ठेचून टाकणे, गळ्याला गळ लावणे, तापविलेल्या चिमट्याने वृषण किंवा स्तन दाबणे, उकळते शिसे पाजणे, जालीम विष पाजणे, डोके उडविणे, अंगावर माणसे नाचवून मारणे, अंगावरील कपड्यात कुत्री, वाघ, भुतेखेते, सुसरी, शस्त्रे, विजा यांचा अतिरेक होऊन जीवितांची हानी होणे, अंगातील शिरा तोडणे, जळत्या टेंभ्यांनी चटके देणे व भाजून काढणे, अशा अनेक यातना भोगणे, मनुष्य, द्रव्य, वैभव, मोठेपणा, जनावरे व चीजवस्तू यांची हानी होणे, बाळपणी आई मरणे, तरुणपणी बायको मरणे, म्हातारपणी मुलगा मरणे, दु:ख, दारिद्र्य, कर्ज, परदेशी पळून जाणे, लूट होऊन सर्वस्वी नागवले जाणे, संकटे येणे, अंगावर जड वस्तू पडणे, वाईट अन्न खाण्याचा प्रसंग येणे, कॉलºयाच्या साथीने हजारो माणसे मरणे, युद्धात पराजय होणे, जिवलगांचा मृत्यू होणे, आधीच कठीण काळ असून त्यात दुष्काळ येणे, मनात धाकधूक असून त्यात वेळ वाईट येणे, उद्वेग उत्पन्न होणे, काळजीने जीवाचे हाल होणे हा आधिभौतिक ताप.
घाण्यात किंवा चरक्यात शिरून चाकाखाली सापडणे, निरनिराळ्या प्रकारच्या आगीत पडणे, अनेक शस्त्रांनी अवयव तुटणे, अनेक जंगली जनावरांनी खाऊन टाकणे, अनेक लोकांच्या कैदेत अडकणे, वाईट जागेत राहावे लागल्याने जीव घाबरणे, अनेक प्रकारच्या अपमानाने लाजिरवाणे वाटणे, अनेक प्रकारच्या दु:खाने खंगून जाणे. आतापर्यंत वर्णन केले अशा प्रकारचे दु:खाचे अपार डोंगर आहेत. ते सगळे सांगता येणार नाहीत. पण जे येथे सांगितले आहेत त्यावरून श्रोत्यांनी आधिभौतिक तापाचा विचार समजून घ्यावा.
प्रफुल्ल फडके/ बोध दासबोधाचा
No comments:
Post a Comment