Wednesday, September 30, 2026

भारताने अमेरिकेच्या बाजारपेठेला पर्याय शोधावेत


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मंजुरी दिल्यानंतर लिंडसे ओ. ग्रॅहम रशियावरील निर्बंध कायदा २०२६ हा कायदा बनला आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीचे भारताच्या आर्थिक हितांवर गंभीर परिणाम होऊ शकतात. सर्वात चिंतेची बाब म्हणजे या कायद्यातील ती तरतूद, ज्यानुसार कायदा लागू झाल्यानंतरही रशियाकडून कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूची आयात सुरू ठेवणाºया पहिल्या पाच देशांवर अमेरिका १०० टक्क्यांपर्यंत आयात शुल्क वाढवू शकते.


अलीकडेच, जागतिक अनिश्चिततेच्या काळात कच्च्या तेलावरील आयातीचा खर्च कमी करण्यासाठी आणि सामरिक फायदा मिळवण्यासाठी भारताने आपल्या ऊर्जा पुरवठ्याच्या स्रोतांमध्ये विविधता आणण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे रशियाकडून होणाºया कच्च्या तेलाच्या आयातीत लक्षणीय वाढ झाली आहे. रशिया-युक्रेन संघर्षापूर्वी भारताच्या एकूण कच्च्या तेलाच्या आयातीत रशियन कच्च्या तेलाचा वाटा केवळ दोन टक्के होता, पण आता तो ५० टक्क्यांपर्यंत वाढला आहे. रशियाकडून होणारी कच्च्या तेलाची आयात जानेवारीतील ४.५४ दशलक्ष मेट्रिक टन (एमएमटी)वरून या वर्षी मे महिन्यात ८.९६ दशलक्ष मेट्रिक टनपर्यंत वाढली. पुरवठा सुरक्षित करण्यासाठी विविधीकरणाचे हे धोरण प्रभावी ठरले असले तरी, त्याचे राजनैतिक परिणामही आहेत, विशेषत: अमेरिकेसोबतची परिस्थिती संतुलित करण्याच्या बाबतीत, कारण अमेरिका या आयातीचा खंदा समर्थक नाही.

अमेरिका आधीच भारतासह ६० देशांवर सक्तीच्या मजुरीशी संबंधित आयात शुल्क लादते, ज्यामुळे विद्यमान अमेरिकन आयात शुल्कात १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. जर रशिया निर्बंध कायदा लागू झाला आणि भारताने रशियाकडून कच्चे तेल आणि वायूची आयात सुरू ठेवली, तर भारताला ११० टक्के अतिरिक्त शुल्काचा सामना करावा लागेल, ज्यामुळे तो सर्वाधिक शुल्क आकारणाºया देशांपैकी एक बनेल. चीनवरील अमेरिकेचे शुल्कदेखील ११२.५ टक्क्यांपर्यंत वाढेल, कारण तो देशही रशियन तेलाचा एक प्रमुख आयातदार आहे.


अमेरिका हे भारताच्या प्रमुख निर्यात स्थळांपैकी एक आहे. अवाजवी शुल्कांमुळे भारत अमेरिकेत आपली स्पर्धात्मकता गमावू शकतो, ज्यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते. भारतासमोर एक आर्थिक पेचप्रसंग आहे. एकतर आपल्या ऊर्जेच्या गरजांसाठी रशियाकडून आयात सुरू ठेवून अमेरिकेच्या शुल्काचा सामना करणे किंवा अमेरिकेसारख्या प्रमुख निर्यात बाजारपेठेत प्रवेश कायम ठेवून ऊर्जा आघाडीवर अनिश्चिततेचा सामना करणे.

२०२५ मध्ये भारताची केवळ अमेरिकेला होणारी एकूण निर्यात ही एकूण निर्यातीच्या २० टक्के होती, ज्यात प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक उपकरणे, औषधे, हिरे आणि दागिने आणि सागरी उत्पादने यांचा समावेश होता, जी अमेरिकेच्या एकूण निर्यातीच्या ४५ टक्के आहे. शुल्क लागू झाल्यास या वस्तूंच्या निर्यातीवर लक्षणीय परिणाम होईल. निर्यातीत घट झाल्यामुळे भारतातील उत्पादन कमी होईल, ज्यामुळे भांडवल आणि श्रमिकांचे वेतन कमी होईल आणि अनेक लहान व्यवसाय बंद पडू शकतात.


दुसरीकडे, आखाती देशांमधील सध्याच्या अशांततेमुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात घट झाली आहे, ज्यामुळे आयातीच्या किमती वाढल्या आहेत. जर रशियाकडून होणारी तेल आणि वायूची आयात कमी झाली, तर भारताला जागतिक बाजारात जास्त किंमत मोजावी लागेल, ज्याचा थेट परिणाम त्याच्या परकीय चलन साठ्यावर आणि व्यापार तुटीवर होईल. हे वाढत्या महागाईचे कारणही ठरू शकते. असे दिसते की, अमेरिका सध्याच्या व्यापार वाटाघाटींमध्ये भारतावर दबाव आणण्यासाठी ‘रशिया निर्बंध कायद्या’चा एक साधन म्हणून वापर करू इच्छिते, जेणेकरून त्यांना भारताच्या देशांतर्गत बाजारपेठेत सहज प्रवेश मिळू शकेल. भारताने कोणत्याही दबावाला बळी न पडता आपले व्यापारी हितसंबंध आणि धोरणे निश्चित केली पाहिजेत. फेब्रुवारीमध्ये झालेल्या द्विपक्षीय करारानुसार, अमेरिकेने भारतावर १८% आयात शुल्क लावण्यास सहमती दर्शवली आहे. असे करून अमेरिका स्वत:च्याच कराराचे उल्लंघन करत आहे. या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी भारत अनेक उपाययोजना करू शकतो.

भारताने अमेरिकेच्या पलीकडे जाऊन पर्यायी बाजारपेठांमध्ये आपली उपस्थिती वाढवली पाहिजे. भारताने आपल्या निर्यातीसाठी अशा नवीन बाजारपेठा शोधल्या पाहिजेत, जिथे भारतीय मालाला मागणी आहे. या संदर्भात मुक्त व्यापार करार हे एक चांगले धोरण आहे. भारत-युरोपियन युनियन व्यापार करार उपयुक्त ठरू शकतो. त्याचप्रमाणे भारत-युनायटेड किंगडम, भारत-आॅस्ट्रेलिया आणि भारत-न्यूझीलंड करार देखील भारतीय निर्यातीसाठी मार्ग उपलब्ध करून देतील. तथापि, निर्यातीमध्ये विविधता आणणे हा काही रामबाण उपाय नाही.


हे यावर अवलंबून आहे की, इतर बाजारपेठा भारताची अतिरिक्त आयात कितपत सामावून घेऊ शकतात. जर बाह्य मागणी अपुरी असेल, तर विविधीकरण मर्यादित राहू शकते. भारताने आयात कर दरांमध्ये सुधारणा करून ते कमी करण्यावरही लक्ष केंद्रित केले पाहिजे. स्वस्त आयात केलेल्या वस्तूंमुळे ग्राहकांची मागणी आणि व्यापार स्पर्धात्मकता या दोन्हींमध्ये सुधारणा होऊ शकते. यासोबतच व्यापार सुलभ करणे, गैर-शुल्क अडथळे दूर करणे, वाहतूक व्यवस्था आणि मानकांमध्ये सुधारणा करणे आणि मालाची गुणवत्ता वाढवणे यांसारख्या सातत्यपूर्ण देशांतर्गत सुधारणांची जोड दिली पाहिजे. अशा धोरणामुळे केवळ भविष्यातील भू-राजकीय धक्क्यांना तोंड देण्याची भारताची क्षमताच वाढणार नाही, तर दीर्घकाळात त्याची निर्यात स्पर्धात्मकताही मजबूत होईल.

दशक पाचवा : मंत्रांचा : समास दुसरा : गुरुलक्षण (१)


बºयाच वेळा गुरू आणि सद्गुरू यातील फरक आपल्याला माहिती नसतो. दासबोधाच्या पाचव्या दशकातील दुसºया समासात गुरुलक्षणाचे वर्णन समर्थ रामदास स्वामींनी केलेले आहे. समासाच्या आरंभी गुरू आणि सद्गुरू असा फरक करून गुरू सद्गुरू होऊ शकत नाहीत हे समर्थ सांगतात.


काही माणसे मोठ्या विलक्षण क्रिया करून दाखवितात. त्यांनाही गुरू म्हणतात. परंतु मोक्ष देणारे सद्गुरू ते नव्हेत. माणसांच्या समूहाची नजरबंदी करणे, चेटूक करून भुरळ पाडणे, साबरमंत्र व कोटाळे हे नाथपंथीयांचे मंत्रप्रयोग करून चमत्कार करणे, अशक्य वाटणा‍ºया गोष्टी शक्य करून दाखविणे, अनेक वनस्पतींचा व रसायनांचा औषधीप्रयोग सांगणे, इतर धातूंचे सोने बनविण्याचा मार्ग सांगणे, नजरबंदी करून ताबडतोब इच्छा पुरविण्याचा मार्ग सांगणारे असे लोकही गुरू समजले जातात. श्री समर्थांनी येथे भारतीय समाजाच्या मोठ्या दुखण्यावर किंवा रोगावर बरोबर बोट ठेवले आहे. थोडक्यात, अंधश्रद्धेवर त्यांनी प्रहार केलेला आहे. जो आत्मज्ञानी असतो आणि ते ज्ञान आपल्याला देतो तो खरा गुरू, शिवाय भारतामध्ये एवढे थोर ज्ञानी महात्मे होऊन गेले तरी सामान्य माणूस अजून जो वरील चमत्कार करतो त्यालाच साधू किंवा ज्ञानी समजतो. भारतीय समाजातील हा गैरसमज मोठा शापच आहे.

साहित्य, संगीत, रागज्ञान, गायन, नृत्य, तानापलते, अनेक वाद्ये यांचे शिक्षण देणारे लोक एक प्रकारचे गुरूच समजले जातात. काही मंत्रशास्त्री मंत्रविद्या शिकवितात, ताईत, गंडेदोरे देण्याचे शिकवितात, काही लोक पोट भरण्याची विद्या शिकवितात. ज्या जातीचा जो व्यापार असतो तो त्या जातीतील माणसांना पोट भरण्यासाठी शिकवितात. तो व्यापार शिकविणारे गुरू खरे, पण सद्गुरू नव्हेत. आपले आईबाप एका दृष्टीने आपले गुरूच असतात. पण संसारातून पैलतीराला पोहोचविणारा सद्गुरू निराळाच असतो. आपल्याला गायत्री मंत्र शिकविणारा भटजी हा एक गुरूच होतो. परंतु आत्मज्ञानावाचून संसाराच्या पैलतीराला जाता येत नाही. ते काही तो देत नाही म्हणून तो सद्गुरू नव्हे.


यानंतर समर्थ रामदास स्वामी श्री सद्गुरूची लक्षणे सांगतात. शिष्यांचे अज्ञान नाहीसे करून त्याला ब्रह्मपदी बसविण्याचे सामर्थ्य ज्याच्यापाशी असते तो खरा सद्गुरू होय. बाकीची सारी लक्षणे या मूलभूत लक्षणांतून प्रकट होतात. जो ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतो, अज्ञानाचा अंधार नाहीसा करतो आणि जीवात्म्याचे परमात्म्याशी ऐक्य घडवून आणतो तो सद्गुरू असतो. हे सद्गुरूचे प्रधान लक्षण आहे. हे एक लक्षण असून इतर काही करामती नसतील तरी तो सद्गुरू राहतो. हे एकच लक्षण नसून इतर सा‍ºया करामती असतील तरी तो सद्गुरू राहात नाही.

देव आणि भक्त यांचा वियोग झालेला असतो. त्यामुळे एकीकडे जीव आणि दुसरीकडे शिव असे द्वैत निर्माण होते. तो वियोग आणि ते द्वैत नाहीसे करून देव आणि भक्त यांची गाठ घालून दोघाचे ऐक्य करून देतो तो सद्गुरू समजावा. भवरूपी वाघाने उडी घालून, गायवासराची ताटातूट केलेली पाहून ज्याला दया येते आणि जो त्यांना त्या वाघाच्या जबड्यातून सोडवितो तो सद्गुरू असतो. हा दृष्टांत फार अर्थपूर्ण आहे. गाय म्हणजे ईश्वर, वासरू म्हणजे जीव, वाघ म्हणजे अशाश्वत संसार. वास्तविक जीव निरंतर ईश्वरापाशी असावयास पाहिजे. पण मायेचा किंवा अविद्येचा आघात झाल्याने तो अशाश्वताच्या पसा‍ºयात गुरफटून जातो. अविद्येच्या तडाख्यातून सोडविणारा जर कोणी असेल तर तो सद्गुरूच असतो. जीव मायेच्या जाळ्यात अडकतात. त्या कारणाने प्रपंचातील दु:खाने दुखविले जातात, गांजून जातात. अशा दु:खी जीवांना जो मायेच्या जाळ्यातून सोडवितो तो सद्गुरू असतो. देहबुद्धीने व्यापल्यामुळे जीव ममत्व ठेवून अनेक ठिकाणी गुंतून जातो. त्यात जो अनेक दु:खे भोगतो, पण त्याचे त्याला त्यातून बाहेर पडता येत नाही. तेथे सद्गुरू मदतीला येतो. वासनारूपी नदीला महापूर आलेला असता जीव त्यामध्ये गटांगळ्या खात बुडण्याच्या बेतात येतो. अगदी दीनपणे तो मदत मागतो. त्यावेळी तेथे उडी घालून जो तारतो, बाहेर काढून वाचवितो तो सद्गुरू समजावा. या जगामध्ये राजा असो की रंक असो, प्रत्येक जण सारखे हवेपणाने वस्तूच्या मागे धावतो. जणू काय वासनेच्या प्रवाहामध्ये तो ढकलला जात असतो. वासना कधीच थांबत नाहीत, पण माणूस मात्र पाहता पाहता मृत्यूच्या छायेत सापडतो. म्हणून जबरदस्त अशा वासनेच्या पकडीतून जीवाला सोडवितो तो सद्गुरू असतो. वासनेच्या बंधनाची बेडी पडल्यामुळे जीवाला गर्भवासाचे मोठे दु:ख भोगावे लागते. आत्मज्ञान देऊन ती बेडी जो चटकन सोडवितो तो सद्गुरूसमजावा. अविद्येमुळे वासना निर्माण होते व वासनेमुळे कर्माचे कठीण बंधन जीवाला अडकवून ठेवते. कर्म भोगण्यासाठी त्याला जन्म घ्यावा लागतो. त्या मूळ अविद्येलाच ज्ञानाने नाहीशी करून पुढची दु:खपरंपरा टाळण्याचे मोठे काम सद्गुरू करतो.


समर्थ या समासात पुढे सांगतात की, अज्ञान नाहीसे करून आत्मज्ञान पदरात टाकण्याचे कार्य सद्गुरू कोणत्या रीतीने किंवा पद्धतीने करतात त्याचे वर्णन आता ऐकावे. समर्थ म्हणतात, उपदेश शब्दानेच करावा लागतो. पण अर्थ हे शब्दाचे अंतरंग असते. सद्गुरू प्रथम शब्दावरून अर्थाकडे नेतात, परमात्मा त्या अर्थाचा लक्ष्य असतो. तेच आपले सर्वस्व म्हणजे आत्मस्वरूप आहे. सद्गुरू नंतर अर्थावरून आत्मस्वरूपाकडे नेतात. अशा रीतीने स्वस्वरूपाकडे नेणारे सद्गुरू अनाथ जीवाचे विश्रांतिस्थान असतात. जीव बिचारा एकदेशी असतो. एकदेशी म्हणजे एकांगी, अपूर्ण, देश, काल परिस्थिती यांनी वेढलेला. तो परिच्छिन्न असतो, सीमित असतो. ब्रह्म सर्वदेशी, सर्वांगी, पूर्ण, स्थळ, काळ, परिस्थिती यांच्या पलीकडे व अपरिच्छिन्न असते. केवळ आपल्या उपदेशाने सद्गुरू जीवाला प्रत्यक्ष ब्रह्मस्वरूप बनवितो. त्याचे संसाराचे संकट नाहीसे करतो. सद्गुरूच्या शब्दांमागे त्याच्या तपश्चर्येचे मोठे सामर्थ्य असते. तो केवळ शब्दांनी शक्तिपात करतो. त्याचे शब्द जीवाच्या सूक्ष्म शरीरात घुसतात. जीवाची अंतरंग रचना बदलण्याइतका विलक्षण बदल तेथे घडवून आणतात. म्हणून सद्गुरूच्या शब्दांना फार मोल असते.

प्रफुल्ल फडके/ बोध दासबोधाचा


Tuesday, September 29, 2026

दशक पाचवा : समास पहिला : गुरुनिश्चय (२)


समर्थ रामदास स्वामींनी दासबोधातील पाचव्या दशकातील पहिल्या समासात अत्यंत स्पष्टपणे सांगितले आहे. ते म्हणतात ते आपल्याला सहज दिसून येते. विसावे शतक विज्ञानप्रधान युग आहे. या युगामध्ये परंपरा न मानता स्वतंत्रपणे बुद्धी चालविण्यात फार महत्त्व आहे. राजकारणी पुरुषांना समाजात मोठेपणा आहे. श्री समर्थ ज्या काळात जगले ते धर्मप्रधान युग होते. ज्या युगात परंपरेला फार महत्त्व असून, बहुजनसमाज श्रद्धावंत होता. त्यामुळे धर्मचाºयांना समाजामध्ये फार मोठेपणा होता. ब्राह्मण आपल्याकडील धर्माचार्य असल्याने व्यक्तीच्या खासगी जीवनात आणि सामाजिक समारंभात त्यांचा महत्त्वाचा कार्यभाग असे. त्यांच्या देखरेखीखाली चालणाºया अनेक कृत्यांचा उल्लेख करून ती कर्मे कदाचित पुण्य मिळेल, पण आत्मज्ञान होणार नाहीत असे श्री समर्थ स्पष्ट सांगत आहेत.


