एकविसाव्या शतकातील जागतिकीकृत आणि तंत्रज्ञान-चालित जगात, ज्याला आधुनिक सभ्यतेचे अदृश्य हृदय म्हणता येईल, ती म्हणजे अतिसूक्ष्म सेमीकंडक्टर चिप. ज्याप्रमाणे विसाव्या शतकात कच्च्या तेलाच्या उपलब्धतेने आणि नियंत्रणाने जागतिक भू-राजकीय आणि आर्थिक घडामोडींना आकार दिला, त्याचप्रमाणे आजच्या डिजिटल आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित जगात सेमीकंडक्टर चिप्स जागतिक सत्तेचे नवीन केंद्र बनले आहेत. स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांपासून ते आॅटोमोबाइल, संरक्षण प्रणाली, एरोस्पेस, वैद्यकीय उपकरणे, दळणवळण आणि प्रगत सुपरकम्प्युटिंगपर्यंत, आधुनिक जीवनातील असे क्वचितच एखादे क्षेत्र असेल जे या लहान सिलिकॉन चिप्सवर अवलंबून नाही. या महत्त्वपूर्ण टप्प्यावर, भारताने केवळ एक ग्राहक राष्ट्र न राहता, सेमीकंडक्टर उत्पादनाच्या जागतिक नकाशावर स्वत:ला स्थापित करण्याचा निर्धार केला आहे. हा उपक्रम ‘सेमिकॉन इंडिया’ म्हणून ओळखला जातो.
देशाला सेमीकंडक्टर उत्पादनाचे एक मजबूत जागतिक केंद्र बनवण्यासाठी भारत सरकारने १०० दशलक्ष डॉलर्सच्या प्रारंभिक आर्थिक गुंतवणुकीसह ‘राष्ट्रीय सेमीकंडक्टर मिशन’ आणि ‘सेमिकॉन इंडिया’ कार्यक्रमाचा पाया घातला आहे. ‘सेमिकॉन इंडिया २०२६’ या जागतिक सेमीकंडक्टर परिषदेच्या व्यासपीठावरून पंतप्रधान मोदींनी केलेल्या भाषणाने भारताच्या परिवर्तनवादी निर्धाराला जागतिक विश्वासार्हता प्राप्त झाली. सेमीकंडक्टर उत्पादन प्रक्रिया ढोबळमानाने तीन टप्प्यांमध्ये विभागली जाते. डिझाइन, फॅब्रिकेशन आणि असेम्ब्ली व पॅकेजिंग. या तिन्ही टप्प्यांना समांतरपणे मजबूत करणे ही भारताची धोरणात्मक योजना आहे. भारताकडे आधीपासूनच चिप डिझाइन करण्याची क्षमता आहे. जगातील जवळपास सर्व आघाडीच्या चिप डिझाइन कंपन्यांची मोठी संशोधन आणि विकास केंद्रे भारतात आहेत. सेमीकॉन इंडिया अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या ‘डिझाइन-लिंक्ड इन्सेंटिव्ह’ योजनेचा उद्देश भारतीय स्टार्टअप्स आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना त्यांची बौद्धिक संपदा विकसित करण्यासाठी आणि देशांतर्गत स्वदेशी चिप्स डिझाइन करण्यासाठी आर्थिक आणि तांत्रिक संसाधने प्रदान करणे हा आहे.
जेव्हा भारतीय अभियंत्यांद्वारे भारतात चिप्स डिझाइन केल्या जातील आणि देशांतर्गत कारखान्यांमध्ये त्यांचे उत्पादन केले जाईल, तेव्हा तांत्रिक आत्मनिर्भरतेचे स्वप्न खºया अर्थाने साकार होईल. फॅब्रिकेशन आणि असेम्ब्लीमधील भारताची जलद प्रगती आधुनिक औद्योगिक इतिहासात अभूतपूर्व आहे. असेम्ब्ली, चाचणी आणि पॅकेजिंग युनिट्स हे सेमीकंडक्टर मूल्य साखळीचा एक महत्त्वाचा भाग आहेत. या युनिट्सच्या स्थापनेमुळे भारताला जलद यश मिळत आहे, देशाची औद्योगिक पायाभूत संरचना तयार होत आहे आणि हजारो उच्च कुशल रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. त्याचबरोबर अत्याधुनिक सिलिकॉन वेफर फॅब्रिकेशन प्लांट्सच्या स्थापनेमुळे प्रगत नॅनोमीटर-स्केल चिप्स तयार करण्याची क्षमता असलेल्या देशांच्या निवडक गटात भारताला स्थान मिळत आहे.
