या अग्रलेखाच्या मथळ्यात असलेल्या कुत्र्यांसाठी शौचालये कोणी बांधणार का? या प्रश्नावरून कोणाला हसू येईल कदाचित, पण आमचा हा अत्यंत प्रामाणिक आणि भाबडा प्रश्न तमाम नागरिकांना आहे. बारा वर्षांपूवी २ आॅक्टोबर २०१४ पासून स्वच्छ भारत अभियान सुरू झाल्यामुळे हा प्रश्न संपूर्ण भारतालाही करायला हवा आहे. राजकारण्यांकडून या प्रश्नाच्या उत्तराची अपेक्षाच नाही. पण सामान्य माणूस, सेवाभावी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवक यांच्यापैकी कोणी या प्रश्नाचे उत्तर देऊ शकेल काय?
हो, कुत्र्यांसाठी शौचालये कोणी बांधणार का? म्हणजे आम्ही ‘स्वच्छ भारत’ची मोहीम सुरू करायची. त्यासाठी रस्त्याच्या कडेला असणारे माणसांचे ढीग बंद करायचे आणि कुत्र्यांनी त्या ठिकाणी टेर घालून ठेवायचे. माणसांचा नियम कुत्र्यांना असायला काय हरकत आहे? अर्थात, ही कुत्री म्हणजे आम्ही भटकी, रस्त्यावरची उनाड कुत्री म्हणत नाही, तर पाळीव कुत्री. पाळीव कुत्र्यांबाबत आमचा हा प्रश्न आहे.
म्हणजे सकाळच्या वेळी, पहाटे आमचे राहणीमान खूप उच्च दर्जाचे आहे, हे दाखवण्यासाठी आपल्यापेक्षा दुप्पट वजनाचे कुत्रे साखळीला बांधून फिरायला अनेक जण घेऊन जातात. त्या पोसलेल्या कुत्र्यांनी खरोखरच ताकद लावली तर त्या मालकाला तो फरपटत नेऊ शकेल इतकी दणकट ती कुत्री असतात. पण ती बिचारी प्रामाणिक असल्यामुळे मालकाच्या ताब्यात स्वत:ला सोपवतात आणि त्याच्याबरोबर फिरायला बाहेर पडतात. खाल्ल्या अन्नाला जागणे म्हणजे काय, ते या कुत्र्यांमुळे समजेल. पण दुसºया दिवशी काय हो? या खाल्ल्या अन्नाचा निचरा करण्यासाठी मालकाला रस्त्याच्या कडेला उभे राहावे लागते. आमच्या घरी शौचालये असल्यामुळे आमच्या घरातील सगळी शौचालयात जातात, पण आमची हौस भागवण्यासाठी आम्ही कुत्र्यांना रस्त्याच्या कडेला बसवतो का? म्हणजे हाही भाबडाच प्रश्न बरे का..
म्हणजे स्वच्छतेसाठी आम्ही विद्या बालनला घेऊन जाहिरात करतो. ‘असा तर आम्ही कधी विचारच केलेला नव्हता’, म्हणून वदवून घेतो. पण आता असाही विचार केला पाहिजे की, कुत्र्यांसाठी शौचालये कोणी बांधणार का? माणसांनी घाण करायची नाही. पण माणसाळलेल्या प्राण्यांची घाण कोणी काढायची?
सकाळी सकाळी अशी कुत्री फिरायला घेऊन जाणारे आणि त्यांचा प्रातर्विधी उरकण्यासाठी बाहेर पडणारे नागरिक सर्वत्र पाहायला मिळतात. ती कुत्री... म्हणजे त्यांना कुत्रा म्हटलेले त्यांच्या मालकांना चालत नाही. कारण त्याला नाव असते. मग अशा टॉमी, बॉबी, टायगर, मोती अशा कुत्र्यांना घेऊन त्यांचे मालक पहाटे बाहेर पडतात. त्या कुत्र्यांना दट्ट्या येईपर्यंत ती कुत्री भुईचा वास घेत राहतात. म्हणजे माणसांनी कुठली घाण केलेली नाही ना, हे पाहणार आणि स्वच्छ अशी जागा हुडकून पुढचे पाय ताठ करून मागच्या बाजूने शेपूट वर करून आपल्या मालकाच्या खाल्ल्या अन्नाला जागण्याची भूमिका इथे पूर्ण करणार. तोपर्यंत एका हातात साखळी पकडलेले मालक मोबाइलवर बोलत असतात किंवा वर्तमानपत्र वाचत या देशात किती घाणेरडे लोक राहतात, देश कसा अस्वच्छ करतात, अमेरिकेत असे नाही, असली काहीतरी चर्चा करतात.
बरोबरच आहे ते. अमेरिकेत असे नाहीच. इथे आम्ही देश स्वच्छ करण्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती करतो, त्यावर खर्च करतो, कारण इथल्या नागरिकांना मोकळा श्वास घेता आला पाहिजे. पण स्वत:च घाण करायची आणि त्याबाबत अनभिज्ञ असणारे नागरिक या देशात किती आहेत? अमेरिकेत शिस्त लावली म्हणून लोक स्वच्छ वागत नाहीत. स्वच्छता असली पाहिजे हे आपल्या मनात असले पाहिजे. पण आपले दार स्वच्छ आणि दुसºयाच्या दारात जाऊन घाण करायची हा राजकारणाचा भाग आहे. हे राजकारण सामान्य, प्रतिष्ठित, सुशिक्षित म्हणवून घेणारे लोकही करतात याचे आश्चर्य वाटते.
केवळ मुंबईतच नाही, तर सगळीकडे सकाळच्या वेळी हे दृष्य दिसते. अशी कुत्री फिरायला नेणारे अनेक नेते, कार्यकर्तेही असतात. त्यांची ही जबाबदारी नाही काय? मग आता निवडणूक आयोगाने नवा कायदा केला पाहिजे, कायद्यात सुधारणा केली पाहिजे. ग्रामीण भागात शौचालये नसतील तर ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला उभे राहता येत नाही. त्यासाठी खोटे खोटे का होईना निदान छप्पर उभे करून, त्या शौचालयाचा वापर होत नसला तरी आपल्याकडे आहे हे दाखवण्याचा खटाटोप होतो. पण त्यामुळे निदान शौचालये उभी राहतात. शहरी भागात शौचालये भरपूर असली तरी कुत्र्यांसाठी शौचालये कुठे आहेत? म्हणून पालिकेच्या निवडणुकीला उभे राहण्यापूर्वी प्रतिज्ञापत्रात माझ्याकडे कुत्रा आहे की नाही? त्या कुत्र्यासाठी शौचाची व्यवस्था काय केली आहे, याचा तपशील घ्यावा. ज्याच्याकडे कुत्र्यासाठी शौचालय नाही त्याला नगरपालिकेची निवडणूक लढवता येणार नाही असे जाहीर करावे. अर्थात, त्यामुळे उघड्यावर शौचास बसणारी कुत्री बंद होण्यासाठी प्रयत्न होणार नाही, तर निवडणूक लढवण्यासाठी आमच्याकडे कुत्रा नाही अशा पाट्या कार्यकर्ते आपल्या दारावर लावतील तो भाग वेगळा. पण मग प्रश्न राहतोच की, कुत्र्यांसाठी शौचालये कोणी बांधणार का?
No comments:
Post a Comment