स्वामी म्हणतात की, वेडी, अज्ञानी माणसे सद्गुरूचे मार्गदर्शन नसल्यामुळे निरनिराळी हलक्या दर्जाची मामुली साधने करतात, पण सद्गुरूची कृपा नसल्याने त्यांचे श्रम वाया जातात. कोणी कार्तिकस्नाने व माघस्नाने करतात, कोणी व्रते उद्यापने व दाने करतात, कोणी गोरांजने धूम्रपाने करतात, तर कोणी पंचाग्निसाधन साधतात. गोरांजने म्हणजे स्वत:स जाळून घेणे, धूम्रपान म्हणजे झाडास उलटे टांगून घ्यायचे, खाली केलेला धूर पिऊन तप करायचे. पंचाग्निसाधन म्हणजे भर उन्हाळ्यांत चार बाजूला विस्तव पेटवायचा, पाचवा डोक्यावर सूर्याचा ताप सहन करून तप करायचे. अशा देहकाष्टांनी परमार्थ साधत नसतो. कोणी हरिकथा व पुराणे श्रवण करतात. कोणी मनापासून प्रवचने करतात, कोणी अतिशय कठीण असलेल्या तीर्थयात्रा करतात. कोणी देवाची अगदी झकपक पूजा करतात, कोणी स्नानसंध्या करतात, कोणी दर्भासने वापरतात, कोणी गोपीचंदनाचे टिळे लावून गळ्यांत माळा घालतात, तर कोणी वैष्णव मुद्रांचे ठसे लावतात. यांनी काही परमार्थ साधत नाही. अर्ध्यापत्रे म्हणजे देवतांना अर्ध्य देण्यासाठी ताम्हणे, संपुष्ट म्हणजे देव ठेवण्याचा करंडा, गोकर्णे म्हणजे गाईच्या कानासारखा आकार असलेली चांदीची किंवा तांब्याची भांडी, मंत्रयंत्रांची ताम्रपणे म्हणजे तांब्याच्या पत्र्यांवर शास्त्रविधीने लिहिलेले मंत्र आणि आकृती. त्या आकृतींना देवतांची यंत्रे म्हणतात. काही लोक ही भांडी, अनेक प्रकारची लहान मोठी पूजेची भांडी आणि इतर पूजासाहित्य अत्यंत सुंदर व सुशोभित ठेवतात. पण काही लोक भगवंतापर्यंत पोहोचवीत नाही. काही लोक घणघण घंटा वाजवितात, काही लोक स्तोत्रे म्हणतात, भगवंताचे स्तवन करतात, त्याची स्तुती गातात, काही लोक आसने करतात, मुद्रा करतात, ध्यान लावून असतात, तर काही लोक नुसत्या प्रदक्षिणाच घालतात. एवढ्याने परमार्थ पदरात पडत नाही. कोणी पंचायतनाची पूजा करतात. गणपती, शाळीग्राम, शंकर, सूर्य आणि देवी मिळून पंचायतन होते. कोणी मातीच्या लिंगांची लाखोली करतात. मातीचे शिवलिंग करायचे व त्यास बेल, नारळ, फळे, फुले, वाहून अगदी यथासांग पूजा करायची अशी एक लाख लिंगांची पूजा केली म्हणजे लाखोली होते. असल्या लाखोलीने भगवंताचे दर्शन होत नाही. काही लोक उपवास करतात, काही लोक एखादा नेम निष्ठेने चालवतात. सांगण्याचा हेतू असा की पुष्कळ लोक अशा प्रकारची कर्मे अतिशय कष्ट करून करतात. त्याचे काही फळही त्यांना मिळते. परंतु भगवंताच्या प्राप्तीचे खरे वर्म किंवा रहस्य या लोकांच्या हाती लागत नाही. त्या कर्माच्या पायी लोक आत्मज्ञानाचे वर्म चुकतात. आतापर्यंत सांगितलेली सारी कर्मे धर्माच्या दृष्टीने मोठी पुण्यकर्मे असतील. परंतु ती एकजात देहबुद्धीला धरून असल्याने दृश्याची आसक्ती अधिक घट्ट करतात. त्यांच्यामुळे माणूस भगवंताला प्रपंचातील वस्तू मिळविण्याचे साधन बनवितो. म्हणून अशी कर्मे जन्मभर केली तरी आत्मज्ञानाचे रहस्य उकलत नाही. समजा एखाद्याने स्वाहा, स्वधा, इत्यादी यज्ञ केले, होम हवन वगैरे वैदिक कर्मे केली, पण मनामध्ये फळाशा धरली, स्वर्गसुख मिळो, मुलेबाळे व्हावी किंवा कीर्ती मिळावी अशी इच्छा बाळगली, तर ती इच्छा कदाचित सफळ होईल. पण त्यामुळेच त्याने आपणहून पुढील विसार घेतला असे घडते.

समजा एखाद्याने पुष्कळ कष्ट घेतले आणि चौदा विद्यांचा अभ्यास केला, त्या विद्या हस्तगत करून घेतल्या. एखाद्याने खूप योगसाधना केली आणि त्याला यथावकाश ॠद्धी सिद्धी, अतींद्रिय शक्ती प्राप्त झाल्या. तरी सद्गुरूची कृपा झाल्याखेरीज त्याचे आत्महित होत नाही, त्याला आत्मज्ञान होत नाही. आणि ते नाही तोपर्यंत इतर काही केले तरी यमपुरीच्या यातना चुकत नाहीत. दृश्यातील सगळ्या विद्या प्राप्त झाल्या, तरी माणूस अज्ञानाच्या कक्षेतून बाहेर पडत नाही. इतकेच नव्हे तर प्रत्यक्ष योगाचा अभ्यास करून शरीराच्या, मनाच्या व वाणीच्या शक्ती अफाट वाढल्या तरी त्यांचा प्रभाव अज्ञानाच्या क्षेत्रांतच पडल्याने अखेर वर्म चुकते ते चुकतेच.


ज्ञानावाचून मानवी जीवनाची पूर्णता नाही ही गोष्ट श्री समर्थांनी येथे मोठ्या प्रभावीप्रमाने सांगितली आहे. आत्मज्ञान असो की विज्ञान म्हणजे सायन्स असो. ज्ञानातच खरे सामर्थ्य भरलेले आहे. ज्या व्यक्तीच्या आणि समाजाच्या जीवनात ज्ञानाचा प्रभाव नाही, ज्ञानाची उपासना नाही, वाढ नाही आणि लालसा नाही, ती व्यक्ती व तो समाज या जगात उत्तम जीवन जगणे शक्यच नाही. जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही, तोपर्यंत जन्ममरणाचे चक्र काही केल्या सुटत नाही. सद्गुरूच्या कृपेखेरीज गर्भावास चुकत नाही व नरकात जाणे सुटत नाही. जोपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाही, तोपर्यंत ध्यान, धारणा, मुद्रा, आसन, भक्ती, भाव आणि भजन या सगळ्या गोष्टी व्यर्थ ठरतात, निरुपयोगी होतात.

‘भक्तिचेनि योगे देव। निश्चये पावती मानव॥’ हे समजून सांगण्यासाठी दासबोध लिहिणारे श्री समर्थ आत्मज्ञानाचे महत्त्व किती ठासून सांगत आहेत हे ध्यानात घ्यावे. प्रपंचात काय आणि परमार्थात काय विवेक आणि त्यातून जन्मणारे ज्ञान यांनाच मानवी जीवनात खरी किंमत आहे. माणसाची सारी कर्मे ज्ञानपर्यवसायी झाली पाहिजेत. नाहीतर त्या कर्माचे कष्ट तेवढे पदरात पडतात आणि जीवन अर्धविकसित राहते.


- प्रफुल्ल फडके/बोध दासबोधाचा


तंत्रज्ञान क्षेत्रात भारताची ओळख


एकविसाव्या शतकातील जागतिकीकृत आणि तंत्रज्ञान-चालित जगात, ज्याला आधुनिक सभ्यतेचे अदृश्य हृदय म्हणता येईल, ती म्हणजे अतिसूक्ष्म सेमीकंडक्टर चिप. ज्याप्रमाणे विसाव्या शतकात कच्च्या तेलाच्या उपलब्धतेने आणि नियंत्रणाने जागतिक भू-राजकीय आणि आर्थिक घडामोडींना आकार दिला, त्याचप्रमाणे आजच्या डिजिटल आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित जगात सेमीकंडक्टर चिप्स जागतिक सत्तेचे नवीन केंद्र बनले आहेत. स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांपासून ते आॅटोमोबाइल, संरक्षण प्रणाली, एरोस्पेस, वैद्यकीय उपकरणे, दळणवळण आणि प्रगत सुपरकम्प्युटिंगपर्यंत, आधुनिक जीवनातील असे क्वचितच एखादे क्षेत्र असेल जे या लहान सिलिकॉन चिप्सवर अवलंबून नाही. या महत्त्वपूर्ण टप्प्यावर, भारताने केवळ एक ग्राहक राष्ट्र न राहता, सेमीकंडक्टर उत्पादनाच्या जागतिक नकाशावर स्वत:ला स्थापित करण्याचा निर्धार केला आहे. हा उपक्रम ‘सेमिकॉन इंडिया’ म्हणून ओळखला जातो.


देशाला सेमीकंडक्टर उत्पादनाचे एक मजबूत जागतिक केंद्र बनवण्यासाठी भारत सरकारने १०० दशलक्ष डॉलर्सच्या प्रारंभिक आर्थिक गुंतवणुकीसह ‘राष्ट्रीय सेमीकंडक्टर मिशन’ आणि ‘सेमिकॉन इंडिया’ कार्यक्रमाचा पाया घातला आहे. ‘सेमिकॉन इंडिया २०२६’ या जागतिक सेमीकंडक्टर परिषदेच्या व्यासपीठावरून पंतप्रधान मोदींनी केलेल्या भाषणाने भारताच्या परिवर्तनवादी निर्धाराला जागतिक विश्वासार्हता प्राप्त झाली. सेमीकंडक्टर उत्पादन प्रक्रिया ढोबळमानाने तीन टप्प्यांमध्ये विभागली जाते. डिझाइन, फॅब्रिकेशन आणि असेम्ब्ली व पॅकेजिंग. या तिन्ही टप्प्यांना समांतरपणे मजबूत करणे ही भारताची धोरणात्मक योजना आहे. भारताकडे आधीपासूनच चिप डिझाइन करण्याची क्षमता आहे. जगातील जवळपास सर्व आघाडीच्या चिप डिझाइन कंपन्यांची मोठी संशोधन आणि विकास केंद्रे भारतात आहेत. सेमीकॉन इंडिया अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या ‘डिझाइन-लिंक्ड इन्सेंटिव्ह’ योजनेचा उद्देश भारतीय स्टार्टअप्स आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना त्यांची बौद्धिक संपदा विकसित करण्यासाठी आणि देशांतर्गत स्वदेशी चिप्स डिझाइन करण्यासाठी आर्थिक आणि तांत्रिक संसाधने प्रदान करणे हा आहे.

जेव्हा भारतीय अभियंत्यांद्वारे भारतात चिप्स डिझाइन केल्या जातील आणि देशांतर्गत कारखान्यांमध्ये त्यांचे उत्पादन केले जाईल, तेव्हा तांत्रिक आत्मनिर्भरतेचे स्वप्न खºया अर्थाने साकार होईल. फॅब्रिकेशन आणि असेम्ब्लीमधील भारताची जलद प्रगती आधुनिक औद्योगिक इतिहासात अभूतपूर्व आहे. असेम्ब्ली, चाचणी आणि पॅकेजिंग युनिट्स हे सेमीकंडक्टर मूल्य साखळीचा एक महत्त्वाचा भाग आहेत. या युनिट्सच्या स्थापनेमुळे भारताला जलद यश मिळत आहे, देशाची औद्योगिक पायाभूत संरचना तयार होत आहे आणि हजारो उच्च कुशल रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. त्याचबरोबर अत्याधुनिक सिलिकॉन वेफर फॅब्रिकेशन प्लांट्सच्या स्थापनेमुळे प्रगत नॅनोमीटर-स्केल चिप्स तयार करण्याची क्षमता असलेल्या देशांच्या निवडक गटात भारताला स्थान मिळत आहे.


सेमीकंडक्टर उद्योग हा जगातील सर्वात आव्हानात्मक आणि अनिश्चित उद्योगांपैकी एक मानला जातो. जे तंत्रज्ञान आज अत्याधुनिक आहे, ते पाच वर्षांत कालबाह्य आणि अप्रस्तूत होऊ शकते. त्यामुळे भारताने केवळ आॅटोमोबाइल्स आणि ऊर्जा उपकरणांमध्ये वापरल्या जाणाºया २८ नॅनोमीटर, ४० नॅनोमीटर किंवा त्याहून अधिकच्या पारंपरिक चिप्ससारख्या सध्याच्या तंत्रज्ञानावरच लक्ष केंद्रित करू नये, तर २ नॅनोमीटरवर आधारित कम्पाऊंड सेमीकंडक्टर्स, गॅलियम नायट्राइड, सिलिकॉन कार्बाइड आणि सिलिकॉन फोटोनिक्स यांसारख्या पुढच्या पिढीच्या तंत्रज्ञानातील संशोधन आणि विकासालाही गती दिली पाहिजे. यासाठी सातत्यपूर्ण आर्थिक गुंतवणूक, दीर्घकालीन धोरणात्मक सातत्य आणि खासगी उद्योगासोबत अढळ सहकार्याची आवश्यकता आहे. आणखी एक मोठे आव्हान पर्यावरण आणि पायाभूत सुविधांशी संबंधित आहे. सेमीकंडक्टर उत्पादनामध्ये प्रचंड प्रमाणात वीज आणि पाण्याचा वापर होतो. वीजपुरवठा खंडित झाल्यास किंवा पाण्यातील अगदी लहानशा अशुद्धतेमुळेही एका क्षणात अब्जावधी रुपयांच्या सिलिकॉन वेफर्सचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे भारताने आपल्या सेमीकंडक्टर पार्क्समध्ये अखंड, जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि शून्य-दोष गुणवत्ता सुनिश्चित केली पाहिजे. याव्यतिरिक्त, भारताने हरित ऊर्जा आणि जल पुनर्वापर यांसारख्या शाश्वत तंत्रज्ञानाचा अवलंब केला पाहिजे, जेणेकरून या औद्योगिक प्रगतीचा पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम होणार नाही.

सेमीकंडक्टर इंडियाचे ध्येय केवळ पारंपरिक सिलिकॉन-आधारित चिप्सपुरते मर्यादित नाही. क्वांटम कम्प्युटिंग, फोटोनिक्स, आॅप्टोइलेक्ट्रॉनिक्स आणि एआय  यांसारख्या भविष्यकालीन तंत्रज्ञानासाठी विशेषत: डिझाइन केलेल्या चिप्सच्या क्षेत्रातही भारत आपले स्थान प्रस्थापित करू पाहत आहे. जग जसे 6 G कम्युनिकेशन, स्वायत्त वाहने, स्मार्ट ग्रिड्स आणि रोबोटिक्सकडे वाटचाल करत आहे, तशी अत्यंत कार्यक्षम आणि कमी-ऊर्जा वापरणाºया चिप्सची मागणी झपाट्याने वाढेल. जर भारताने या उदयोन्मुख तंत्रज्ञानामध्ये वेळेत आपले नेतृत्व स्थान प्रस्थापित केले, तर तो पुढील औद्योगिक क्रांतीचे नेतृत्व करणाºया प्रमुख देशांपैकी एक असेल.


ही गोष्ट नक्कीच भारतासाठी अभिमानाची असेल. हे आव्हान आपण पेलू शकतो हे जगाला दाखवण्यासाठी भारत आता सज्ज झालेला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची उज्ज्वल होत असलेली प्रतिमा आणि विविध देश भारतात गुंतवणुकीसाठी पुढे येत आहेत. त्यामुळे लवकरच भारत स्वबळावर मोठा होताना दिसणार आहे. नव्या पिढीला यातून संधी निर्माण होतील, त्याचा लाभ घेता आला पाहिजे.

निवडणूक आयोगाच्या वादावर पडदा


एका इंग्रजी दैनिकातील वृत्तामुळे अलीकडे जो गदारोळ झाला होता, तो निवडणूक आयोगाच्या ताज्या बैठकीमुळे शमला. या बैठकीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांवर विवेक जोशी आणि सुखबीर सिंग संधू या दोन निवडणूक आयुक्तांनी असहमती दर्शवली होती आणि त्यांनी कॅबिनेट सचिवांकडे तक्रारही दाखल केली होती, असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्तामुळे विरोधी पक्षांनी मुख्य निवडणूक आयुक्त आणि मोदी सरकारला लक्ष्य केले होते, परंतु या वृत्तामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांवरही चर्चा झाली. मुख्य निवडणूक आयुक्तांसोबतच हे दोन्ही मुख्य निवडणूक आयुक्तही निवडणूक आयोगाच्या बैठकीला उपस्थित राहिल्याने, या तिघांमध्ये मतभेद असल्याच्या अफवांना पूर्णविराम मिळाला. बैठकीनंतर जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट करण्यात आले की, दोन्ही निवडणूक आयुक्तांनी कॅबिनेट सचिवांना लिहिलेले पत्र आयोगाच्या कोणत्याही धोरणाशी संबंधित नसून, आयोगात प्रतिनियुक्तीवर असलेल्या एका अधिकाºयाच्या कामाशी संबंधित होते.


या प्रसिद्धीपत्रकात हेही स्पष्ट करण्यात आले की, मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकनासंदर्भातील (SIR)  सर्व निर्णय एकमताने घेण्यात आले होते. निवडणूक आयोगाने यापूर्वीच्या अहवालांमध्येही हीच बाब नमूद केली होती. त्यांच्यावर अविश्वास ठेवण्याचे काहीच कारण नव्हते, कारण निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार निर्णय एकतर एकमताने किंवा बहुमताने घेतले जातात. मतभेदांबद्दल बोलायचे झाल्यास कोणत्याही संस्थेतील विचारविनिमयादरम्यान मतांतर होणे स्वाभाविक आहे. हे मतभेद वाढवण्याचे कोणतेही समर्थन नव्हते, पण नेमके तेच केले गेले. निवडणूक आयोगाच्या ताज्या प्रसिद्धीपत्रकातून हेही उघड झाले आहे की, फॉर्म ६ मधील बदलांवर दोन निवडणूक आयुक्तांनी घेतलेले कथित आक्षेप निराधार होते. हे देखील निराधार होते, कारण बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान दाखल केलेल्या एसआयआरमध्ये, सर्वोच्च न्यायालयाने फॉर्म ६ मध्ये जोडलेली अतिरिक्त घोषणा वैध असल्याचा निकाल दिला होता. अखेर, सर्वोच्च न्यायालयाने कायदेशीर आणि आवश्यक मानलेल्या बदलावर कोणताही निवडणूक आयुक्त आक्षेप कसा घेऊ शकतो?

देशातील प्रत्येक पात्र मतदाराला मतदानाचा अधिकार देणे आणि अपात्र मतदारांची नावे मतदार यादीतून काढून टाकणे हे निवडणूक आयोगाच्या प्राथमिक कार्यांपैकी एक आहे. सध्याच्या मतदार यादीत स्थलांतरित झालेल्या किंवा निधन पावलेल्या लोकांची अनेक नावे आहेत, हे कोणीही नाकारू शकत नाही. त्याचप्रमाणे नावांची अनेक वेळा पुनरावृत्ती झाली आहे. मतदार याद्यांमध्ये घुसखोरांचीही अनेक नावे समाविष्ट आहेत. ही वस्तुस्थिती आहे की, गेल्या काही दशकांमध्ये देशात मोठ्या प्रमाणावर घुसखोरी झाली आहे आणि घुसखोरांनी आधार व इतर कागदपत्रांसह मतदार ओळखपत्रे फसवणुकीने मिळवली आहेत. हे विशेषत: देशाच्या सीमावर्ती राज्यांमध्ये प्रचलित आहे आणि याचे कारण असे आहे की, या राज्यांमधील राजकीय पक्षांनी निवडणुकीत फायदा मिळवण्यासाठी हेतुपुरस्सर घुसखोरांना यादीत समाविष्ट केले आहे.


सत्तेवर आल्यापासून मोदी सरकारने सातत्याने हे स्पष्ट केले आहे की, ते घुसखोरांना हाकलून देतील. हे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा त्यांची ओळख पटवली जाईल. हे खरे आहे की, अशा व्यक्तींची ओळख पटवण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची नाही, तसेच सरकारने निवडणूक आयोगाला तसे करण्याचे निर्देशही दिलेले नाहीत. तथापि, मतदार यादीतील नावे भारतीय नागरिकांचीच आहेत, याची खात्री करणे ही त्याची जबाबदारी आहे. हे सुनिश्चित करण्यासाठी, निवडणूक आयोग लोकांना आवश्यक कागदपत्रे सादर करण्यास सांगत आहे आणि त्यांना नोटिसा पाठवत आहे, जे चुकीचे नाही. निवडणूक आयोगाने हे सुनिश्चित केले पाहिजे की, जो नागरिक भारतीय नागरिक नाही, तो मतदार बनू नये. हे साध्य करण्यासाठी निवडणूक आयोगाला फॉर्म ६ द्वारे लोकांकडून आवश्यक माहिती घ्यावी लागेल आणि त्यांच्या कागदपत्रांची पडताळणीही करावी लागेल, कारण अनेक लोकांनी बनावट किंवा फसवणुकीने ओळखपत्रे मिळवली आहेत.

एसआयआर  प्रक्रिया बिहार विधानसभा निवडणुकीपासून सुरू झाली. त्यानंतर निवडणुका झालेल्या बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये ती लागू करण्यात आली. केरळ आणि तामिळनाडूमध्ये कोणताही वाद निर्माण झाला नाही. हे देखील उल्लेखनीय आहे की, या दोन राज्यांमध्ये अनुक्रमे काँग्रेस आणि टीव्हीके  विजयी झाले. या राज्यांनंतर इतर अनेक राज्यांमध्येही एसआयआर प्रक्रिया लागू करण्यात आली. उर्वरित राज्यांमध्ये ती सुरू आहे. एसआयआर भोवती असलेल्या वादाचे कारण म्हणजे, जवळपास दोन दशकांपासून ही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. ती नियमितपणे आयोजित करणे आवश्यक आहे, कारण केवळ यामुळेच मतदार याद्या शुद्ध होऊ शकतात.