सेमीकंडक्टर उद्योग हा जगातील सर्वात आव्हानात्मक आणि अनिश्चित उद्योगांपैकी एक मानला जातो. जे तंत्रज्ञान आज अत्याधुनिक आहे, ते पाच वर्षांत कालबाह्य आणि अप्रस्तूत होऊ शकते. त्यामुळे भारताने केवळ आॅटोमोबाइल्स आणि ऊर्जा उपकरणांमध्ये वापरल्या जाणाºया २८ नॅनोमीटर, ४० नॅनोमीटर किंवा त्याहून अधिकच्या पारंपरिक चिप्ससारख्या सध्याच्या तंत्रज्ञानावरच लक्ष केंद्रित करू नये, तर २ नॅनोमीटरवर आधारित कम्पाऊंड सेमीकंडक्टर्स, गॅलियम नायट्राइड, सिलिकॉन कार्बाइड आणि सिलिकॉन फोटोनिक्स यांसारख्या पुढच्या पिढीच्या तंत्रज्ञानातील संशोधन आणि विकासालाही गती दिली पाहिजे. यासाठी सातत्यपूर्ण आर्थिक गुंतवणूक, दीर्घकालीन धोरणात्मक सातत्य आणि खासगी उद्योगासोबत अढळ सहकार्याची आवश्यकता आहे. आणखी एक मोठे आव्हान पर्यावरण आणि पायाभूत सुविधांशी संबंधित आहे. सेमीकंडक्टर उत्पादनामध्ये प्रचंड प्रमाणात वीज आणि पाण्याचा वापर होतो. वीजपुरवठा खंडित झाल्यास किंवा पाण्यातील अगदी लहानशा अशुद्धतेमुळेही एका क्षणात अब्जावधी रुपयांच्या सिलिकॉन वेफर्सचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे भारताने आपल्या सेमीकंडक्टर पार्क्समध्ये अखंड, जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि शून्य-दोष गुणवत्ता सुनिश्चित केली पाहिजे. याव्यतिरिक्त, भारताने हरित ऊर्जा आणि जल पुनर्वापर यांसारख्या शाश्वत तंत्रज्ञानाचा अवलंब केला पाहिजे, जेणेकरून या औद्योगिक प्रगतीचा पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम होणार नाही.
सेमीकंडक्टर इंडियाचे ध्येय केवळ पारंपरिक सिलिकॉन-आधारित चिप्सपुरते मर्यादित नाही. क्वांटम कम्प्युटिंग, फोटोनिक्स, आॅप्टोइलेक्ट्रॉनिक्स आणि एआय यांसारख्या भविष्यकालीन तंत्रज्ञानासाठी विशेषत: डिझाइन केलेल्या चिप्सच्या क्षेत्रातही भारत आपले स्थान प्रस्थापित करू पाहत आहे. जग जसे 6 G कम्युनिकेशन, स्वायत्त वाहने, स्मार्ट ग्रिड्स आणि रोबोटिक्सकडे वाटचाल करत आहे, तशी अत्यंत कार्यक्षम आणि कमी-ऊर्जा वापरणाºया चिप्सची मागणी झपाट्याने वाढेल. जर भारताने या उदयोन्मुख तंत्रज्ञानामध्ये वेळेत आपले नेतृत्व स्थान प्रस्थापित केले, तर तो पुढील औद्योगिक क्रांतीचे नेतृत्व करणाºया प्रमुख देशांपैकी एक असेल.
ही गोष्ट नक्कीच भारतासाठी अभिमानाची असेल. हे आव्हान आपण पेलू शकतो हे जगाला दाखवण्यासाठी भारत आता सज्ज झालेला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची उज्ज्वल होत असलेली प्रतिमा आणि विविध देश भारतात गुंतवणुकीसाठी पुढे येत आहेत. त्यामुळे लवकरच भारत स्वबळावर मोठा होताना दिसणार आहे. नव्या पिढीला यातून संधी निर्माण होतील, त्याचा लाभ घेता आला पाहिजे.
No comments:
Post a Comment