साधारण दहा, अकरा वर्षांपूर्वी अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कूक यांनी दादर मुंबई येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. हिंदू धर्म आणि संस्कृती जगात सुप्रसिद्ध आहे. त्यामुळे अनेक महनीय व्यक्ती अशा ठिकाणी दर्शनाला येत असतात. पण एक लक्षात घेतले पाहिजे की, आपल्या धर्मातील देवतांचे महत्त्व हिंदुंना माहीत नसेल त्याहून अधिक इतरांना माहीत असते. आपले लोक मात्र आपल्याच देवतांची विटंबना करण्यात धन्यता मानतात. देव आहे की नाही? त्याचे सोवळे, त्याच्या परंपरा यावर वाद घालून केवळ दंगा करण्यापलीकडे आणि प्रसिद्धीपलीकडे आपण काहीच करत नाही. पण अन्य धर्मीयांना आणि पाश्चिमात्यांना या देवांचे आकर्षण आहे हे विशेष म्हणावे लागेल.
सुखकर्ता, विघ्नहर्ता आणि बुद्धीची देवता असलेल्या मंगलमूर्तीचे महत्त्व टीम कूक यांना ठाऊक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अॅपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्सही हिंदू संस्कृतीकडे आकर्षित झाले होते. त्यांनी हरिद्वार येथे काही काळ वास्तव्य केले आहे. हिंदू धर्मातील विविध गोष्टींचा विदेशी व्यक्ती केवळ वरवर अभ्यास न करता त्यांच्यातील जिज्ञासू वृत्तीद्वारे हा धर्म नक्की काय आहे हे जाणून घेण्याचा ते प्रयत्न करत असतात. पण आपल्याकडे मात्र भालचंद्र नेमाडेंसारखे तथाकथीत विचारवंत लेखक हिंदू धर्म एक अडगळ नावाची कादंबरी लिहून धर्म, देव आणि प्रथांवर टीका करतात. त्यांना सरकारी पुरस्कार देऊन गौरवले जाते. त्यांना ज्ञानपीठ म्हणून गौरवले जाते. हा सगळा विरोधाभास आहे.
पाश्िचमात्य आणि अन्य धर्मीय लोक भारतीय संस्कृती समजून घेण्यासाठी काही महिने भारतात वास्तव्य करून येथील मंदिरांत जाऊन काय वाटते याची अनुभूती घेत असतात. अनेक पाश्िचमात्य लोक गेल्या काही वर्षांपासून पंढरपूरची वारी करताना दिसतात. म्हणजे त्यांना आपल्या परंपरेचे अप्रूप वाटते, महत्त्व कळले आहे, पण आम्ही मात्र आमच्याच देवधर्मावर टीका करतो, त्या प्रथा मोडतो. शनिच्या चौथºयावर चढतो, देवीच्या गाभाºयात घुसतो तर कधी पाळी आल्यावर पूजा केली तर काय होते? पाळी येणे आम्हाला अभिमानाचे आहे वगैर निरर्थक चर्चांमध्ये वेळ घालवतो. पण पाळी आल्यावर आपल्याकडे समारंभ आणि आनंद करण्याची प्रथा फार पूर्वीपासून आहे. महाराष्ट्रात पूर्वी न्हाण आल्यावर त्या मुलीला ओटी भरून मखरात बसवायची प्रथा होती. पण या पाळीचा नको तो अर्थ काढून धर्मच विटाळायचा प्रकार सुधारणावादी, पुरोगाम्यांनी केला.
वास्तविक व्यापक विचारधारा शिकवणारा असा हा धर्म असल्याने या ठिकाणी संकुचितपणास थारा नाही. अशा या महान धर्मात जन्म होणे हे आपले अहो भाग्यच! भारत ही आध्यात्मिक भूमी असल्याने येथे आल्यावर आपल्या देशापेक्षा पुष्कळ वेगळे वाटते असे अनेक विदेशी नागरिक सांगत असतात. शिकण्याची इच्छा असेल तर मार्ग सापडतोच. निस्वार्थपणे भक्ती करणाºयास त्याचे उचित फळ मिळतेच. नाशिक येथे कुंभमेळा सुरू होईल आणि सध्या उज्जैन (मध्य प्रदेश) येथे जो कुंभमेळा सुरू आहे. त्यातही अनेक विदेशी नागरिक हे सर्व कशासाठी केले जाते, हे अभ्यासपूर्णपणे जाणून घेताना आढळतात. त्याचा आनंद घेतात. अनुभूती घेतात. आम्ही मात्र सैराट सुटलो आहोत आणि आमच्याच प्रथा कशा चुकीच्या आहेत हे अभ्यास न करता बोलत आहोत. पण कुक यांच्यासारख्या अनेकांनी सिद्धिविनायकाचे, भारतातील मंदिरे आणि सण, उत्सव याचे दर्शन घेतल्यानंतर अनेकांचे डोळे उघडण्यास हरकत नाही.
रूढी, परंपरा, प्रथा यामध्ये कालानुरूप बदल करून नव्या पद्धतीने आनंद घेण्यास शिकले पाहिजे. ज्या काळात वीज नव्हती, लाईट नव्हते तेव्हाही घराघरांत गणपती बसत होते. तेव्हा निरांजन, समई, पणत्या यांचा लखलखाट असायचा. दसरा, दिवाळीला लाईटच्या माळा नाहीत तरी पणत्यांची रोषणाई होती. आता विजेचे दिवे आले आहेत. त्या त्या प्रमाणात आधुनिक पद्धतीने रूढी प्रथा सांभाळणे उचित आहे. पण त्या प्रथाच बंद करा म्हणून त्याकडे पुरोगामी म्हणवून घेऊन चुकीच्या नजरेने पाहणे हे फार चुकीचे आहे. पाश्िचमात्यांना, परधर्मीयांना समजले पण आम्हाला हे समजणार नसेल तर आमच्यासारखे कर्मदरिद्री कोणी नाही.
आता यावरून कोणी सिद्धिविनायकालाच का गेले? अंबाबाईला का गेले नाहीत? विठोबाला का गेले नाहीत? असे प्रश्न विचारून अनेकांनी त्यानंतर देवादेवातही भेदभाव करण्याचा अधमपणा केला होता. नशिब तृप्ती देसाई यांनी गणपती सिद्धिविनायक पुरूष आहे, म्हणून कूक यांना त्यांना भेटवले गेले. हा स्त्रियांचा अपमान आहे म्हणून सरकारवर ताशेरे ओढले नाहीत. पण मुंबईतील महत्त्वाचे देवस्थान सिद्धिविनायक असल्याने तेथील दर्शन घेतले. ते कोल्हापुरात आले असते तर अंबाबाईचे दर्शन घेतले असते, पंढरपुरात आले असते तर विठोबाचेच दर्शन घेतले असते हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे मुद्द्याला बगल देऊन आपल्या धर्माला नावे ठेवणे, टिंगल करणे यापेक्षा त्यातील चांगले काय आहे? त्यातून कसे काय आनंद मिळतो याचा अनुभव घ्यावा. आपल्या धर्म संस्कृतीकडे डोळसपणे पाहायला हवे.
No comments:
Post a Comment