ही चांगली गोष्ट आहे की, एसआयआर संदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी तीन निवडणूक आयुक्तांनी बैठक घेतली आणि या प्रक्रियेत निर्माण होणाºया कोणत्याही समस्या जनतेला कमीत कमी गैरसोय होईल अशा पद्धतीने सोडवल्या जातील, हे देखील स्पष्ट केले. आता जर विरोधी पक्षाने मुख्य निवडणूक आयुक्तांना विरोध करणे आणि त्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करणे सुरू ठेवले, तर ते निरर्थक ठरेल. विरोधी पक्षाचा आरोप आहे की, एसआयआर  असलेल्या राज्यांमधील लाखो मतदारांची नावे अयोग्यरीत्या वगळण्यात आली. प्रश्न असा आहे की, हे लोक आपला निषेध व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर का उतरत नाहीत? प्रश्न असा आहे की, विरोधी पक्ष या लोकांना समोर का आणत नाही? केवळ राजकारण करायचे म्हणून विरोधक हे करत आहेत. खोट्या अफवा पसरवून समाजात, नागरिकांत संभ्रम निर्माण करणे हे विरोधकांचे कारस्थान आहे. त्यासाठी सीजेपी (ही झुरळे) शस्त्र म्हणून वापरले जात आहे. आंदोनल फसले आणि त्यात काही तत्थ्य नाही हे समोर आले की त्याचे खापर झुरळांवर फोडता येईल हा विरोधकांचा डाव आहे, बाकी काहीही नाही.

दशक पाचवा : समास पहिला : गुरुनिश्चय (१)


समर्थ रामदास स्वामींनी दासबोधाच्या पाचव्या दशकातील पहिल्या समासात गुरुनिश्चयाबाबत वर्णन केलेले आहे. सद्गुरूचा महिमा सांगताना समर्थ म्हणतात की, श्रीसद्गुरू ब्रह्मज्ञानी पुरुष असतो. तो परमात्म्याशी अभिन्न असतो. तो चालते बोलते ब्रह्मच समजा. तो स्वरूपभूत असल्याने त्याचे वर्णन तरी कसे करणार! हे सद्गुरूराया, तुमचा जयजयकार असो! तुम्ही पूर्णकाम आहात, कारण तुमच्या वासना तृप्त झालेल्या आहेत. तुम्ही सर्वोत्तम पुरुष म्हणजे ईश्वर आहात. सर्वांच्या हृदयात राहणारे आत्मस्वरूप तुम्हीच आहात. तुमचा महिमा शब्दांनी सांगण्यासारखा नाही. म्हणून तो वर्णन करता येत नाही.


समर्थ पुढे म्हणतात की, परमात्म वस्तु अतींद्रिय व अचिंत्य आहे, अदृश्य व अलक्षण आहे, अति गूढ व दुर्लभ आहे. सद्गुरूच्या कृपेने ती वस्तु तद्रूपतेने अनुभवतो. - जे परमात्मस्वरूप वेदांना अवघड वाटते, शब्दांच्या क्षेत्रांच्या पलीकडे राहते, आणि दुर्लभ आहे ते सतशिष्याला, मात्र अगदी रोकठोक प्राप्त होते. जे परमात्मस्वरूप योगी लोकाचे खास रहस्य आहे, जे शंकराचे खास राहण्याचे ठिकाण आहे, जेथे विश्रांतीलाही खास विश्रांती मिळते, जे अतिशय गूढ आणि तसेच खोल आहे, ते ब्रह्म तुमच्या कृपेने शिष्य स्वत: आपण बनून जातो, त्याच्याशी शिष्य तदाकार बनतो. मग या अतिकठीण संसाराच्या यातायातीने तो मुळीच कष्टी होत नाही. या तीन ओव्यांमध्ये श्री समर्थांनी फार महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या.

यातील पहिली गोष्ट म्हणजे, दुर्लभ परमात्मा सतशिष्याला साक्षात अनुभवास येतो. दुसरी गोष्ट म्हणजे, ते स्वरूप अतिशय गूढ व अत्यंत समाधान देणारे आहे. तसेच, तिसरी गोष्ट अशी की, शिष्य स्वत: ते बनतो. आणि चौथी म्हणजे त्यानंतर त्याच्या जीवनात दु:ख उरत नाही.


यानंतर समर्थ गुरुशिष्यांच्या लक्षणांची प्रस्तावना करतात. ते म्हणतात की, श्रोते म्हणतात की स्वामींनी आता आमचे लाड पुरवावे आणि गुरुशिष्यांची लक्षणे सांगावी. पण, ती अशी सांगावी की त्यांचे श्रवण करून मोक्षाची तळमळ असणाºयांनी लगेच सद्गुरूला शरण जावे.

श्री समर्थांच्या काळी समाजरचनेमध्ये ब्राह्मणाला फार महत्त्व होते. तो बुद्धिमान होता व विद्येने पुढारलेला होता. वैदिक जीवनपद्धतीची परंपरा त्याने कशीतरी टिकवून धरली होती. व्यवहारामधील धर्मकर्मामध्ये त्याच्या शब्दाला फार किंमत असल्याने तो एकप्रकारे गुरुत्व मिरवीत होता. पण, भगवंताच्या बाबतीत तो मार्गदर्शन करू शकत नव्हता. उलट असे मार्गदर्शन करणा‍ºया संतांना त्याने वेडेपणाने विनाकारण विरोध केला आणि तो स्वत:चे महत्त्व घालवून बसला. संतांनी त्याला न दुखवता लोकसंग्रह केला. म्हणून या समासामध्ये श्री समर्थांनी व्यवहारात त्याचे मोठेपण मान्य केल्यासारखे दाखवून परमार्थात ते चालणार नाही, असे मोठ्या खुबीने पण स्पष्टपणे सांगितले आहे. ब्राह्मण हा सगळ्यांचा गुरू आहे. तो क्रियाहीन असला तरी म्हणजे तो ब्राह्मणधर्माने वागत नसला तरी त्यालाच अगदी मनापासून शरण जावे. अहो या ब्राह्मणांसाठी नारायणाने अवतार घेतला. विष्णूने श्रीवत्स म्हणजे भृगूने मारलेल्या लाथेची खूण मिरविली. तेथे इतरांची किंमत किती?


समर्थ म्हणतात की, ब्राह्मनांचे वचन प्रमाण मानतात. त्याच्या वचनाने शूद्रसुद्धा ब्राह्मणाच्या योग्यतेस चढतात. ब्राह्मणाच्या वचनाने, मंत्राने दगडामध्ये देवपण अवतरते. ज्याची मुंज झाली नाही तो जन्माने ब्राह्मण असला तरी नि:संशपणे शूद्रच असतो. मुंज म्हणजे दुसरा जन्म. म्हणून ब्राह्मणाला द्विज असे म्हणतात. सर्वांनी ब्राह्मणाला पूज्य मानावे अशी वेदाज्ञा आहे. ती सगळ्यांनी प्रमाण मानावी. जे वेदाच्या उलट आहे ते अप्रमाण मानावे. ते भगवंताला पण आवडत नाही. ब्राह्मणांच्या मदतीने ज्योतिषांतील योग, होम, हवन, व्रते, दाने, तीर्थयात्रा व तेथील कर्मे होतात. ब्राह्मणांवाचून कर्ममार्गांचे आचरण होणार नाही. ब्राह्मण म्हणजे मूर्तिमंत वेदच होय. ब्राह्मणालाच देव समजावा. त्याच्या वचनाने सर्व इच्छा सफल होतात. ब्राह्मणाची पूजा केली तर मन शुद्ध होते व वृत्ती भगवंताच्या ठिकाणी जडते. ब्राह्मणाचे तीर्थ घेतल्याने माणसाला उत्तम गती लाभते. लक्षभोजन घालण्यासाठी ब्राह्मणच लागतात. भगवंत फक्त अंत:करणातील शुद्ध भाव तेवढा पाहतो. इतर गोष्टींची तो किंमत ठेवीत नाही.

असे सांगून समर्थ म्हणतात, असो. ब्राह्मणाला मोठमोठे देवदेखील नमस्कार करतात. तेथे माणसांना बिचा‍ºयांना कोण विचारतो. लोकरीतीला सोडून कांही वेगळे करणे वेदाला मान्य नसते. म्हणून त्याला पाखंड म्हणतात. जे शिवाचे व विष्णुचे भक्त आहेत, त्यांची ब्राह्मणांवर श्रद्धा असते. ब्राह्मणांना पूज्य मानल्याने पुष्कळ लोक पावन झाले.


वेद परंपरेचे व लोकपरंपरेचे वर्णन आतापर्यंत झाले. ब्राह्मणांची बाजू उचलून धरावी हा कांही श्री समर्थांचा हेतू येथे नाही. लोकपरंपरेमध्ये ब्राह्मणाला गुरुत्व असताना आणखी सद्गुरू कशास हवा त्याचे कारण सांगतात. ब्राह्मणाला पूज्य मानल्याने जर मोठ्या देवापर्यंत पोहोचता येते, तर सद्गुरू कशाला करावा? त्याची जरूर काय? असा प्रश्न येतो. आपला आत्मस्वरूपाचा जो ठेवा आहे तो सद्गुरूशिवाय मिळत नाही, म्हणून सद्गुरू करावा, हे त्याचे उत्तर आहे. आपण जी धार्मिक कृत्ये करतो त्यांच्यापुरता ब्राह्मण पूज्य मानावा हेबरोबर आहे. पण, आत्मज्ञान मात्र सद्गुरूंवाचून प्राप्त होत नाही. आणि ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत जन्ममृत्यू कांही चुकत नाहीत व नुसते दु:ख मात्र भोगावे लागते. ब्राह्मण कितीही चांगला असला तरी तो देहबुद्धीमध्ये राहणारा सामान्य स्वार्थी माणूस असतो. तो कांही कोणाला भगवत्-स्वरूपापर्यंत पोहोचवू शकत नाही. ब्रह्मज्ञानी सत्पुरुषच ती गोष्ट करू शकतात. सद्गुरूंनी कृपा केल्याखेरीज ब्रह्मज्ञान होणे शक्य नाही. आणि ते ज्ञान नाही तोपर्यत अज्ञानी माणसे या दृश्याच्या प्रवाहांत वाहून जातात. आत्मज्ञान करून न घेता जे जे कांही माणूस करतो ते ते अज्ञानांतून होत असल्याने पुन: जन्म घेण्याचे कारण होऊन बसते, म्हणून ज्ञानी होण्यासाठी सद्गुरूंची पाउले घट्ट धरावी, सद्गुरूला शरण जाऊन ज्ञान करून देण्याबद्दल प्रार्थना करावी. भगवंताचे दर्शन व्हावे असे ज्यास खरोखर वाटते त्याने संतांची संगत धरावी. सत्संग केल्याखेरीज भगवंतापर्यंत पोहोचता येत नाही. संत हाच सद्गुरू होऊ शकतो. म्हणून सत्संग करावा असे सांगत असता सद्गुरूचा सहवास करावा हा खरा हेतू आहे.

प्रफुल्ल फडके/ बोध दासबोधाचा



Sunday, September 27, 2026

।। दशक तिसरा : समास सहावा : आध्यात्मिक ताप ।।



दासबोधातील तिसºया दशकातील सहाव्या समासात समर्थ आध्यात्मिक तापाचे वर्णन करतात. जीवनातील नाना प्रकारच्या दु:खांनी माणूस गांजला म्हणजेच तो जीवनाचा खरा अर्थ किंवा परमार्थ शोधू लागतो. त्यात त्याला सत्संगती लाभली की बरोबर भगवंतांच्या मार्गाला लागतो. समर्थ म्हणतात, मी आता तापत्रयाच्या लक्षणांचे वर्णन करतो. जो तापत्रयाने पोळलेला असतो तो संतांच्या संगतीने निवतो, म्हणजे शांत होतो. त्याला समाधान लाभते. एखादी वस्तू हवी म्हणून विव्हळ झालेल्या माणसाला ती वस्तू मिळाली की संतोष होतो. तसे दु:खी माणसाला सत्संगाने समाधान मिळते. एखाद्या रोग्याला अनुभवसिद्ध म्हणजे खात्रीचे आणि उत्तम औषध मिळाले म्हणजे त्याचा रोग नाहीसा होऊन त्याला आनंद होतो. त्याचप्रमाणे संसारातील दु:खाने गांजलेला आणि त्रिविधतापाने पोळलेला माणूसच परमार्थ मिळविण्यास लायक होतो.

त्रिविधतापांची लक्षणे सांगणारे तीन श्लोक दिले आहेत. ते त्रिविधताप कसे आहेत तर, देह, इंद्रिये आणि प्राण यांच्यामुळे जे सुखदु:ख प्राप्त होते, म्हणजे भोगावे लागते त्याला आध्यात्मिक ताप असे म्हणतात. माणसांना त्यापासून दु:खच होते. सर्व भुतांच्या संयोगाने जे सुखदु:ख उत्पन्न होते तो दुसरा ताप असून तो मोठा क्लेशदायक आहे. तो खरोखर आधिभौतिक ताप होय. माणसाच्या चांगल्यावाईट कर्माप्रमाणे मेल्यावर यात्रा, स्वर्ग, नरक वगैरे जे भोग भोगावे लागतात त्यांना आधिदैविक ताप असे म्हणतात. एक ताप आध्यात्मिक, दुसरा ताप आधिभौतिक आणि तिसरा ताप आधिदैविक असे तीन ताप समजावेत.


यातील आध्यात्मिक तापाची व्याख्या म्हणजे प्रधान लक्षण. या समासात समर्थ सांगतात, देह, इंद्रिये आणि प्राण यांच्या योगाने माणूस सुखदु:खे भोगतो आणि त्यामुळे त्रस्त होतो. त्या तापाला आध्यात्मिक असे नाव आहे. जे दु:ख देहातून निर्माण होते आणि इंद्रिये व प्राण यांच्याद्वारा भोगावे लागते, त्याला तीन तापांपैकी आध्यात्मिक ताप असे म्हणतात. शरीरांतून काय निर्माण होते आणि प्राणामुळे कोणते दु:ख होते हे स्पष्ट करून सांगणे जरूर आहे.

या समासात पुढील जवळजवळ चाळीस ओव्यांमध्ये समर्थांनी आध्यात्मिक तापाखाली येणाºया दु:खाचे वर्णन केले आहे. श्री समर्थांचे निरीक्षण किती सूक्ष्म होते, त्यांचे व्यवहारज्ञान केवढे अवाढव्य होतें आणि त्यांची स्मृती कशी विलक्षण होती हे यातून दिसून येते.


खरुज, कवडे, अंगावर उठणा‍ºया पुळ्या, नारू, नखुरडे, मांज‍ºया, देवी व गोवर हे देहामध्येच उत्पन्न होणारे विकार आहेत. म्हणून त्यांना आध्यात्मिक ताप म्हणायचे. कांखमांजरी, केस्तुड, साधणारा व्रण, काळपुळी, रोगांमध्ये अति दु:सह असा मूळव्याध, बोटांचे दुखणे, गालफुगी, उगीच अंगभर सुटणारी खाज, हिरड्यांची सूज, दातात भरणारे कस्पट, अंगावर उगीच फोड उठणे, अंगावर सूज येणे, वाट होणे, तिडका लागणे, नयते, हाड्याव्रण, गजकर्ण, जलोदराने फुगलेले पोट, कानठळ्या बसून कान फुटणे, पांढरे कोड, महारोग, रोगांत श्रेष्ठ असा पांडुरोग किंवा रक्तक्षय, क्षयरोगाचे कष्ट, गाठ सरकणे, दूध प्यायल्यावर मुलाला लगेच होणारी वांती, हातापायांत येणा‍ºया कळा, वारंवार चक्कर, घेºया येणे, वोलांडा, वळ, पोटशूळाच्या यातना, अर्धशीशी, कपाळदुखी, कंबर, मान, पाठ, गळा, तोंड दुखणे, हाडांचे दुखणे, मोडशी, अजीर्णाची हागओक, कवील, पुरळ, गळवे, गंडमाळा, परदेशी पाणी बाधणे, कोरड पडणे, हिवताप, गरगरणे, डोळ्यापुढे अंधेरी येणे, ताप, दुखणे उलटणे, अंगावर उगाच शहारे येणे, थंडी, उकाडा, तहान, भूक, झोप, हगवण, अति संभोगाने होणारी वाईट अवस्था, आळशी, मूर्ख, अपयशी, मनात भय उत्पन्न होणे, विसराळू, सर्वकाळ उद्विग्न असणे, लघवी अडणे, परमा, रक्तपिती, रक्तपरमा, मूतखड्याच्या यातना, मुरडा, हगवण, उन्हाळ्या लागणे, शौच कोंडल्यामुळे होणारी तगमग, रोग असून तो कोणता ते न कळणे, गाठ सरकणे, जंत होणे, आव व रक्त पडणे, अन्न पचन न होता जसेच्या तसेच पडणे, पोट फुगणे, तडस लागणे, ठसका लागणे, घास लागणे, फोडाला धक्का लागून जीव कासावीस होणे, उचकी लागणे, घास अडकणे, पित्त उसळून वांती होणे, जीभकाटे येणे, पडसे, खोकला होणे, दमा उसळणे, धाप लागणे, पडजिभेची ढास, कफ होणे, मोवाज्वर येणे, अंगाची आग होणे, कोणी शेंदूर खायला घातल्याने मनावर परिणाम होणे, घशामध्ये फोड होणे, घटसर्प, जीभ झडणे, सदा तोंडाला अति घाण येणे, दात पडून हिरड्यांत कृमी होणे, पांथरी वाढणे, घोळणा फुटणे, गंडमाळा, आपोआप एकाएकी डोळा फुटणे, आपणच आपले बोट कापून घेणे, कळा व तिडीक लागणे, दात उपटले जाणे, ओठ व जीभ चावली जाणे.

कान ठणकणे, डोळे दुखणे, नाना प्रकारच्या दु:खाने ओरडणे, जन्मांध असणे, नपुंसक असणे, डोळ्यांत फूल पडणे, वडस वाढणे, मोतीबिंदू व कांचबिंदू होणे, डोळ्याच्या पापण्यांना कीड लागणे, डोळे असून न दिसणे, रातांधळेपणा असणे, दुश्चितपणा, भ्रमिष्टपणा आणि खुळेपणा असणे, मुकेपणा, बहिरेपणा, ओठ तुटके, हात तुटके, वृत्ती चळलेली, वेडेपणा, पांगालेपणा, कुबड, आखूड पाय, तारवटलेले डोळे, वाकडी मान, काणा, तिरवा, घारे डोळे, अति ठेंगूपणा, ठेचाळणे, सहा बोटे, गेंगना, विद्रुप, मोठे दात, पुढे आलेले दात, फार लांब नाक, नाक नसणे, कान नसणे, अर्थहीन बडबड, अति रोड, अति लठ्ठ, तोतरा, बोबडा, अशक्त, रोगी, कुरूप, वांकड्या बुद्धीचा, मत्सरी, खादाड, तापट, संतापी, अनुतापी, मत्सरी, कामुक, हेवेदावे करणारा, तिरस्कारी, पापी, अवगुणी, विकारांच्या अधीन, ज्याला नीट उठता-बसता येत नाही, अंग ताटणे, अवघडणे, लचक भरणे, सूज येणे, पायाचा संधिवात, न वाढणारा गर्भ, मूल आडवे येणे, गर्भपात, स्तनांतील गाठी, सन्निपात, संसारांतील अडचणी, अपमृत्यू, नखाचे विष बाधणे, नाखुडे, शिळे व कुपथ्याचे खाण्याने प्रकृती बिघडणे, उगीच दातखीळ बसणे, डोळ्याच्या पापण्या झडणे, भुवया सुजणे, डोळ्यांत रांजणवड्या होणे, चष्मा लागणे, अंगावर काळ्या पुळ्या येणे, तीळ, पांढरे चट्टे, काळे चट्टे, चामखीळ, गालगुंड, अंगावर मांस वाढणे, मनाला भ्रम होणे, अंगावर येणारे फुगवटे, आवाळे, अंगाला फार दुर्गंधी येणे, डोक्यावरचे केस गळणे, तोंडातून लाळ गळणे, अनेक काळज्यांनी काळवंडणे, अनेक दु:खांनी मानसिक यातना होणे, काही रोग नसताना जीवाची तगमग होणे, म्हातारपणाच्या यातना, सदा काहीना काही रोग होणे, देह नेहमी अशक्त असणे, अनेक रोग, अनेक दु:खे, अनेक भोग, अनेक जखमा, या सर्वांमुळे माणसाला दु:ख होऊन त्याच्या जीवाची ती तळमळ होते त्याला आध्यात्मिक ताप असे म्हणतात. आध्यात्मिक ताप हा असा आहे. पूर्वी केलेले पाप भडकल्याने हा ताप भोगावा लागतो. त्याचे कितीही वर्णन केले तरी तो संपणारा अफाट दु:खसागर आहे. हा आध्यात्मिक ताप वर्णन करताना समर्थांनी सर्व शरीराचा अभ्यास केलेला दिसून येतो.


प्रफुल्ल फडके/ बोध दासबोधाचा


मानवी हक्काला सुरुवात तेव्हाच होईल...



दरवर्षी सगळीकडे मानवी हक्क दिन साजरा केला जातो. शासकीय पातळीवरही तो साजरा केला जातो. पण मानवी हक्क दिन साजरा करण्याची वेळ येते हाच एक विनोद म्हणावा लागेल. आपल्या लोकशाहीची ही ख‍ºया अर्थाने थट्टा आहे. याचे कारण भारतीय संविधानात, घटनेमध्ये मानवी हक्कांचा यथोचित सन्मान केलेला आहे. मानवी हक्कांचा आदर केलेला आहे. मानवी हक्कांचे संरक्षण करण्यासाठी संविधानात पुरेशा तरतुदी करण्यात आल्या आहेत. असे असतानाही घटनेचे राज्य अस्तित्वात आल्यानंतरही आपल्याला हा दिवस साजरा करावा लागतो. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगही मानवी हक्कांचे संरक्षण, जतन आणि संवर्धन करण्यासाठी कार्यरत आहे. समाजात कोणत्याही व्यक्तीसोबत भेदभावपूर्ण व्यवहार करणे हा एक प्रकारचा सामाजिक अन्याय आहे. हे पटवण्यासाठी साठ-सत्तर वर्षे झाली तरी ती आम्हाला पुरेशी पडली नाहीत. यावरून सुधारणेबाबत गेल्या सहा-सात दशकात आम्ही किती जागरूकतेने काम केले आहे याचे अवलोकन केले पाहिजे. पंचावन्न वर्षे देशावर सत्ता गाजवणा‍ºया पक्षाने घटनेचे, समतेचे राज्य अस्तित्वात आणलेच नाही म्हणून हा दिवस साजरा करावा लागतो आहे असे वाटते. जीवन जगण्यासाठी सामाजिक न्यायाची प्रत्येकालाच नितांत गरज आहे. भारतीय समाजात जात-धर्म-लिंग यावर आधारित विषमता दिसून येते. ही विषमता म्हणजे व्यक्तीच्या मानवी हक्कांचे उल्लंघन असते. प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने आणि निर्भयपणे जगता येणे, हे मानवी हक्कात अभिप्रेत आहे. पण इतक्या वर्षांत आपण प्रत्येक व्यक्तीला हा हक्क देऊ शकलो नाही. काही व्यक्तींनाच हा हक्क होता. काही जातीच्या, काही धर्माच्या आणि काही लिंगांचे लोकच निर्भयपणे जगत होते आणि आपल्या या हक्काचा वापर करत होते असे दिसते. खरे तर हा हक्क व्यक्तीच्या विकासासाठी आणि आनंदासाठीही आवश्यक आहे. सर्व समाजांत व्यक्तीला सन्मानाने जीवन जगता येईल अशी परिस्थिती निर्माण करणे हे मानवी हक्कांच्या सर्वव्यापी व्यवस्थेचा मुख्य उद्देश आहे. मानवी हक्क हे प्रत्येक व्यक्तीला जन्मत:च नैसर्गिकरीत्या प्राप्त होत असतात. कोणत्याही भेदभावाशिवाय प्रत्येक व्यक्तीला किमान जीवनस्तराची हमी देतात. या देशात जन्माला येताना माणूस कोणीच नसतो. नंतर त्याला नाव आणि जात, धर्म चिकटवले जातो. जन्माच्या दाखल्यापासूनच त्याचे लिंग, धर्म आणि जातीच्या दाखल्याची चर्चा केली जाते. अशा परिस्थितीत समानतेचे, समतेचे आणि मानवी हक्कांचे राज्य कसे अस्तित्वात येईल? भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार सर्वांना बहाल करायचा होता. पण आपल्याकडे जन्माला माणूस येतच नाही. मुलगा किंवा मुलगी येते. तसे त्याच्यावर बिंबवले जाते. तो अमुक एक धर्माचा घडवला जातो. त्यावर ती जात लादली जाते. हे सगळे सरकारी साक्षीने होत असते. कारण जन्माची नोंद करतानाच पालिकेचा, ग्रामपंचायतीचा कारकून लिंग, जात, धर्म लिहून घेतो. त्यामुळे विशिष्ठ जातीत, धर्मात आणि लिंगात अडकवून ठेवण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू होते. तेच प्रशासन शासकीय पातळीवर, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पातळीवर मानवी हक्क, समानता, समता यावर कार्यक्रम साजरे करते तेव्हा फार हसू येते. असे कार्यक्रम साजरे करण्यापूर्वी जात प्रमाणपत्र, धर्म प्रमाणपत्र यांच्या नोंदी करणे बंद केले तर सगळे सारखे दिसतील. शाळेच्या प्रवेश अर्जातही कोण कोणत्या जातीचा आहे, कोण कोणत्या धर्माचा, लिंगाचा आहे याची नोंद करून घेतली जाते. मग स्त्री-पुरुष हा भेदभाव तिथून सुरू होतो. शाळेच्या अर्जातील, दाखल्यातील धर्म, जात, लिंग आधी काढून टाकले गेले पाहिजे, तरच समानता प्रस्थापित होईल. आज स्त्रिया जगाच्या लोकसंख्येच्या पन्नास टक्केच्या आसपास आहेत. पण स्त्रियांच्या मानवी हक्कांचे हनन आणि लिंगाधारित हिंसा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. भारतात करण्यात आलेल्या एका पाहणीनुसार दर २४ मिनिटांना एक स्त्रीचे लैंगिक शोषण होते. दर ४३ मिनिटांना एक अपहरण होते. तर दर ५४ मिनिटांना एखादी महिला बलात्काराची बळी पडत असते. या आकडेवारीवरून स्त्रियांच्या मानवी हक्कांचे किती मोठ्या प्रमाणात हनन केले जाते याचे चित्र दिसून येते. पुरुषप्रधान भारतीय संरचनेने स्त्रिया आणि पुरुषांच्या भूमिका असमान पद्धतीने निश्चित केल्या आहेत. स्त्रियांनीही लिंगाधारित भेदभावाच्या परंपरांना कधी परिस्थितीवश, तर कधी अनिच्छेने वा स्वेच्छेने जीवनातील अपरिहार्य वास्तव म्हणून स्वीकारले आहे. हे काही चांगले नाही. आता परिस्थिती बदलत आहे, जग बदलले आहे असे नुसतेच म्हणायचे. काही प्रमाणात आपल्या मानवी हक्कांबाबत स्त्रिया जागरूक होऊन त्याविरोधात आवाज उठवत आहेत. पण त्या योग्य बाबतीत आवाज उठवत आहेत असे नाही. जन्माला आल्यावर हे भेदभावाचे प्रतीक चिकटवले जाते त्याबाबत आंदोलन होणे आवश्यक आहे. स्त्रियांच्या मानवी हक्कांच्या हननाची प्रक्रिया स्त्रीभ्रूणहत्या करून सुरू होते. स्त्री-पुरुष जन्मदरात सातत्याने ‍ºहास होताना दिसून येत आहे. अशा प्रकारे स्त्रियांचा जीवन जगण्याचा मूलभूत हक्कही हिरावला जातो. ज्या मुली वाचतात त्यांना पुढे आयुष्यभर आपल्या मानवी हक्कांच्या पूर्ततेसाठी संघर्ष करावा लागतो. त्यांना कुटुंबात मुलगी म्हणून भेदभावाची वागणूक दिली जाते. हा बदल शासकीय पातळीवर घडवणे आवश्यक आहे. त्यासाठी कोणत्याही दाखल्यात आणि नावनोंदणीत लिंग, धर्म, जात हा कॉलम रद्द केला पाहिजे.

।। दशक तिसरा : समास सातवा : आधिभौतिक ताप ।।



या समासात समर्थांनी आधिभौतिक तापाचे वर्णन केले आहे. भूतमात्राच्या म्हणजे बाह्य पदार्थांच्या संयोगाने जे सुखदु:ख निर्माण होते, त्या दुस‍ºया तापसंतापाला यथार्थ रीतीने आधिभौतिक असे म्हणतात. सर्व भुतांच्या संयोगाने जे सुखदु:ख उत्पन्न होते, त्याचा ताप होऊन मन दु:खी होते, बेचैन होते त्याला आधिभौतिक असे म्हणतात. आधिभौतिक तापाची लक्षणे अगदी स्वच्छ आणि सोप्या रीतीने वर्णन करून सांगतो. ती समजली की तापत्रय संपूर्णपणे कळतील. ठेचा लागणे, काटे मोडणे, हत्यारांचे घाव लागणे, शरीरात धस म्हणजे लाकडाचा बारीक काट्यासारखा तुकडा शिरणे, सराटे लागणे, अंगाची आग करणारी आग्या वनस्पती अंगास लागणे, अंगाला खाज असणारी खाजकुहिरी एकाएकी अंगास लागणे, गांधील माशी येऊन चावणे, मगरीने ओढून नेणे, एकाएकी पाण्यात बुडणे, पाय घसरून ओढ्याच्या प्रवाहात पडणे, विषारी सर्प, अजगर, मगरी, इतर जलचर प्राणी, अनेक जंगली जनावरे यांच्यापासून दु:ख होणे हा आधिभौतिक ताप.

अनेक प्रकारच्या कू्रर पशूंपासून दु:ख होणे, यातना देणारी अनेक असह्य दु:खे, भिंती व माळवदे किंवा गच्ची अंगावर कोसळणे, कोणाचा शाप बाधणे, कोणाचा जादूटोणा त्रास देणे, अकारण वेड लागणे, कुणीतरी खोटा आळ घेणे, कुणीतरी फास घालणे, दगडाखाली हात सापडणे, पळताना अडखळून पडणे हा आधिभौतिक ताप.


एकाएकी शरीर पडणे, किल्ल्यावरून खाली कोसळणे, झाडावरून पडणे, त्या दु:खाने मोठ्याने रडणे, थंडीने ओठ फुटणे, हात, पाय व टाचा यांना भेगा पडणे, जीभ पोळणे, परावलंबी असल्याने शिव्यांचा मार सोसावा लागणे, अन्नवस्त्राची उणीव असणे, मुलींना सासुरवासापायी गालगुच्चे, चूक झाली की कान पिळला जाणे किंवा डोळ्यांत हिंग घालणे, निरंतर धारेवर धरणे, दुष्ट माणसांनी नाना त‍ºहेची मारहाण करणे, आध्यात्मिक तापात सांगितलेले अनेक रोग होणे व त्यासाठी वैद्य, मांत्रिक बोलावणे हा ताप.

रोग बरा व्हावा म्हणून अतिकडक औषधे जबरदस्तीने पाजणे, निरनिराळ्या वनस्पतींचे रस, काढे व चाटणे घेताना जीव कासावीस होणे, नाना दु:खांचे आघात होणे, शिरा तोडणे, जळवा लावणे हा आधिभौतिक ताप असतो.


कितीतरी रोग आणि त्यांची कितीतरी औषधे आहेत. ते सांगू लागल्यास अमर्याद आहेत. त्यांच्यामुळे यातना होणे, आगीच्या जाळाचे चटके बसल्याने यातना होऊन व्याकूळ होणे, नुकसान झाल्यामुळे विव्हळणे हा त्रासच.

कितीतरी सुंदर मंदिरे, जडजवाहिराचे साठे, सुंदर किमती वस्त्रे, धान्ये, पदार्थ, पशू, घरात साठवलेला पैसा, भांडी, वस्तू, माणसे, शेते, धान्ये, गवताच्या गंजी, धान्याच्या सालपटांचे दिगरे, ऊस, इत्यादी एकाकी जळून जाते, अशी आग आपोआप लागली का कुणी मुद्दाम लावली हे जरी सोडले तरी तिच्यामुळे नुकसान होते व माणसे भाजतात. आग लागून होणारे अपघात पुष्कळच आहेत. पण त्यामुळे माणसाच्या मनाला होणा‍ºया यातना आधिभौतिक ताप होय. क्रूर स्वभावाची बायको मिळणे, मुलगी विधवा होणे, मुलगा मूर्ख असणे, यामुळे मनासारखा संसार नसणे, भूतपिशाच्य लागणे, अंगावरून वारे जाणे, मंत्राचा जप चुकल्याने भ्रम होणे, एखाद्या ब्रह्मसमंध शरीरात शिरून बरीच वर्षे त्रास देणे, शनीची वाईट दशा येणे हाही आधिभौतिक ताप.


इतर ग्रहांची वाईट दशा येणे, काळवार, कालतिथी, चंद्राचे अशुभ योग असणारी काळवेळ, घातनक्षत्र, शिंकेचा अपशकुन, पालीची चुकचुक, पिंगळा, कावळा, होला या पाखरांची अपशकुनी कलकल इत्यादी अपशकुनांनी मनामध्ये काळजीचा काळोख पसरणे, दिवटा म्हणजे रात्री मशालीच्या प्रकाशात भविष्य सांगत फिरणारा व सरवदा म्हणजे भविष्य सांगणारा हे दोघे काही तरी अशुभ भविष्य सांगून गेले, त्याच्या मनाला धक्का लागणे, असे नाना प्रकारचे मार भोगावे लागणे, हे या प्रकारातच मोडते.

टांगणे, चाप लावणे, दोन्ही हात मागे खेचून बांधणे, वेड्या घालणे, झाडाच्या बुंध्यावर नाल्याप्रमाणे वाकायला लावून मार देणे, कोलदांडे घालणे, इकडेतिकडे हलू न देणे, चुन्याचे पाणी, मिठाचे पाणी, मोहरीचे पाणी, गुळाचे पाणी, नाकात किंवा कानात किंवा घशात ओतल्यामुळे यातना होणे, पाण्यात बुचकळणे, हातपाय बांधून हत्तीपुढे टाकणे, जनावराप्रमाणे फटके मारून हाकणे, छळ करणे, उगाच कष्ट देणे, कान, नाक, हात, पाय, जीभ, ओठ तोडून टाकणे, बाणांचा मार देणे, सुळी देणे, डोळे काढणे, वृषण कापणे, बोटांच्या नखांमध्ये सुया टोचणे, पारड्यामध्ये घालणे, कडेलोट करणे, तोफेच्या तोंडी बांधून उडविणे, हा यातील त्रास.


कानात खुंट्या ठोकणे, गुद्द्वारात मेख मारणे, अंगाचे कातडे सोलणे, पोत्यात भरून मारणे, बोटे ठेचून टाकणे, गळ्याला गळ लावणे, तापविलेल्या चिमट्याने वृषण किंवा स्तन दाबणे, उकळते शिसे पाजणे, जालीम विष पाजणे, डोके उडविणे, अंगावर माणसे नाचवून मारणे, अंगावरील कपड्यात कुत्री, वाघ, भुतेखेते, सुसरी, शस्त्रे, विजा यांचा अतिरेक होऊन जीवितांची हानी होणे, अंगातील शिरा तोडणे, जळत्या टेंभ्यांनी चटके देणे व भाजून काढणे, अशा अनेक यातना भोगणे, मनुष्य, द्रव्य, वैभव, मोठेपणा, जनावरे व चीजवस्तू यांची हानी होणे, बाळपणी आई मरणे, तरुणपणी बायको मरणे, म्हातारपणी मुलगा मरणे, दु:ख, दारिद्र्य, कर्ज, परदेशी पळून जाणे, लूट होऊन सर्वस्वी नागवले जाणे, संकटे येणे, अंगावर जड वस्तू पडणे, वाईट अन्न खाण्याचा प्रसंग येणे, कॉल‍ºयाच्या साथीने हजारो माणसे मरणे, युद्धात पराजय होणे, जिवलगांचा मृत्यू होणे, आधीच कठीण काळ असून त्यात दुष्काळ येणे, मनात धाकधूक असून त्यात वेळ वाईट येणे, उद्वेग उत्पन्न होणे, काळजीने जीवाचे हाल होणे हा आधिभौतिक ताप.

घाण्यात किंवा चरक्यात शिरून चाकाखाली सापडणे, निरनिराळ्या प्रकारच्या आगीत पडणे, अनेक शस्त्रांनी अवयव तुटणे, अनेक जंगली जनावरांनी खाऊन टाकणे, अनेक लोकांच्या कैदेत अडकणे, वाईट जागेत राहावे लागल्याने जीव घाबरणे, अनेक प्रकारच्या अपमानाने लाजिरवाणे वाटणे, अनेक प्रकारच्या दु:खाने खंगून जाणे. आतापर्यंत वर्णन केले अशा प्रकारचे दु:खाचे अपार डोंगर आहेत. ते सगळे सांगता येणार नाहीत. पण जे येथे सांगितले आहेत त्यावरून श्रोत्यांनी आधिभौतिक तापाचा विचार समजून घ्यावा.


प्रफुल्ल फडके/ बोध दासबोधाचा


अपघात रोखण्याचा मार्ग कोणता?



समृद्धी मार्ग, ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरील अपघातांचे प्रमाण गेल्या काही दिवसांत खूपच वाढले आहे. तसे या महामार्गांचे काम सुरू झाल्यापासूनच सतत या ठिकाणी अपघात होत गेले आहेत. पण हे अपघात रोखणारी कोणतीही यंत्रणा ना सरकारने उभी केली, ना ज्या टोल कंपन्या खो‍ºयाने पैसा ओढत आहेत त्या कंपन्या व त्यांच्या ठेकेदारांनी त्यासाठी प्रयत्न केले नाहीत.

प्रसिद्ध झालेल्या एका सरकारी आकडेवारीनुसार देशात दरवर्षी सुमारे पाच लाख रस्ते अपघातांत दीड लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू होतो. यातील बहुसंख्य अपघात बेदरकारपणे वाहन चालवण्याने, वाहतुकीचे नियम सरळ सरळ धुडकावून होत असतात. बहुसंख्य अपघातांत वाहनचालकाकडे वाहन चालवण्याचा परवाना असतो. अपघात का कसे होतात, ते कोणत्या रस्त्यावर अधिक होतात, अशा अपघातांना वाहनचालकांची बेदरकारी कितपत जबाबदार असते, अशा अपघातात वाहनांचे कमी नुकसान व्हावे म्हणून वाहनांच्या रचनेत काय बदल असायला हवेत, रस्ते वेगवान वाहतुकीसाठी कोणत्या प्रकारचे असायला हवेत, येथेपासून वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी कोणती पावले उचलायला हवीत याचा सर्वांगीण अभ्यास पाश्चात्त्य देशात सातत्याने केला जात असतो. त्यामुळे परदेशात वाहन अपघातात बळी जाणा‍ºयांची संख्या आपल्याकडील अपघातांच्या तुलनेत खूपच कमी आहे. अर्थात आपल्याकडची लोकसंख्या आणि वाहनांची संख्या पाहता हा आकडा अधिक असणे स्वाभाविक आहे. पण आपल्याकडे वाहतूक रस्ते अपघात यांचा साकल्याने विचार करणारी व्यापक यंत्रणा नाही. त्याचे कारण त्याला अत्यावश्यक असणारे तंत्रज्ञान नाही.


आपल्याकडे एखादा मोठा अपघात होऊन बळींची संख्या वाढल्यानंतर किंवा सिनेस्टार, सेलिब्रिटीज किंवा नेतेमंडळी वगैरे अपघातात जखमी किंवा बळी गेल्यानंतर वाहतूक सुरक्षिततेवर जोरदार चर्चा होते. प्रख्यात उद्योगपती आणि बिल्डर डी. एस. कुलकर्णी यांचा दहा वर्षांपूर्वी एक असा अपघात झाल्यानंतर त्यांनीही त्याविरोधात आवाज उठवला होता. पण नंतर त्यांची आर्थिक घोटाळ्यामुळे तुरुंगात रवानगी झाली आणि त्याची हवा कमी होत गेली. त्यानंतर अगदी दुसरा अपघात होईपर्यंत कोणालाही त्याची काही पडलेली नसते.

पण रस्ते अपघात रोखण्यासाठी होणारे प्रयत्न चर्चांपुरते मर्यादित राहतात. केंद्रातल्या एनडीए सरकारला देशातील एकूण रस्ते अपघातात मरणा‍ºयांची टक्केवारी निम्म्यावर आणायची आहे हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या हेतूने दहा वर्षांपूर्वी नवे मोटर व्हेईकल (अमेंडमेंट) बिल-२०१६ कॅबिनेटने मंजूर केले. या बिलामध्ये वाहतुकीचे नियम तोडणा‍ºया वाहनधारकांना जबरी दंड ठोठावण्याची तरतूद आहे. ही दंड आकारणी प्रत्यक्षात आल्यास लोकक्षोभ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या नव्या बिलातील काही नियम दैनंदिन जीवनात रोज वाहने वापरणा‍ºयांना जाचक आहेत. त्यातील काही महत्त्वाचे नियम म्हणजे, वाहन चालवताना परवाना नसल्यास थेट हजार रुपये दंडवसुली. परवाना नसताना वाहन चालवले असेल तर अशी दंड आकारणी करणे योग्यच आहे. त्याला कोणी विरोधकांनी राजकारण करून विरोध केला तर हे सगळे कायदे मोडणारे आहेत हे स्पष्ट होईल. तसेच वाहनाचा विमा नसल्यास हजार रु. दंड (सध्या हजार रु.), छोटे वाहन वेगाने हाकल्यास हजार रु. दंड, हलक्या वाहनास हजार रु. (सध्या ४०० रु.), दारूच्या नशेत किंवा अतिरिक्त सेवन करून वाहन चालवल्यास १० हजार रु. दंड. हे सगळे दंड मान्य केले तर अपघातांचे प्रमाण रोखता येईल. फक्त हेल्मेटविना वाहन चालवल्यास हजार रु. दंड (सध्या १०० रु.) आकारण्यात येणार आहे, तो जाचक आहे. त्यात सुधारणा करून महामार्गावरूनच फक्त हेल्मेट सक्ती असावी, शहरी भागात असू नये. याशिवाय वाहन परवाना महिन्यांसाठी निलंबित करण्याची तरतूद आहे. ही तरतूद हेल्मेट सक्तीसाठी अनावश्यक आहे. त्याचा दुरूपयोग होऊ शकतो, त्यामुळे अपघात रोखता येणार नाहीत. सीटबेल्टशिवाय कार चालवल्यास हजार रु. दंड (१०० रु.), वाहतुकीचे नियम मोडल्यास ५०० रु. तर वाहतूक नियंत्रण अधिका‍ºयाशी असहकार केल्यास हजार रु. दंड अशा तरतुदी आहेत. या ठिक आहेत. कारण थोडे कडक धोरण आखल्याशिवाय काही फरक पडणार नाही. पण तो पोलिसांना खाण्याचा नवा मार्ग झाला तर ती चिंतेची बाब ठरेल. हजार रुपये दंड भरण्यापेक्षा पोलिसांना शंभर रुपयात पटवले. म्हणजे, या एकूण नव्या नियमावलीत अधिक दंड दिल्यामुळे लोकांचे जीव वाचतील, अशी सरकारची भाबडी समजूत आहे. जेवढी दंडाची रक्कम अधिक तेवढा भ्रष्टाचाराला वाव हा सामाजिक नियम सरकारला माहीत नाही. त्यामुळे दहा वर्षांत असा कायदा करूनही आपण अपघातांवर नियंत्रण मिळवू शकलेलो नाही.


वाहनधारकांचा सरकारला सरळ प्रश्न असतो की, तुम्ही कर घेऊन रस्ते कसे देता? वाहनधारकाकडून चूक होऊ शकते त्या चुका कमी करण्यासाठी सरकारने वाहतूक व्यवस्थेत अद्ययावत तंत्रज्ञान आणण्याची गरज आहे. तसे प्रयत्न या नियमात दिसत नाहीत. लोकांवर अविश्वास दाखवून दंडवसुली कडक करण्यापेक्षा आपल्या सर्व यंत्रणा सक्षम करणे ही सरकारची जबाबदारी आहे. त्याचप्रमाणे चांगले रस्ते निर्माण करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. रस्ते अपघात रोखण्यासाठी चांगले रस्ते देणे ही जबाबदारी आहे, त्याचप्रमाणे त्या ठेकेदारावर प्रत्येक अपघातामागे दंडात्मक कारवाई केली पाहिजे.

दशक तिसरा : समास आठवा : आधिदैविक ताप



समर्थ रामदास स्वामींनी दासबोधातील तिसºया दशकातील स्वगुणपरीक्षा या दशकातील आठव्या समासात आधिदेविक तापाबाबत वर्णन केले आहे. समर्थ म्हणतात की, मागील दोन समासांत आध्यात्मिक आणि आधिभौतिक ताप सांगितले. आता आधिदैविक ताप सांगतो, ते सावधपणे ऐका.

इथे समर्थ म्हणतात की, आपल्या चांगल्या-वाईट कर्माप्रमाणे आपण मेल्यानंतर आपल्याला ज्या यमयातना किंवा स्वर्ग-नरक यांचे भोग भोगावे लागतात त्यांना आधिदैविक ताप असे म्हणतात. श्री समर्थांचे सांगणे हे आहे की, मानवी समाजात अनेक शक्ती वावरतात. त्यापैकी एक किंवा अनेक शक्ती माणसाला वश होऊ शकतात. त्याचा उपयोग करून त्याने केवळ स्वार्थ साधणे हीच अनीती व हाच अन्याय असतो. अशा माणसाला या जगातील सुखसोयी मिळतात हे उघड दिसते. परंतु मृत्युनंतर त्याचा वचपा निघतो हे कोणी विसरू नये. माणसांना त्याच्या चांगल्या-वाईट कर्मांनी मरणानंतर यमयातना, स्वर्ग-नरक, असे अनेक भोग भोगावे लागतात. त्यांना आधिदैविक ताप असे म्हणतात. माणूस मदांध होऊन अविचारी बनतो, अविचाराने तो अनेक दोष व पातके करतो. ती दु:ख देणारी असल्याने यमयातना भोगाव्या लागतात.


समर्थ म्हणतात की, अंगबळ, द्रव्यबळ, मनुष्यबळ, शासनबळ, अशा निरनिराळ्या शक्तींच्या जोरावर माणूस वाईट कर्म करतो. खरोखर मनुष्य नीती बाजूस सारतो आणि करू नये ते करतो. मग यमयातना भोगताना त्याचा जीव कासावीस होतो. माणूस अतिस्वार्थबुद्धीने अंध बनतो, त्यात अतिलोभ आणि वाकडी बुद्धी ठेवतो. मग त्यांच्या बळाने पुढील गोष्टी करतो. निर्वाहाचे साधन जी जमीन तिची हद्द वाढविणे, दुसºयाचे द्रव्य, बायको व इतर वस्तू पळविणे किंवा लांबविणे, सदा मस्तवालपणे, उन्मत्तासारखे वागणे, जीवाचा नाश करणे, समाजविध्वंसक कर्म करणे, इत्यादी म्हणून असे कर्म करण‍ाºया माणसाला यमयातना भोगाव्या लागतात. नीतिन्यायाची मर्यादा सोडून वागले तर गावाचा स्वामी त्याला शासन करतो. देशाच्या स्वामीला राजा शासन करतो. राजा जर नीतिन्यायाने वागत नसेल तर देव त्याला शासन करतो. राजाला यमयातना भोगाव्या लागतात. जो राजा अनीतीने स्वार्थ साधतो, तो पापी बनून राहतो, त्याचे पाप संचात जाते म्हणून तो मेला व राज्य संपले की त्याला नरकवास मिळतो. राजाने राजाला आवश्यक ती नीतिमर्यादा सोडली की, त्याला यम शासन करतो. पण यमाने नीतिमर्यादा सोडली तर देवगण धावून येतो व त्याला शासन करतो. भगवंताने अशी ही मर्यादा घालून दिली आहे, म्हणून सर्वांनी नीतीने वागावे. नीतिन्याय झुगारून वागल्यास यमयातना भोगाव्या लागतात.

यानंतर समर्थ या समासात मरणोत्तर भोगांचे तंत्र कोणते ते सांगतात. ते म्हणतात की, देव यमदेवतेला प्रेरणा देऊन तिच्या द्वारे जीवाला भोग हे भोग भोगायला लावतो. म्हणून त्यांना आधिदैविक म्हणतात. यमयातनांचा हा ताप फार दु:सह व दुर्गम आहे. शास्त्रांमध्ये यमदंड व यमयातना यांचे अनेक प्रकार सांगितले आहेत. तो भोग कधीही चुकविता येत नाही. यासाठी त्याला आधिदैविक म्हणतात. माणूस जी नाना प्रकारची दुष्कर्मे करतो त्यांचे सगळे दोष त्याच्या सूक्ष्म शरीरात साठविलेले असतात. त्या दोषांनुसार त्याला यमयातनेचे क्लेश सोसावे लागतात. शास्त्रामध्ये त्याचे सविस्तर वर्णन आढळते. मरणोत्तर लोकांत पाप-पुण्याची शरीरे असतात. मनुष्य मेल्यावर त्याचा सूक्ष्म देह त्याच्या पाप-पुण्यानुसार त्या शरीरात घालून मग त्याला त्याच्या पापाची व पुण्याची फळे भोगावी लागतात. ज्याच्या पदरी पुण्य पुष्कळ त्याला स्वर्गसुखाचे विलास पुष्कळ तर ज्याच्या पदरी पाप पुष्कळ त्याला नरकयातनांचे क्लेश पुष्कळ होतात. असे शास्त्रात सांगितले आहे, त्यावर अविश्वास धरू नये. त्यामध्ये तथ्य आहे.


यमयातना म्हणजे काय क्लेश असतात याचे वर्णन स्वामी इथे करतात. जे वेदाज्ञा पाळीत नाहीत, हरिभक्ती करीत नाहीत त्यांना यमयातना भोगाव्या लागतात. अक्षोम नावांच्या नरकांत अगणित जुने किडे वळवळ करीत असतात. पापी माणसाला यम त्यामध्ये हातपाय बांधून फेकतो. काही पापी जीवाना कुंभपाकात टाकतात. कुंभपाक म्हणजे अगदी लहान तोंडचे पण आत मोठी जागा असलेले मडक्यासारखे कुंड. त्या कुंडात अत्यंत उकाडा व दुर्गंधी असते. जीवाला तापलेल्या भूमीवर भाजतात, जळत असलेला लाकडी खांब पोटावर फिरवतात, अनेक प्रकारचे चाप लावतात. यांच्या शिक्षेमध्ये मारण्याचे प्रकार पुष्कळ आहेत. क्लेश देण्याची साधने यामापाशी पुष्कळ आहेत. पापी माणसांना त्याच्या यातना भोगाव्या लागतात. या जगात मार देण्याचे पुष्कळ प्रकार आहेत. पण यमयातना त्याच्यापेक्षा सोसण्यात अधिक कठीण असते. तेथील मार थांबतच नाही.

चार जण चार बाजूंनी खेचतात. कोणी झोके देऊन पडतात, ताणतात, मारतात किंवा फरफटत ओढून नेतात. तेथे उठवत नाही, बसवत नाही, रडवत नाही, एकामागून एक यातनासारख्या चालू असतात. जीव तेथे रडतो, मोठ्याने गळा काढतो, गहिवरतो, फुसफुसतो, तेथील धक्काबुक्कीने घाबरतो, सारखी झुरणी लागल्याने हाडांचा सापळा उरतो, तरी झीज चालूच राहते. कठोर बोलून कठोर मार देतात. यमयातनेचे असे अनेक प्रकार आहेत. पापी माणसांना त्यांचा त्रास भोगावा लागतो. मागील समासांत राजा ज्या शिक्षा देतो त्या सांगितल्या. पण यमाच्या शिक्षा त्याहून पुष्कळ आहेत. यमयातना प्रचंड आहेत, भयंकर आहेत, फार अकराळ विकराळ आहेत. आध्यात्मिक, आधिभौतिक आणि त्याहून विशेष असा आधिदैविक हे तीन ताप थोड्या लक्षणांसहित समजण्यासाठी म्हणून इथे सांगितले आहेत.


- प्रफुल्ल फडके/बोध दासबोधाचा


डोळसपणे पाहा



साधारण दहा, अकरा वर्षांपूर्वी अ‍ॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कूक यांनी दादर मुंबई येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. हिंदू धर्म आणि संस्कृती जगात सुप्रसिद्ध आहे. त्यामुळे अनेक महनीय व्यक्ती अशा ठिकाणी दर्शनाला येत असतात. पण एक लक्षात घेतले पाहिजे की, आपल्या धर्मातील देवतांचे महत्त्व हिंदुंना माहीत नसेल त्याहून अधिक इतरांना माहीत असते. आपले लोक मात्र आपल्याच देवतांची विटंबना करण्यात धन्यता मानतात. देव आहे की नाही? त्याचे सोवळे, त्याच्या परंपरा यावर वाद घालून केवळ दंगा करण्यापलीकडे आणि प्रसिद्धीपलीकडे आपण काहीच करत नाही. पण अन्य धर्मीयांना आणि पाश्चिमात्यांना या देवांचे आकर्षण आहे हे विशेष म्हणावे लागेल.

सुखकर्ता, विघ्नहर्ता आणि बुद्धीची देवता असलेल्या मंगलमूर्तीचे महत्त्व टीम कूक यांना ठाऊक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अ‍ॅपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्सही हिंदू संस्कृतीकडे आकर्षित झाले होते. त्यांनी हरिद्वार येथे काही काळ वास्तव्य केले आहे. हिंदू धर्मातील विविध गोष्टींचा विदेशी व्यक्ती केवळ वरवर अभ्यास न करता त्यांच्यातील जिज्ञासू वृत्तीद्वारे हा धर्म नक्की काय आहे हे जाणून घेण्याचा ते प्रयत्न करत असतात. पण आपल्याकडे मात्र भालचंद्र नेमाडेंसारखे तथाकथीत विचारवंत लेखक हिंदू धर्म एक अडगळ नावाची कादंबरी लिहून धर्म, देव आणि प्रथांवर टीका करतात. त्यांना सरकारी पुरस्कार देऊन गौरवले जाते. त्यांना ज्ञानपीठ म्हणून गौरवले जाते. हा सगळा विरोधाभास आहे.


पाश्‍िचमात्य आणि अन्य धर्मीय लोक भारतीय संस्कृती समजून घेण्यासाठी काही महिने भारतात वास्तव्य करून येथील मंदिरांत जाऊन काय वाटते याची अनुभूती घेत असतात. अनेक पाश्‍िचमात्य लोक गेल्या काही वर्षांपासून पंढरपूरची वारी करताना दिसतात. म्हणजे त्यांना आपल्या परंपरेचे अप्रूप वाटते, महत्त्व कळले आहे, पण आम्ही मात्र आमच्याच देवधर्मावर टीका करतो, त्या प्रथा मोडतो. शनिच्या चौथ‍ºयावर चढतो, देवीच्या गाभा‍ºयात घुसतो तर कधी पाळी आल्यावर पूजा केली तर काय होते? पाळी येणे आम्हाला अभिमानाचे आहे वगैर निरर्थक चर्चांमध्ये वेळ घालवतो. पण पाळी आल्यावर आपल्याकडे समारंभ आणि आनंद करण्याची प्रथा फार पूर्वीपासून आहे. महाराष्ट्रात पूर्वी न्हाण आल्यावर त्या मुलीला ओटी भरून मखरात बसवायची प्रथा होती. पण या पाळीचा नको तो अर्थ काढून धर्मच विटाळायचा प्रकार सुधारणावादी, पुरोगाम्यांनी केला.

वास्तविक व्यापक विचारधारा शिकवणारा असा हा धर्म असल्याने या ठिकाणी संकुचितपणास थारा नाही. अशा या महान धर्मात जन्म होणे हे आपले अहो भाग्यच! भारत ही आध्यात्मिक भूमी असल्याने येथे आल्यावर आपल्या देशापेक्षा पुष्कळ वेगळे वाटते असे अनेक विदेशी नागरिक सांगत असतात. शिकण्याची इच्छा असेल तर मार्ग सापडतोच. निस्वार्थपणे भक्ती करणाºयास त्याचे उचित फळ मिळतेच. नाशिक येथे कुंभमेळा सुरू होईल आणि सध्या उज्जैन (मध्य प्रदेश) येथे जो कुंभमेळा सुरू आहे. त्यातही अनेक विदेशी नागरिक हे सर्व कशासाठी केले जाते, हे अभ्यासपूर्णपणे जाणून घेताना आढळतात. त्याचा आनंद घेतात. अनुभूती घेतात. आम्ही मात्र सैराट सुटलो आहोत आणि आमच्याच प्रथा कशा चुकीच्या आहेत हे अभ्यास न करता बोलत आहोत. पण कुक यांच्यासारख्या अनेकांनी सिद्धिविनायकाचे, भारतातील मंदिरे आणि सण, उत्सव याचे दर्शन घेतल्यानंतर अनेकांचे डोळे उघडण्यास हरकत नाही.


रूढी, परंपरा, प्रथा यामध्ये कालानुरूप बदल करून नव्या पद्धतीने आनंद घेण्यास शिकले पाहिजे. ज्या काळात वीज नव्हती, लाईट नव्हते तेव्हाही घराघरांत गणपती बसत होते. तेव्हा निरांजन, समई, पणत्या यांचा लखलखाट असायचा. दसरा, दिवाळीला लाईटच्या माळा नाहीत तरी पणत्यांची रोषणाई होती. आता विजेचे दिवे आले आहेत. त्या त्या प्रमाणात आधुनिक पद्धतीने रूढी प्रथा सांभाळणे उचित आहे. पण त्या प्रथाच बंद करा म्हणून त्याकडे पुरोगामी म्हणवून घेऊन चुकीच्या नजरेने पाहणे हे फार चुकीचे आहे. पाश्‍िचमात्यांना, परधर्मीयांना समजले पण आम्हाला हे समजणार नसेल तर आमच्यासारखे कर्मदरिद्री कोणी नाही.

आता यावरून कोणी सिद्धिविनायकालाच का गेले? अंबाबाईला का गेले नाहीत? विठोबाला का गेले नाहीत? असे प्रश्‍न विचारून अनेकांनी त्यानंतर देवादेवातही भेदभाव करण्याचा अधमपणा केला होता. नशिब तृप्ती देसाई यांनी गणपती सिद्धिविनायक पुरूष आहे, म्हणून कूक यांना त्यांना भेटवले गेले. हा स्त्रियांचा अपमान आहे म्हणून सरकारवर ताशेरे ओढले नाहीत. पण मुंबईतील महत्त्वाचे देवस्थान सिद्धिविनायक असल्याने तेथील दर्शन घेतले. ते कोल्हापुरात आले असते तर अंबाबाईचे दर्शन घेतले असते, पंढरपुरात आले असते तर विठोबाचेच दर्शन घेतले असते हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे मुद्द्याला बगल देऊन आपल्या धर्माला नावे ठेवणे, टिंगल करणे यापेक्षा त्यातील चांगले काय आहे? त्यातून कसे काय आनंद मिळतो याचा अनुभव घ्यावा. आपल्या धर्म संस्कृतीकडे डोळसपणे पाहायला हवे.

।। दशक तिसरा : समास नववा : मृत्युनिरूपण।।



दासबोधातील तिसºया दशकातील नवव्या समासात समर्थ रामदास स्वामींनी मृत्यूनिरूपण केलेले आहे. मानवी जीवनाचा प्रवाह काळाच्या स्वामित्वाखाली अखंड वाहतो. मृत्यूकडे त्याची दिशा आहे. मृत्यू कसा व कुठे यायचा ते माणसाच्या कर्मानुसार ठरते, पण मृत्यू आला की, कोणीही वाचवू शकत नाही. समर्थ सांगतात की, संसार म्हणजे सारखा धावणारा स्वार आहे. संसारात मरणाची घटना आधार नाही, आजची उद्यावर ढकलता येत नाही. माणसाच्या देहाला क्षणाक्षणांचे माप लावलेले आहे, त्याचे आयुष्य क्षणाक्षणांनी संपत आहे.

जन्माला आल्यापासून काळसारखा बरोबर असतो. पुढे काय घडणार आहे ते कळत नाही. जसे ज्याचे कर्म असेल तसे माणूस स्वदेशी अथवा परदेशी देह ठेवतो. पूर्वसंचित संपूर्णपणे संपले की, मग क्षणभरही अवकाश राहत नाही. अखेरचे मिनिट संपते न संपते तोच देह सोडून जावे लागते. काळाचे दूत एकदम येतात, जीवाला मारीत सुटतात आणि पुढे घालून मृत्यूच्या मार्गाने घेऊन जातात. एकदा मृत्यूचा वेढा पडला की, माणसाला कोणीही पाठीशी घालू शकत नाही, वाचवू शकत नाही. सर्व प्राण्यांना मृत्यू जणू काय चूर्ण करून टाकतो. कोणाची पाळी आधी तर कोणाची मागून येते इतकेच. अंतकाळ ही एक जबर काठी आहे. बलवानाच्या डोक्यात देखील ती बसते. बलाढ्य महाराजेसुद्धा मृत्यूपुढे टिकत नाहीत.


यानंतर मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रांतील लहानथोर माणसे अखेर कशी मरणाधीन आहेत याचे फार सुरेख वर्णन समर्थ करतात. सबंध मानवी जीवन श्री समर्थांच्या पुढे जणू काय हात जोडून उभे आहे असे वाटते. एकदा अंतकाळ आला की, मग मृत्यू जसा विचार करीत नाही की हा क्रूर, झुंझार किंवा रणांगणावर संग्रामशूर आहे. हा रागीट, प्रतापी किंवा उग्र रूपाचा मोठा दुष्ट आहे. हा बलाढ्य, धनाढ्य किंवा सर्व गुणांनी संपन्न आहे. हा विख्यात, श्रीमंत किंवा अद्भुत पराक्रमी आहे. हा भूपती म्हणजे राजा, चक्रवर्ती म्हणजे महाराजा किंवा सम्राट किंवा युक्तीबाज किंवा मंत्रतंत्र जाणणारा आहे.

हा घोडे बाळगणारा, हत्ती बाळगणारा किंवा अनेक माणसे पदरी बाळगणारा विख्यात राजा आहे. हा लोकात श्रेष्ठ, राजकारणी किंवा स्वत: वतनदार असून अनेकांना वतने देणारा आहे. हा व्यापारधंदा करणारा किंवा हे निरनिराळ्या गावचे पुंडराजे आहेत. हा सरकारी शिक्क्याचा अधिकारी, व्यापारी, ही परदारा किंवा राजकन्या आहे. हे कार्य, हे कारण, हा उच्चवर्णीय, हा नीचवर्णीय, किंवा हा कर्मनिष्ठ ब्राह्मण आहे. हा विद्यासंपन्न, द्रव्यसंपन्न किंवा हे सभेतील मोठे पंडित आहेत, हा धूर्त, हा बहुश्रुत किंवा मोठा सज्जन पंडित आहे. हा पुराणिक, याशिक, वैदिक किंवा ज्योतिषी आहे. हा अग्निहोत्री, हा वेदांचा ज्ञाता, मंत्रयंत्र जाणणारा किंवा सारे वेद अभ्यासलेला आहे. हा शास्त्रज्ञ, वेदज्ञ किंवा सर्व जाणणारा सर्वज्ञ आहे. ही ब्रह्महत्या, गोहत्या किंवा स्त्रिया व लहान मुले यांची हत्या आहे. हा रागज्ञानी, तालज्ञानी किंवा तत्त्व जाणणारा मोठा तत्त्वज्ञानी आहे. हा योगाभ्यासी, हा संन्यासी किंवा योगबलाने काळाला फसविणारा आहे. हा सावध, सिद्ध किंवा प्रसिद्ध वैद्य व पंचाक्षरी आहे. हा गोसावी, तपस्वी, तेजस्वी किंवा मोठा अनासक्त आहे. या कशाचाही विचार इथे होत नाही.


हा ऋषीश्वर, कवीश्वर, दिगंबर किंवा समाधिस्थ आहे. हा हटयोगी, राजयोगी किंवा सदा सर्वकाळ विरक्त आहे. हा ब्रह्मचारी, जटाधारी, काहीच न खाणारा किंवा मोठा योगी आहे. हा संत, महंत किंवा हवे तेव्हा गुप्त होणारा आहे. हा स्वाधीन आहे किंवा पराधीन आहे. अशा रीतीने सर्व जीवांना मृत्यू खाऊन टाकतो. काही जीव जन्मास आल्यावर लगेच मरून जातात, काही जीव अर्धे आयुष्य जगून मरण पावतात, तर काही जण म्हातारपणी मरतात. मृत्यू हे पाहत नाही की हा बाल, तरुण, सुलक्षणी, शहाणा किंवा पुष्कळ बोलणारा आहे, हा पुष्कळांचा आधार, उदार, सुंदर किंवा चौफेर ज्ञानसंपन्न आहे. हा पुण्य पुरुष, हरिदास किंवा विशेष सत्कर्म करणारा आहे, हे मृत्यू ओळखीत नाही.

सर्व दृश्य विश्वाला मृत्यू अटळ आहे. जो जन्मास येतो तो हमखास मृत्यू पावतो. मृत्यूच्या तडाख्यांतून कोणीही सुटू शकत नाही. या सबंध दृश्य विश्वाला आज ना उद्या मृत्यूच्या मार्गांने जावे लागते. जारज, स्वेदज, उदिभज आणि अंडज असे प्राण्यांचे चार प्रकार. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी या चार वाणी, चौºयाऐशी लक्ष जीवांचे प्रकार हे सगळे म्हणजे जे जे जीव दृश्य विश्वात देह घेऊन जन्मास येतात त्यांना मृत्यू आल्यावाचून राहत नाही. मृत्यूला घाबरून, त्याच्या भयाने कुठे पळून जावे म्हटले तरी मृत्यू काही कधी कोणाला सोडीत नाही. वाटेल ते केले तरी मृत्यू काही चुकविता येत नाही.


समर्थ म्हणतात की, मृत्यूबद्दल केलेले हे विवेचन ऐकून श्रोत्यांनी रागावू नये. हा मृत्युलोक आहे हे सर्वजण जाणतात. सर्व लहानथोरांना याची स्पष्टपणे जाणीव आहे. पण कोणी त्याबद्दल संशय बाळगला तरी हा मृत्युलोक काही बदलणार नाही. त्यानंतर पुढील बारा ओव्यांमध्ये श्री समर्थ असे सांगतात की जीवनाच्या विविध क्षेत्रांत ज्यांनी आपला पराक्रम गाजविला, ज्यांनी जगामध्ये उलथापालथ केली. असे सर्व स्त्री-पुरुष अखेर मृत्यूने नाहीसे केले. मोठ्या वैभवाचे, आयुष्याचे, असीम प्रभावाचे पुरुष मृत्युपंथाने गेले. मोठ्या पराक्रमाचे, मोठी कपटकर्मे करणारे पुरुष गेले. मोठे शूर योद्धे युद्धामध्ये मरण पावले. मोठ्या बळाचे, फार काळ जगलेले, अनेक कुळांमधील मोठे कुळवंत राजे, सगळे गेले. पुष्कळांना पोसणारे, मोठे बुद्धी चालविणारे, मोठ्या युक्तीने तर्क करणारे, तर्कवादी, सगळे गेले. विद्येचा सागर असणारे, बळाचा डोंगर असणारे, कुबेराप्रमाणे धन असणारे, सगळे मृत्युपंथाने गेले. मोठ्या पुरुषार्थाचे, मोठ्या पराक्रमचे, मोठा व्याप सांभाळणारे कार्यकर्ते, सगळे गेले. मोठे शस्त्रधारी, मोठे परोपकारी, नाना प्रकारांनी धर्माचे रक्षण करणारे, सारे गेले. मोठ्या प्रतापाचे, मोठ्या सत्कीर्तीचे, मोठ्या नीतीचे नीतिमान राजे, सगळे गेले. मोठे मतवादी, मोठे कार्यवादी, अनेक प्रकारचे मोठमोठे वाद खेळणारे, सारे गेले. असे सारे गेले पण संत मात्र टिकले. याप्रमाणे सगळे गेले. परंतु आत्मज्ञान होऊन जे स्वस्वरूपाशी एकरूप झाले तेवढे मात्र टिकले.

- प्रफुल्ल फडके/बोध दासबोधाचा



स्वयंसेवी संस्थांवर लक्ष असावे


भारतात सध्या दहशत कोणाची असेल तर ती स्वयंसेवी संस्थांचीच आहे. म्हणजे अगदी कुत्र्यांना संरक्षण द्या म्हणून कुत्र्यांसारख्या उपद्रवी प्राण्यासाठी स्थापन झालेल्या प्राणीमित्र संघटना असोत, नाही तर अनेक स्वयंसेवी संघटनांशी संबंधित असणारे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल असोत. या सगळ्यांनी स्वार्थापलीकडे समाजाचे कोणतेही हित साधलेले नाही. त्यामध्ये आपल्या देशाचेही फार मोठे नुकसान झालेले आहे हे लक्षात घेण्याची गरज आहे. किंबहुना माहितीचा अधिकार आणि स्वयंसेवी संघटनांच्या माध्यमातून लूटमार करणाºया नव्या टोळ्या या देशात दहशत माजवत आहेत हे लक्षात घेतले पाहिजे.

या देशातील न्यायव्यवस्थेत, कायदा आणि सुव्यवस्थेत लूडबूड करण्याचे कामही प्रसंगी या स्वयंसेवी संस्था करतात. याचे उदारहण म्हणजे काही वर्षांपूर्वी घडलेल्या इशरत जहान प्रकरणाचा उल्लेख करावा लागेल. इशरत जहानच्या चकमकीनंतर भारतातल्या अनेक मानवतावादी संस्था किंवा स्वयंसेवी संस्था कमालीच्या अस्वस्थ झाल्या होत्या. चकमकीची बातमी आल्यापासून त्यांनी ती चकमक खोटी असल्याचा दावा केला आणि संपूर्ण चौकशीची मागणी केली. पण चौकशीपूर्वी ती चकमक खोटी असल्याचा अशा लोकांचा निष्कर्ष तयारच होता. देशद्रोही शक्तींना पाठीशी घालण्याचा एवढा आटापिटा या स्वयंसेवी संस्था का करत होत्या? कारण या संस्थाच दहशतवादी आहेत.


याकुब अफजलपासून इशरतपर्यंत देशाचे शत्रू मानल्या गेलेल्या लोकांविषयी या स्वयंसेवी मंडळींना इतकी आपुलकी कशाला असते? भारतातल्या स्वयंसेवी संस्थांचे परकीय वा देशाच्या शत्रू मानल्या गेलेल्यांशी इतके साटेलोटे कशासाठी असते? अशा संबंधांची इतकी बारीक गुंतागुंत असते की, त्याचे धागेदोरे सापडणेही अशक्य होऊन जाते. पंधरा वर्षांपूर्वी पाकिस्तानच्या अबोटाबाद शहरामध्ये अतिशय गोपनीय जागी दडी मारून बसलेल्या ओसामा बिन लादेन याचा अमेरिकन कमांडोंनी खात्मा केला. पाकिस्तानी हद्दीत जाऊन लष्कराचे मुख्यालय असलेल्या कुंपणानजीक ही कारवाई झाली. पण पाक पोलीस, प्रशासन व हेरखात्याला गाफील ठेवून ही नुसती कारवाई झाली नव्हती. ती माहिती पाकला संपूर्ण अंधारात ठेवून अमेरिकन हेरखात्याने मिळवली होती. त्यासाठी पाकिस्तानात ज्या अमेरिकन मदतीवर चालणा‍ºया स्वयंसेवी संस्था आहेत, त्यांचा बिनधास्तपणे वापर करण्यात आला होता. ओसामा कुठे लपलाय हे पाक प्रशासनाला माहीत होते. त्यांनीच अतिशय गोपनीय जागी त्याला लपवले होते. पण अमेरिकन मदतीवर चालणा‍ºया विविध मानव कल्याण संस्थांच्या पाकिस्तानी शाखांचा त्यासाठी सीआयए या हेरखात्याने वापर केलेला होता. म्हणजे अबोटाबाद येथे ओसामा लपल्याची माहिती मिळाली म्हणून तिथे घरोघर जाऊन शोध घेणे शक्य नव्हते. त्यासाठी मग तिथे पोलिओने बालकांची जीव धोक्यात असल्याच्या आवया उठवण्यात आल्या. त्याचा बंदोबस्त करण्यासाठी मग स्थानिक प्रशासनाला पोलिओ लस टोचण्याचे काम हाती घेण्याचा निर्णय घेण्यास भाग पाडण्यात आले. तशी सज्जता स्थानिक प्रशासनाकडे नसल्याने ती जबाबदारी स्वयंसेवी संस्थांनी उचलली आणि घराघरात पोलिओ मोहीम राबवली गेली. त्यातला एक डॉक्टर अमेरिकन योजनेविषयी जाणून होता व ती मोहीम राबवित होता. त्याचे नाव डॉक्टर शकील आफ्रिदी असे आहे. पोलिओ लस देण्याच्या बहाण्याने ओसामाची माहिती पोहोचवली गेली. त्याच आधारावर मग ओसामाला संपवण्याची मोहीम आखली गेली. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष ओबामा आणि त्यांचे सहकारी व्हाईट हाऊसमध्ये बसून हे सारे बघत होते. पण काही मैलावर असलेल्या पाक सेनाप्रमुखांना त्याचा थांगपत्ताही नव्हता. इतकी नेमकी माहिती स्वयंसेवी संस्थांनी आपल्या देशाची गुपिते फोडून अमेरिकेला पुरवली होती. ओसामा मोहिमेविषयी बोलताना अमेरिकेचे संरक्षणमंत्री लिओन पेनेटा यांनी त्याचा जाहीर उल्लेख केला आणि बिचारा डॉ. शकील आफ्रिदी आपल्या मायभूमीत देशद्रोही ठरला. पोलिओ मोहीम कशी योजण्यात आली आणि स्वयंसेवी संस्थांना हेरगिरीच्या कामाला कसे जुंपण्यात आले, हे यावेळी स्पष्टपणे सांगण्यात आले. त्यामुळे पाकमध्ये अमेरिकन पैशांवर समाजसेवा करणा‍ºया बहुतांश संघटनांचा मुखवटा गळून पडला. अमेरिकन अनुदान व देणग्या घेणा‍ºया संस्था व व्यक्ती भले सामान्य माणसांच्या कल्याणाचा आव आणत असतील, पण त्यांना मिळणारे अनुदान व देणग्या अमेरिकन हेरगिरीला उपयुक्त ठरण्यासाठीच असते. आज तो डॉ. आफ्रिदी गजाआड आहे.

स्वयंसेवी किंवा जनहित म्हणून कार्यरत असलेल्या संस्थांनी अशाप्रकारे परदेशी हेरसंस्थेसाठी काम करावे काय? आपल्याच देशातल्या सरकारला गाफील वा अंधारात ठेवून सरकारी योजना वा धोरणांना सुरूंग लावण्याचे हे कृत्य मानवी हिताशी निगडीत आहे काय? भारतातही कित्येक कोटी डॉलर्स विविध जनहित योजनांच्या नावाखाली येत असतात. हे कल्याण साधतांना अशा लोकांनी केलेले उपद्व्याप बघितले, तर त्यामागचा खरा हेतू लपून राहत नाही. यातल्या बहुतांश संस्था सरकार वा सरकारी धोरणाच्या विरोधात उचापती करताना दिसतील. त्यांना अमेरिकन संस्थांनीच कोट्यवधी रकमा का द्याव्यात? त्याचा अमेरिकन हेरखात्याला कोणता फायदा होणार आहे? आज पाकिस्तानची गोष्ट वेगळी आहे, पण भारतातही अमेरिकेच्या मदतीवर चालणा‍ºया अनेक स्वयंसेवी संस्था आहेत. दिल्लीतील शेतकरी आंदोलनात आणि जंतरमंतरच्या झुरळांच्या आंदोलनातही हे दिसून आले. त्या काही भारतविरोधी कृत्य करत नाहीत ना हे तपासावे लागेल. लाखो डॉलर भारतीय संस्थांना समाजकल्याणासाठी देण्याइतकी अमेरिका उदार आहे काय? त्यामुळे स्वयंसेवी संस्थांवर लक्ष ठेवणे हितकारक आहे. पाकिस्तानात घुसून अमेरिकेला घातक असलेला ओबामा उडवणारी अमेरिका मात्र या स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने भारताचा घात करू शकते. त्यामुळे २६/११ सारखे हल्ले अशा लोकांमुळे झाले नाहीत ना हे तपासावे लागेल.

दशक तिसरा : समास दहावा : वैराग्य निरूपण


दासबोधातील स्वगुणपरिक्षानामक तिसºया दशकातील दहाव्या समासात समर्थ वैराग्याचे निरूपण करतात. इथे समर्थ सांगतात की, हा संसार म्हणजे महापूर आहे. त्यात असंख्य जलचर आहेत. संसारात पडलेल्या जीवांना विषारी काळसर्प दंश करायला धावतात म्हणून मृत्यू केव्हा येईल याचा नेम नसतो. आशा व ममता या सूक्ष्म देहाच्या बेड्या आहेत, स्थूल देहाशी त्याला जखडून ठेवतात. पाण्यामधील सुसरी देहाचे लचके तोडतात व देहाला दु:ख देतात. त्याचप्रमाणे आशा व ममता जीवाला दु:खाच्या संकटात टाकतात. देहाभिमानरुपी मगर जीवाला बुडवून पाताळात नेतो, दृशाच्या नादी लावून भगवंतापासून दूर नेतो. तेथून प्राण्याची सुटका होत नाही, दृश्याचे खरेपण सुटत नाही. कामवासनेची मगरमिठी सुटत नाही, कामवासना मनातून जाता जात नाही. तिरस्काराची वृत्ती जात नाही, दुसºयाला तुच्छ करण्याची सवय मोडत नाही. मद व मत्सर हे विकार कमी होत नाहीत, माणूस एक प्रकारच्या मोहीत अवस्थेत असतो. वासनेची धामण गळ्यात पडते, जीवाला वासना आवरण घालत. तेथे वेटोळे घालून ती विष ओकते, जीवाला निरंतर असमाधानी, अस्वस्थ ठेवते आणि वारंवार भयंकर जीभ बाहेर काढून छळीत असते, जीवाला सदा भीती व चिंता करायला लावून छळते. डोक्यावर प्रपंचाचे ओझे घेऊन माणूस ‘माझे माझे’ म्हणत राहतो, जे खरे आपले नाही ते आपले म्हणून माणूस त्याची जबाबदारी आपल्या अंगावर घेतो. बुडत असून सुद्धा कुळाचा अभिमान धरून तो ते ओझे सोडीत नाही. आयुष्य वाया जात असून, देखील माणूस प्रपंचाचे माझेपण सोडीत नाही.

स्वामी सांगतात की, जे भाविकपणाने भगवंताला शरण जातात ते मोठे दैववान समजावेत, कारण त्यांना स्वानंद भोगायला मिळतो. अशांना संसारदु:ख बाधत नाही. भाव आणि भावार्थ हे दोन शब्द भक्तिवाङ्मयात वरवर येतात. भाव हा शब्द मुळ भू धातूपासून बनतो. भू म्हणजे होणे किंवा असणे. भाव म्हणजे अस्तित्व. भावार्थ म्हणजे वस्तूच्या अस्तित्वामध्ये अंतर्भूत असलेला अर्थ. ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल नि:शंक असणे हा भाव. ईश्वर आहे ही जाणीव ठेवून, ही जागृत भावना ठेवून वागणे हा भावार्थ होय. भाव असला म्हणजे ईश्वराच्या अस्तित्वाची खूण पटलेली असते. भावार्थ असला म्हणजे आचार, विचार व उच्चार यामध्ये ईश्वराच्या अस्तित्वाचे प्रतिबिंब दिसते. भक्ती शब्द भज धातूपासून बनतो. भज म्हणजे सेवा करणे, पूजा करणे, मनाने चिकटणे, आपलेसे करून घेणे, भक्ती म्हणजे अंत:करणाची तदाकारता. ईश्वराची भक्ती म्हणजे ईश्वरविषयक रती अथवा प्रेम होय. त्यामध्ये अंत:करण भगवदआकार धारण करते. भगवंत सच्चिदानंदस्वरूप असल्याने भक्तिदेखील परमानंदस्वरूप असते. ज्याच्या मनामध्ये भाव असतो तो भाविक आणि भाव असून प्रेम असते तो भक्त होय. अंत:करण अशुद्ध व अपवित्र झाले की, भाव मंद होतो, ईश्वराचे अस्तित्व मलिन होऊन जाते.


आरशात आपले प्रतिबिंब दिसते. पाहणारा जसा असतो तसेच ते हुबेहूब दिसते. प्रतिबिंब कसे दिसावे याचे मर्म आपल्याजवळ असते. आपण जशी हालचाल करतो तसेच प्रतिबिंब आरशात दिसते. जसा ज्याचा भाव असतो त्या भावाचे प्रतिबिंब असा त्याचा देव होतो. जो ज्या मानाने भगवंताच्या अंकित होतो त्याच प्रमाणात भगवंत कृपा करतो. भावाने परमार्थाचे मार्ग भक्तीच्या बाजारपेठेपर्यंत नेऊन पोहोचवितात. त्या बाजारात संतजनांच्या समुदायामध्ये मोक्षाच्या चव्हाट्यावर गर्दी जमते. म्हणजे शुद्ध भाव असेल तर परमार्थाचे साधन बरोबर होते आणि त्याचे पर्यवसान भगवंताच्या भक्तिमध्ये होते. असे पुरुष स्वत: तरून जगाला तारतात. भगवंत त्यांचा कैवारी असतो. त्याची कांस धरून ते स्वानंदसोहळा भोगतात. मानवी जीवन फार किमती आहे, ते वाया घालवू नये, त्याचे सार्थक व्हावे. ही नरदेहरुपी पेटी मिळाल्यावर तिच्यात ईश्वराला साठविले तरच तिचा खरा उपयोग केला. असे जे करीत नाहीत ते दुर्दैवी अभाविक नरदेह वाया घालवतात.

केव्हा कशी वेळ येईल याचा भरवसा नसतो. झाडावर राहणारे पक्षी क्षणभरांत जसे दाही दिशांना उडून जातात तसे जीवनात घडून येते. जो क्षण आलेला पाहिला तो लगेच आपल्या हातून सुटला व भूत काळात गेला. अशा रीतीने सबंध आयुष्य निघून जाते आणि मग देह पडला की खालच्या योनीत जन्म घेण्यावाचून गत्यंतर नसते. पूर्वकर्माच्या ऋणानुबंधाने प्रपंचातील माणसे एके ठिकाणी गोळा होतात, एका ठिकाणी जन्माला येतात, ती सर्वस्वी आपली मानणे हे पढतमूर्खाचे लक्षण आहे.


आपले म्हणून आलेले हे शरीर सुद्धा जर खरे आपले नाही तर मग इतरांची कथा काय? एका भगवंतावाचून खरोखर आपले कोणी नाही. भावबलाने त्याला घट्ट धरून ठेवावे.

आपल्या कधीही न भरणा‍ºया या पोटासाठी अनेक हलक्या लोकांची नोकरी आपल्याला करावी लागते, त्यांची स्तुतिस्तोत्रे गावी लागतात, त्यांच्यापुढे मोठ्या अदबीने वागावे लागते. मुद्दा असा की, जो पोटाला अन्न देतो त्याला आपले शरीर विकावे लागते. मग ज्याने आपल्याला जन्माला घातले त्याला विसरणे योग्य होईल काय?


अशा भगवंताला सोडून अविवेकी माणसे दृश्य भोगाच्या किंवा इंद्रिय सुखाच्या मागे लागतात. त्यांना कधीही समाधान मिळत नाही. आता श्रीसमर्थ वासनेचा स्वभाव सांगतात. वासना दृश्यावर चिकटते, प्रथम सुख देते पण अंती दु:खात लोटते. म्हणून दृश्याची आवड न ठेवता भगवंताची आवड धरावी. आतापर्यंत ग्रंथ म्हणजे ‘अथातो देवजिज्ञासा’ समजावा. श्रोत्याला भगवंताबद्दल जिज्ञासा निर्माण झाली. यानंतर भगवंत कसा आहे, तो कुठे राहतो, त्याची कृपा कशी करून त्याचे भजन कसे करावे वगैरे प्रश्नांची उत्तरे देण्यात मजा आहे. हे ऐकून भाविक श्रोता विचारतो की, स्वामी, सार्थक कसे घडेल? कोणत्या उपायाने यमलोक चुकेल? देव राहतो कुठे? मला तो कसा भेटेल? हा दु:ख मूळ संसार कोणत्या उपायाने तुटेल? अहो कृपामूर्ती! खात्रीने भगवंताची प्राप्ती होऊन माझी अधोगती चुकेल असा उपाय मला दीनाला सांगा.

हे श्रोत्यांचे बोलणे ऐकून वक्ता म्हणाला की, अगदी मनापासून एकनिष्ठा ठेवून भगवंताचे भजन करावे. त्याने आपोआप विनासायास समाधान लाभेल. श्री सद्गुरूचे चरण घट्ट धरले. त्याचा कंठ दाटून आला आणि डोळ्यांतून दु:खाश्रू गळू लागले. शिष्याचा असा अनन्यभाव पाहून सद्गुरूदाता मनापासून प्रसन्न झाला.


- प्रफुल्ल फडके/बोध दासबोधाचा


कुत्र्यांसाठी शौचालये कोणी बांधणार का?



या अग्रलेखाच्या मथळ्यात असलेल्या कुत्र्यांसाठी शौचालये कोणी बांधणार का? या प्रश्‍नावरून कोणाला हसू येईल कदाचित, पण आमचा हा अत्यंत प्रामाणिक आणि भाबडा प्रश्‍न तमाम नागरिकांना आहे. बारा वर्षांपूवी २ आॅक्टोबर २०१४ पासून स्वच्छ भारत अभियान सुरू झाल्यामुळे हा प्रश्‍न संपूर्ण भारतालाही करायला हवा आहे. राजकारण्यांकडून या प्रश्‍नाच्या उत्तराची अपेक्षाच नाही. पण सामान्य माणूस, सेवाभावी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवक यांच्यापैकी कोणी या प्रश्‍नाचे उत्तर देऊ शकेल काय?

हो, कुत्र्यांसाठी शौचालये कोणी बांधणार का? म्हणजे आम्ही ‘स्वच्छ भारत’ची मोहीम सुरू करायची. त्यासाठी रस्त्याच्या कडेला असणारे माणसांचे ढीग बंद करायचे आणि कुत्र्यांनी त्या ठिकाणी टेर घालून ठेवायचे. माणसांचा नियम कुत्र्यांना असायला काय हरकत आहे? अर्थात, ही कुत्री म्हणजे आम्ही भटकी, रस्त्यावरची उनाड कुत्री म्हणत नाही, तर पाळीव कुत्री. पाळीव कुत्र्यांबाबत आमचा हा प्रश्‍न आहे.


म्हणजे सकाळच्या वेळी, पहाटे आमचे राहणीमान खूप उच्च दर्जाचे आहे, हे दाखवण्यासाठी आपल्यापेक्षा दुप्पट वजनाचे कुत्रे साखळीला बांधून फिरायला अनेक जण घेऊन जातात. त्या पोसलेल्या कुत्र्यांनी खरोखरच ताकद लावली तर त्या मालकाला तो फरपटत नेऊ शकेल इतकी दणकट ती कुत्री असतात. पण ती बिचारी प्रामाणिक असल्यामुळे मालकाच्या ताब्यात स्वत:ला सोपवतात आणि त्याच्याबरोबर फिरायला बाहेर पडतात. खाल्ल्या अन्नाला जागणे म्हणजे काय, ते या कुत्र्यांमुळे समजेल. पण दुस‍ºया दिवशी काय हो? या खाल्ल्या अन्नाचा निचरा करण्यासाठी मालकाला रस्त्याच्या कडेला उभे राहावे लागते. आमच्या घरी शौचालये असल्यामुळे आमच्या घरातील सगळी शौचालयात जातात, पण आमची हौस भागवण्यासाठी आम्ही कुत्र्यांना रस्त्याच्या कडेला बसवतो का? म्हणजे हाही भाबडाच प्रश्‍न बरे का..

म्हणजे स्वच्छतेसाठी आम्ही विद्या बालनला घेऊन जाहिरात करतो. ‘असा तर आम्ही कधी विचारच केलेला नव्हता’, म्हणून वदवून घेतो. पण आता असाही विचार केला पाहिजे की, कुत्र्यांसाठी शौचालये कोणी बांधणार का? माणसांनी घाण करायची नाही. पण माणसाळलेल्या प्राण्यांची घाण कोणी काढायची?


सकाळी सकाळी अशी कुत्री फिरायला घेऊन जाणारे आणि त्यांचा प्रातर्विधी उरकण्यासाठी बाहेर पडणारे नागरिक सर्वत्र पाहायला मिळतात. ती कुत्री... म्हणजे त्यांना कुत्रा म्हटलेले त्यांच्या मालकांना चालत नाही. कारण त्याला नाव असते. मग अशा टॉमी, बॉबी, टायगर, मोती अशा कुत्र्यांना घेऊन त्यांचे मालक पहाटे बाहेर पडतात. त्या कुत्र्यांना दट्ट्या येईपर्यंत ती कुत्री भुईचा वास घेत राहतात. म्हणजे माणसांनी कुठली घाण केलेली नाही ना, हे पाहणार आणि स्वच्छ अशी जागा हुडकून पुढचे पाय ताठ करून मागच्या बाजूने शेपूट वर करून आपल्या मालकाच्या खाल्ल्या अन्नाला जागण्याची भूमिका इथे पूर्ण करणार. तोपर्यंत एका हातात साखळी पकडलेले मालक मोबाइलवर बोलत असतात किंवा वर्तमानपत्र वाचत या देशात किती घाणेरडे लोक राहतात, देश कसा अस्वच्छ करतात, अमेरिकेत असे नाही, असली काहीतरी चर्चा करतात.

बरोबरच आहे ते. अमेरिकेत असे नाहीच. इथे आम्ही देश स्वच्छ करण्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती करतो, त्यावर खर्च करतो, कारण इथल्या नागरिकांना मोकळा श्‍वास घेता आला पाहिजे. पण स्वत:च घाण करायची आणि त्याबाबत अनभिज्ञ असणारे नागरिक या देशात किती आहेत? अमेरिकेत शिस्त लावली म्हणून लोक स्वच्छ वागत नाहीत. स्वच्छता असली पाहिजे हे आपल्या मनात असले पाहिजे. पण आपले दार स्वच्छ आणि दुस‍ºयाच्या दारात जाऊन घाण करायची हा राजकारणाचा भाग आहे. हे राजकारण सामान्य, प्रतिष्ठित, सुशिक्षित म्हणवून घेणारे लोकही करतात याचे आश्‍चर्य वाटते.


केवळ मुंबईतच नाही, तर सगळीकडे सकाळच्या वेळी हे दृष्य दिसते. अशी कुत्री फिरायला नेणारे अनेक नेते, कार्यकर्तेही असतात. त्यांची ही जबाबदारी नाही काय? मग आता निवडणूक आयोगाने नवा कायदा केला पाहिजे, कायद्यात सुधारणा केली पाहिजे. ग्रामीण भागात शौचालये नसतील तर ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला उभे राहता येत नाही. त्यासाठी खोटे खोटे का होईना निदान छप्पर उभे करून, त्या शौचालयाचा वापर होत नसला तरी आपल्याकडे आहे हे दाखवण्याचा खटाटोप होतो. पण त्यामुळे निदान शौचालये उभी राहतात. शहरी भागात शौचालये भरपूर असली तरी कुत्र्यांसाठी शौचालये कुठे आहेत? म्हणून पालिकेच्या निवडणुकीला उभे राहण्यापूर्वी प्रतिज्ञापत्रात माझ्याकडे कुत्रा आहे की नाही? त्या कुत्र्यासाठी शौचाची व्यवस्था काय केली आहे, याचा तपशील घ्यावा. ज्याच्याकडे कुत्र्यासाठी शौचालय नाही त्याला नगरपालिकेची निवडणूक लढवता येणार नाही असे जाहीर करावे. अर्थात, त्यामुळे उघड्यावर शौचास बसणारी कुत्री बंद होण्यासाठी प्रयत्न होणार नाही, तर निवडणूक लढवण्यासाठी आमच्याकडे कुत्रा नाही अशा पाट्या कार्यकर्ते आपल्या दारावर लावतील तो भाग वेगळा. पण मग प्रश्‍न राहतोच की, कुत्र्यांसाठी शौचालये कोणी बांधणार का?

व्यवहारी शिक्षणाची गरज


शिक्षणातल्या सुधारणा करण्यासाठी सरकार सातत्याने नवनवीन प्रयोग करत असते. सरकार बदलले, मंत्री बदलले की हे बदल होत राहतात. विशेषत: सरकार बदलल्यानंतर काही सुधारणा लक्षणीय करण्याचा प्रकार केला जातो. पण, या सुधारणा केल्यानंतर त्याचा आढावा घेतला गेला का? २०१० मध्ये बाळासाहेब थोरात आणि नंतर शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी पहिली ते आठवीपर्यंत नापास न करण्याचा निर्णय घेतला. शासनाचा नेमका निर्णय आणि त्याचा परिणाम यात प्रचंड तफावत होती. परंतु त्यानंतर चार वर्षे सत्तेत असूनही तत्कालीन काँग्रेस सरकारने त्याचा आढावा घेतला नाही. आज परीक्षापद्धतीचा सराव नसलेले विद्यार्थी गळाला लागलेले आहेत. त्यामुळे या सुधारणांचे सिंहावलोकन होणे गरजेचे आहे. माध्यमिक शिक्षणात सध्या महाराष्ट्रात एका मोठ्या बदलाची आवश्यकता आहे. गेल्या काही वर्षांपासून अभ्यासक्रमात जे फेरफार केले ते केवळ काही खास विषय डोळ्यांपुढे ठेवून केले गेले असावेत. सध्याच्या अभ्यासक्रमातील गणित, सायन्स (फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायॉलॉजी) हे विषय सर्व विद्यार्थ्यांसाठी आहेत. कॉमन आहेत. पण सर्वांना डॉक्टर, इंजिनीअर वा तत्सम अभ्यासक्रम झेपणारे नाहीत. सर्व तिकडे जात नाहीत. जाऊ शकत नाहीत. सर्वांची क्षमता एक नाही. मग हा अट्टाहास कशासाठी? माध्यमिक शाळात विशेषत: आठवी ते दहावी आणि नंतर अकरावी-बारावी यात दोन अभ्यासक्रमांची गरज आहे. एक उच्चस्तर व दोन सर्वांना झेपणारा अभ्यासक्रम. निवडीचे स्वातंत्र्य अर्थात पालक-विद्यार्थ्यांना हवे. आज पुष्कळ शाळांत (विशेषत: इंग्रजी माध्यम) विद्यार्थ्यांचे आपोआप वर्गीकरण होते. जास्त वा भरपूर गुण मिळवणारे आणि अभ्यासक्रम न झेपल्याने कमी गुण मिळवणारे वा प्रसंगी अनुत्तीर्ण होणारे. काही शाळा कमी गुण मिळवणा‍ºया वा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष पुरवण्याऐवजी त्यांना वेगळ्या वर्गात बसवतात. काहींना आपला निकाल फार चांगला दाखवायचा असतो. हे अत्यंत चुकीचे आहे. सरकार त्याकडे लक्ष देत नाही. ज्यांना सायन्स, गणित आदी अभ्यासक्रम झेपत नाहीत, ते विद्यार्थी शाळेत रमू शकत नाहीत. आपण कमी पडतो अशीही त्यांची भावना होते. त्यामुळे त्यांची दांडीयात्रा सुरू होते. काही वर्षांपूर्वी दहावीसाठी पर्यायी असे भरपूर विषय होते. त्यात संस्कृतलाही पर्याय होता. गणित-सायन्सला होता, इंग्रजीला होता. काही शाळा प्रवेश देतानाच विद्यार्थ्यांची चाचणी घेऊन, कमी गुणवान विद्यार्थ्यांना प्रवेश देत नाहीत. त्यांना आपली शाळा शंभर टक्के निकाल मिळवणारी हुशार विद्यार्थ्यांची व गुणवानांची दाखवावयाची असते. पूर्वी संस्कृतला पाली-अर्धमागधी पर्याय होता. गणित-इंग्रजी न येणाºयांना वेगळे विषय निवडण्याची सोय होती. सध्या बी.ए., एम.ए. पदव्या विविध विषयांत घेता येतात, पीएच.डी. हव्या त्या मर्यादित विषयात करता येते. त्यामुळे आठवीनंतरच हवे ते वा पर्यायी विषय वा पर्यायी अभ्यासक्रम निवडण्याची सोय करणे ही गरज आहे. अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, संगीत इत्यादी घेऊन एम.ए. होता येते. मग गणित-सायन्स वा अवघड विषय बाजूला ठेवून वा न झेपणारा अभ्यासक्रम सोडून विद्यार्थी दहावी-बारावी का होऊ शकत नाहीत? राज्य सरकारने यात तातडीने लक्ष घालण्याची आणि शक्य तर येत्या शैक्षणिक वर्षापासूनही आवश्यक ते बदल करण्याची गरज आहे. भावी पिढीतील काहींवर गौणत्वाचा शिक्का मारणारी व त्यांना हवी ती संधी नाकारणारी शिक्षणपद्धती महाराष्ट्राने बदलायला हवी. काही विषयात अनुत्तीर्ण होणा‍ºया व गती नसणा‍ºयांना योग्य ती सोपी वा त्यांना झेपणा‍ºया विषयांचा अभ्यास करण्याची पर्यायी पद्धती उपलब्ध करून द्यायला हवी. बारावीनंतर पुष्कळ पर्याय आहेत. शिक्षणखाते-शिक्षणमंत्री वा सरकारने यावर शक्य तितक्या लवकर योग्य तो निर्णय घेतल्यास पुष्कळांचे भले होईल.

आज शालेय अभ्यासक्रमात उपक्रमांचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे. पण त्यातील भविष्यात उपयोगी पडतील असे उपक्रम कोणीच राबवताना दिसत नाही. कागदाच्या वस्तू, प्लॉस्टिकच्या वस्तू, ज्या पूर्वी सामान्य लग्नात रूखवतावर मांडायला केल्या जायच्या अशी तोरणे दहावीच्या विद्यार्थ्यांना करायला लावण्यात काय अर्थ आहे? कागदाचे डबे, कागदाचे फ्लॉवरपॉट तयार करा असे सांगून मुलांचा फार वेळ घेतला जातो. त्यापेक्षा कागदी पिशव्या तयार करणे, कागदी पाकिटे तयार करणे का शिकवले जात नाही? ते व्यवहारात उपयोगी पडणारे आहे. पुस्तकांना कव्हर कसे घालावे हे शाळेत शिकवले तर ते उपयुक्त होईल. पण अनावश्यक कागदकाम, विकतची रंगीत माती आणायला लावायचे त्याचे काहीतरी थातुर मातूर करायचे याला काय अर्थ आहे? रोजगार देणारे आणि व्यवहारात उपयोगी पडणारे शिक्षण देणे ही काळाची गरज आहे. त्यादृष्टीने सुधारणा महत्त्वाच्या आहेत. मोदी सरकारने गेल्या काही वर्षांत आत्मनिर्भर भारताची घोषणा केलेली आहे. स्टार्टअपसारखी दालने उघडली आहेत. अशा परिस्थितीत नवीन स्टार्टअपसाठी लागणारी ऊर्जा निर्माण करणारे शिक्षण असले पाहिजे. नव्या उद्योगांना कसले मनुष्यबळ आवश्यक पडणार आहे, नवनवीन प्रकल्पात कोणत्या नोकºया निर्माण होणार आहेत याचे शिक्षण देणारी यंत्रणा आणि अभ्यासक्रम निर्माण झाले पाहिजेत. बाजारपेठ शोधणारे शिक्षण दिले गेले पाहिजे. याकडे सरकारने विशेष लक्ष देण्याची गरज आहे. विशेषत: शिक्षणातून राजकारण दूर केले पाहिजे. शिक्षकांना आंदोलन करायला लागता कामा नये. त्यांनी शिक्षणाचेच कार्य केले पाहिजे तर विद्यार्थी चांगले घडतील.

Saturday, September 19, 2026

यूपीआयला सक्षम करणे काळाची गरज


आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये यूपीआयद्वारे २४,१६२ कोटी व्यवहार होतील, म्हणजेच दररोज सरासरी ६६ कोटींहून अधिक पेमेंट होतील. याच्या सेवा आता इतर ११ देशांमध्ये पोहोचल्या आहेत. भारतात तयार झालेली ही प्रणाली आता दैनंदिन गरज बनली आहे. आता आव्हान हे आहे की, नागरिकांना या सुविधेचा मोफत लाभ मिळत राहील याची खात्री करणे, तसेच ती सुरक्षित आणि विश्वसनीय ठेवण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देणे. यूपीआयवरील सेवा शुल्कावरील चर्चेकडे याच दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. यासंदर्भात, सर्वप्रथम सर्वसामान्य जनतेच्या चिंता दूर करणे महत्त्वाचे आहे. नवीन प्रणालीनुसार, बँक खात्यांमार्फत केलेले सामान्य यूपीआय पेमेंट ग्राहकांसाठी विनामूल्य असेल. कुटुंब किंवा मित्रांना पैसे पाठवण्यासाठी पाठवणाºयाला किंवा स्वीकारणाºयाला कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. विनामूल्य वापरासाठी कोणताही मासिक कोटा नाही. मोठी रक्कम पाठवण्यासाठी किंवा वारंवार पेमेंट करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. सुरक्षेच्या उद्देशाने व्यवहारांवर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. २,००० रुपयांची मर्यादा ही काही व्यापाºयांकडून आकारल्या जाणाºया शुल्काशी संबंधित आहे. नागरिकांसाठी असलेल्या विनामूल्य सेवेवर कोणतीही मर्यादा नाही.


त्यासाठी एक साधे उदाहरण आहे. एक व्यक्ती एका मोठ्या व्यापाºयाकडून १०,००० रुपयांचे रेफ्रिजरेटर खरेदी करते. दोघांचीही खाती भारतीय बँकांमध्ये आहेत. ग्राहकाचे अ‍ॅप पेमेंटची सूचना पाठवते. नॅशनल पेमेंट्स कॉपोर्रेशन आॅफ इंडिया ती सूचना बँकांमध्ये पोहोचवते. एक बँक ग्राहकाच्या खात्यातून पैसे वजा करते आणि दुसरी बँक ते व्यापाºयाच्या खात्यात जमा करते. हे अ‍ॅप संपूर्ण बँकिंग प्रणालीद्वारे पेमेंटची सोय करते. डिजिटल पेमेंट स्वीकारण्यासाठी व्यापाºयाला जे सेवा शुल्क द्यावे लागते, त्याला मर्चंट डिस्काउंट रेट म्हणतात. जर तो दुकानदार सूट मिळालेल्या श्रेणीत येत नसेल, तर १५ आॅक्टोबर २०२६ पासून खरेदीवर ०.४ टक्के एमडीआर, म्हणजेच ४० आकारला जाईल. त्या ग्राहकाला रेफ्रिजरेटरची किंमत १०,०००च राहील. दुकानदार तिच्या बिलात एमडीआर जोडू शकत नाही आणि अ‍ॅप कोणतेही छुपे शुल्क आकारू शकत नाही. या श्रेणीत, १,००,०००च्या खरेदीसाठी कमाल एमडीआर ३०० असेल. जर ग्राहकाने त्याच्या नातेवाइकाला १०,००० पाठवले, तर दोघांसाठीही शुल्क शून्य असेल.

म्हणजेच ग्राहकाच्या खरेदीवर, दुकानदाराच्या ४० एमडीआरमध्ये १८ टक्के जीएसटी, म्हणजेच ७.२० जोडला जाईल. एकूण खर्च ४७.२० होईल. पात्र दुकानदार या करासाठी इनपुट टॅक्स के्रडिटचा लाभही घेऊ शकतात. संपूर्ण १०,०००च्या पेमेंटवर अतिरिक्त १८ टक्के कर लागणार नाही. मीराचे यूपीआय व्यवहार शुल्क शून्य राहील. प्रश्न असा आहे की, यूपीआय शुल्क का लादण्यात आले? सुरुवातीला, लोकांना यूपीआय वापरण्यास प्रोत्साहित करणे हे प्राधान्य होते. यासंदर्भात सरकारी पाठिंब्याने मदत झाली. आता हजारो कोटींचे व्यवहार हाताळण्यासाठी, अधिक सक्षम सर्व्हर, सायबर सुरक्षा, फसवणूक प्रतिबंध आणि ग्राहक समर्थनावरील खर्च वाढला आहे. या गरजांसाठी वार्षिक अंदाजे २०,००० कोटी खर्च येतो. याला नियोजित तोटा मानणे चुकीचे ठरेल. रोख हाताळणीचा खर्च कमी झाल्यामुळे होणारी बचत आणि इतर संबंधित उत्पन्न यांचाही गणनेत समावेश केला पाहिजे. तथापि, बँकांचा नफा किंवा सरकारी पाठिंबा हे परिचालन खर्च नाहीसे करत नाहीत.


या चर्चेला राजकीय पैलूही आहे. १२ आॅगस्ट रोजी, वित्तविषयक संसदीय स्थायी समितीने विविध प्रकारच्या व्यवहारांवर आधारित शुल्कातून महसूल निर्मितीला पाठिंबा देणारा एक अहवाल स्वीकारला. उपस्थित असलेल्यांमध्ये काँग्रेसचे पाच खासदार होते. कोणीही आक्षेप घेतला नाही. समितीमध्ये यूपीआयला नियमित उत्पन्न म्हणून पाठिंबा देणे आणि बाहेर त्याला नागरिकांवरील भार म्हणणे हे विरोधाभासी आहे. अमेरिकेच्या दबावाच्या आरोपालाही पुराव्याची गरज आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने १७ आॅगस्ट २०२२ रोजी एक दस्तऐवज प्रसिद्ध केला, ज्यात यूपीआयच्या खर्च वसुलीवर चर्चा केली आहे. अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधींच्या २०२६च्या अहवालात भारताच्या प्रस्तावित मर्यादेवर आक्षेप घेण्यात आला आहे, जी यूपीआयमधील कोणत्याही एका नॉनबँक पेमेंट अ‍ॅपचा वाटा एकूण व्यवहारांच्या ३० टक्क्यांपेक्षा जास्त नसावा असे मर्यादित करते. यामुळे अ‍ॅपचा बाजारहिस्सा मर्यादित होतो, ग्राहकांच्या पेमेंटवर नाही. हा अहवाल यूपीआयद्वारे क्रेडिटआधारित पेमेंटवरील निर्बंधांनाही विरोध करतो. त्यात भारताने ०.४ टक्के शुल्क आकारण्याच्या कोणत्याही वचनबद्धतेचा उल्लेख नाही.

अमेरिकेचा आक्षेप हे सिद्ध करत नाही की, भारताचा निर्णय स्वत:च्या दबावामुळे घेतला गेला होता. त्याच अहवालानुसार, २०२५च्या अखेरीस, दोन अमेरिकी मालकीचे अ‍ॅप्स ८० टक्क्यांहून अधिक यूपीआय व्यवहार हाताळत होते. शून्य एमडीआरच्या काळात त्यांनी हे वर्चस्व मिळवले होते. एखाद्या अ‍ॅपला सर्वाधिक पेमेंट मिळते, याचा अर्थ असा नाही की, त्याला शुल्काचा सर्वात मोठा वाटा मिळतो. सुरुवातीच्या उद्योग अंदाजानुसार, एमडीआरपैकी अंदाजे ६० टक्के बँकांना, २५ टक्के अ‍ॅप कंपन्यांना आणि १५ टक्के मर्चंट पेमेंट प्रोव्हायडर्सना मिळतील.


आधी पाहिलेल्या ग्राहकाच्या उदाहरणाप्रमाणेच, रेफ्रिजरेटर खरेदीच्या रुपये ४०च्या शुल्कापैकी, बँकांना २४, अ‍ॅप कंपन्यांना १० आणि इतर संबंधित कंपन्यांना ६ मिळतील. येथे ग्राहक आणि दुकानदार या दोघांच्याही बँका भारतीय आहेत आणि त्यांचा वाटा सर्वात मोठा असेल. त्या पेमेंट व्हेरिफिकेशन, खाते हस्तांतरण आणि तक्रार निवारण हाताळतात. हे वाटे अंदाजित आहेत, परंतु ते या दाव्याला दुजोरा देत नाहीत की, अमेरिकन अ‍ॅप्सना शुल्काचा बहुतांश वाटा मिळतो. यूपीआयचे संचालन भारतीय नियामक देखरेखीखाली एनपीसीआयद्वारेही केले जाते.

दुकानदारांना यूपीआयच्या यशाबद्दल विश्वास आहे. जे असुरक्षित आहेत, त्यांची सोय सुनिश्चित करणे महत्त्वाचे आहे. सवलती आणि अनुदानित दरांसोबतच, एकूण एमडीआर संकलनाच्या पाच टक्के रकमेचा लहान दुकानदारांसाठी असलेला निधीही उपयुक्त ठरेल. शुल्काचे वाटप स्पष्ट असावे आणि नियतकालिक आढाव्यांमध्ये व्यावहारिक अडचणींवर लक्ष दिले जावे. नागरिकांना मोफत पेमेंटसाठी पुरेशी संसाधने मिळावीत, लहान दुकानदारांना संरक्षण मिळावे आणि संपूर्ण प्रणाली सुरक्षित असावी. यामुळे यूपीआयवरील लोकांचा विश्वास सतत वाढत राहील हे सुनिश्चित होईल.

दशक तिसरा : समास चौथा : स्वगुणपरीक्षा


समर्थ रामदास स्वामींनी दासबोधातील तिसºया दशकातील चौथ्या समासात स्वगुणपरीक्षेचे महत्त्व सांगितले आहे. हा समास जणू लोकसंख्या नियंत्रण, कुटुंब नियोजन या सुधारणेला प्रेरणा देणाराच आहे. लेकुरे उदंड झाली असे म्हणत पुष्कळ मुले झाली, पण घरात साठवून ठेवलेला पैसा संपला. खायला धड मिळेना, मुलांवर भीक मागण्याची पाळी आली. काही कडेवर बसणारी तान्ही, काही रांगणारी, अशी लहान मुले घरात खेळू लागली. मुलामुलींची घरभर नुसती गर्दी होऊन गेली. दिवसेंदिवस खर्च वाढत चालला. पैशांची आवक बंद पडली. मुली लग्नाच्या झाल्या. पण त्यांच्या लग्नासाठी जवळ पैसा उरला नाही. आईबाप पैसा बाळगून होते. त्यांच्यापाशी खूप द्रव्य होते. त्यामुळे त्याला लोकात मान होता, प्रतिष्ठा होती. लोकात वागताना पूर्वीच्या श्रीमंतीचा भ्रम त्याने अजून ठेवला होता. परंतु घरामध्ये पहिली सुबत्ता राहिली नव्हती. घरात दिवसेंदिवस दारिद्र्य येत चालले. अशा रीतीने घरप्रपंच वाढला, खाणारी माणसे वाढली. त्यामुळे त्याला दु:ख आणि काळजी वाटू लागली. मुली उपवर झाल्या, मुलांना मुली सांगून येऊ लागल्या. आता मुलामुलींची लग्ने केली पाहिजेत अशी परिस्थिती आली. जर मुले तशीच लग्नावाचून राहिली तर पुन्हा लोक नावे ठेवणार. लोक म्हणतील की, हे जन्मदरिद्री होते. मग यांनी इतक्या मुलांना जन्म तरी का दिला?


अशी लोकात आपली इज्जत जाईल, आपल्या वडिलांचे नाव जाईल. मग मोठी समस्या पुढे उभी राहते ती ही की, लग्नापुरते कर्ज देणारा कोण भेटेल? मागे ज्याच्याकडून कर्ज घेतले होते ते फेडले नव्हते. असे दु:खाचे आभाळ कोसळले. आपण अन्न खातो खरे, पण तेच आपल्याला खाते, म्हणजे खाल्लेले अन्न अंगी लागेनासे झाले. त्याचे मन रात्रंदिवस चिंतेने ग्रासले. लोकांत त्याची पत उरली नाही. घरातील चीजवस्तू गहाण पडली. तो म्हणू लागला देवा, आता दिवाळे काढण्याची वेळ आली.

मग काही चीजवस्तू मोडली, घरातील जनावरे विकली आणि व्याज देऊन काही रोकड पैसा उभा केला. अशा रीतीने कर्ज काढून लोकांत खोटा मोठेपणा मिरविला. त्याने वडिलांचे नाव राखले असे सर्व जण म्हणाले. पण कर्जाचा भार फार झाल्याने तो दोन वर्षे परदेशी गेला आणि कष्ट करून पैसा घेऊन आला. याप्रमाणे त्याला अतिशय कर्ज झाले. पैसा देणा‍ºयांनी त्याच्या भोवती गराडा घातला. तेव्हा त्याने परदेशी जाण्याचा निश्चय केला. दोन वर्षे तो परदेशात राहिला, त्याने हीन लोकांची नोकरी पत्करली, शरीराने अतिशय हाल काढले. परदेशात त्याने काही पैसा मिळविला, मग घराच्या माणसांकडे जीव ओढ घेऊ लागला. त्याने मालकाची परवानगी काढली आणि घराकडे जाण्यास निघाला.


घरी बायकोमुले त्याची आतुरतेने वाट बघतच होती. तो आल्याने त्यांना आनंद झाला. तो घरी आला तेव्हा घरातील माणसे अतियातना भोगीत असलेली व आतुरतेने वाट पाहात असलेली त्याला दिसली. ती म्हणत होती, देवा, कोणत्या कारणाने त्यांना परत येण्यास इतके दिवस लागले? आता आम्ही काय खावे, उपाशी तरी किती दिवस राहावे! देवा, अशा दरिद्री माणसाच्या संगतीस आम्हाला का ठेवलेस?

अशा रीतीने घरातील माणसे वाट पाहात असता तो एकाएकी त्यांना दिसला. बाबा, तुम्ही थकलात असे म्हणत मुले त्याच्याकडे धावत गेली. त्याला बघून बायकोलाही आनंद झाला. आपली दैना आता संपली असे ती म्हणाली. तेव्हा आपले पैशांचे गाठोडे त्याने तिच्या हाती दिले. घरातील सगळ्यांनाच आनंद झाला. हा आनंद चार दिवसच टिकला. पुढे लगेच कुरबुर सुरू झाली. घरातील माणसे म्हणू लागली की, हा आणलेला पैसा खर्च झाल्यावर आमचे हाल पुन्हा सुरू होतील. म्हणून त्याने जे द्रव्य आणले आहे ते इथेच ठेवावे आणि पुन्हा परदेशास जावे. आम्ही हे खाऊन संपविण्याच्या आत नवीन द्रव्य मिळवून घरी परत यावे.


त्याला धड विश्रांतीसुद्धा मिळाली नाही, लवकरच पुन्हा परदेशी जाण्यास निघावे लागले. प्रपंचातील सारी नाती केवळ सुखापुरती असतात. बायको आपल्यावर अत्यंत प्रेम करते हे खरे; पण तीही आपल्या स्वत:च्या सुखाकडे लक्ष देऊन असते. परदेशात त्याला फार दगदग झाली म्हणून विश्रांती घेण्यासाठी तो घरी आला. पण जरा थोडी विश्रांती घेतो न घेतो तोच पुन्हा जाण्याची पाळी आली. गाठोडे बांधले, सगळ्या मुलाबाळांना एकदा प्रेमाने पाहिले आणि तो मार्गाला लागला. आपल्या प्रारब्धात कुटुंबाशी एवढाच ऋणानुबंध आहे असा मनात विचार आला. त्याचा गळा दाटून आला. गहिवर आवरेना, बापलेकरांची ताटातूट होणार म्हणून त्याला फार दु:ख झाले. जर ऋणानुबंध असेल तर पुन्हा आपली भेट होईल. नाही तर हीच आपली शेवटची भेट समजावी असे बोलून तो घोड्यावर बसला.

कामवासनेच्या बळाने आपण चांगले वागलो नाही हे पटले. प्रपंचात सगळा स्वार्थाचा बाजार आहे हे लक्षात आले. माझे हितकर्ते मित्र मला लबाड वाटू लागले. म्हणून जी प्रापंचिक माणसे आईबापाशी भक्तिभावाने वागतात ती धन्य होत. आपल्या जिवलगांच्या बाबतीत ती आपले मन कठोर करीत नाहीत. या गोष्टी मी पूर्वी ऐकल्या होत्या. पण तारुण्याच्या मस्तीमध्ये त्या कळल्या नाहीत. ज्यांना मी आपले मित्र मानले ते लबाड होते. माझ्यापाशी असणा‍ºया पैशांच्या निमित्ताने ते माझ्याभोवती गोळा झालेले होते. आता काय वाटेल ते करावे परंतु द्रव्य मिळवून नेले पाहिजे. आपण मोकळे (द्रव्य न मेळविता) गेलो तरी तेथे सहजच दु:ख होणार. अशा प्रकारचे विचार त्याच्या मनात येऊ लागले. त्याचा जीव कष्टी झाला आणि तो चिंतेच्या महापुरात बुडून गेला. या विचारांच्या प्रभावाने आपला जन्म प्रपंचापायी फुकट गेला असे त्याला क्षणभर वाटले. पण लगेच ममत्वाचा जोर होऊन मुलेबाळे आठवली आणि तो मोठ्याने गळा काढून रडू लागला. पण तेथे अरण्यात कोण विचारणार! अशा रीतीने त्याच्या मनात त्याला पश्चात्ताप झाला. मुलींची व मुलांची त्याला आठवण झाली आणि अगदी मनापासून वाईट वाटले. आपलीं मुलेबाळे आपल्याला अंतरली असे तो म्हणाला. जे जे दु:ख त्याने पूर्वी भोगले होते त्याचे स्मरण त्याला होऊ लागले. मग मोठा लांब गळा काढून त्याने रडण्यास आरंभ केला. अरण्यात कोणी रडू लागला तर तेथे त्याचे सांत्वन करणारा कोणी भेटत नाही.


प्रफुल्ल फडके/ बोध दासबोधाचा