दासबोधातील स्वगुणपरिक्षानामक तिसºया दशकातील दहाव्या समासात समर्थ वैराग्याचे निरूपण करतात. इथे समर्थ सांगतात की, हा संसार म्हणजे महापूर आहे. त्यात असंख्य जलचर आहेत. संसारात पडलेल्या जीवांना विषारी काळसर्प दंश करायला धावतात म्हणून मृत्यू केव्हा येईल याचा नेम नसतो. आशा व ममता या सूक्ष्म देहाच्या बेड्या आहेत, स्थूल देहाशी त्याला जखडून ठेवतात. पाण्यामधील सुसरी देहाचे लचके तोडतात व देहाला दु:ख देतात. त्याचप्रमाणे आशा व ममता जीवाला दु:खाच्या संकटात टाकतात. देहाभिमानरुपी मगर जीवाला बुडवून पाताळात नेतो, दृशाच्या नादी लावून भगवंतापासून दूर नेतो. तेथून प्राण्याची सुटका होत नाही, दृश्याचे खरेपण सुटत नाही. कामवासनेची मगरमिठी सुटत नाही, कामवासना मनातून जाता जात नाही. तिरस्काराची वृत्ती जात नाही, दुसºयाला तुच्छ करण्याची सवय मोडत नाही. मद व मत्सर हे विकार कमी होत नाहीत, माणूस एक प्रकारच्या मोहीत अवस्थेत असतो. वासनेची धामण गळ्यात पडते, जीवाला वासना आवरण घालत. तेथे वेटोळे घालून ती विष ओकते, जीवाला निरंतर असमाधानी, अस्वस्थ ठेवते आणि वारंवार भयंकर जीभ बाहेर काढून छळीत असते, जीवाला सदा भीती व चिंता करायला लावून छळते. डोक्यावर प्रपंचाचे ओझे घेऊन माणूस ‘माझे माझे’ म्हणत राहतो, जे खरे आपले नाही ते आपले म्हणून माणूस त्याची जबाबदारी आपल्या अंगावर घेतो. बुडत असून सुद्धा कुळाचा अभिमान धरून तो ते ओझे सोडीत नाही. आयुष्य वाया जात असून, देखील माणूस प्रपंचाचे माझेपण सोडीत नाही.
स्वामी सांगतात की, जे भाविकपणाने भगवंताला शरण जातात ते मोठे दैववान समजावेत, कारण त्यांना स्वानंद भोगायला मिळतो. अशांना संसारदु:ख बाधत नाही. भाव आणि भावार्थ हे दोन शब्द भक्तिवाङ्मयात वरवर येतात. भाव हा शब्द मुळ भू धातूपासून बनतो. भू म्हणजे होणे किंवा असणे. भाव म्हणजे अस्तित्व. भावार्थ म्हणजे वस्तूच्या अस्तित्वामध्ये अंतर्भूत असलेला अर्थ. ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल नि:शंक असणे हा भाव. ईश्वर आहे ही जाणीव ठेवून, ही जागृत भावना ठेवून वागणे हा भावार्थ होय. भाव असला म्हणजे ईश्वराच्या अस्तित्वाची खूण पटलेली असते. भावार्थ असला म्हणजे आचार, विचार व उच्चार यामध्ये ईश्वराच्या अस्तित्वाचे प्रतिबिंब दिसते. भक्ती शब्द भज धातूपासून बनतो. भज म्हणजे सेवा करणे, पूजा करणे, मनाने चिकटणे, आपलेसे करून घेणे, भक्ती म्हणजे अंत:करणाची तदाकारता. ईश्वराची भक्ती म्हणजे ईश्वरविषयक रती अथवा प्रेम होय. त्यामध्ये अंत:करण भगवदआकार धारण करते. भगवंत सच्चिदानंदस्वरूप असल्याने भक्तिदेखील परमानंदस्वरूप असते. ज्याच्या मनामध्ये भाव असतो तो भाविक आणि भाव असून प्रेम असते तो भक्त होय. अंत:करण अशुद्ध व अपवित्र झाले की, भाव मंद होतो, ईश्वराचे अस्तित्व मलिन होऊन जाते.
आरशात आपले प्रतिबिंब दिसते. पाहणारा जसा असतो तसेच ते हुबेहूब दिसते. प्रतिबिंब कसे दिसावे याचे मर्म आपल्याजवळ असते. आपण जशी हालचाल करतो तसेच प्रतिबिंब आरशात दिसते. जसा ज्याचा भाव असतो त्या भावाचे प्रतिबिंब असा त्याचा देव होतो. जो ज्या मानाने भगवंताच्या अंकित होतो त्याच प्रमाणात भगवंत कृपा करतो. भावाने परमार्थाचे मार्ग भक्तीच्या बाजारपेठेपर्यंत नेऊन पोहोचवितात. त्या बाजारात संतजनांच्या समुदायामध्ये मोक्षाच्या चव्हाट्यावर गर्दी जमते. म्हणजे शुद्ध भाव असेल तर परमार्थाचे साधन बरोबर होते आणि त्याचे पर्यवसान भगवंताच्या भक्तिमध्ये होते. असे पुरुष स्वत: तरून जगाला तारतात. भगवंत त्यांचा कैवारी असतो. त्याची कांस धरून ते स्वानंदसोहळा भोगतात. मानवी जीवन फार किमती आहे, ते वाया घालवू नये, त्याचे सार्थक व्हावे. ही नरदेहरुपी पेटी मिळाल्यावर तिच्यात ईश्वराला साठविले तरच तिचा खरा उपयोग केला. असे जे करीत नाहीत ते दुर्दैवी अभाविक नरदेह वाया घालवतात.
केव्हा कशी वेळ येईल याचा भरवसा नसतो. झाडावर राहणारे पक्षी क्षणभरांत जसे दाही दिशांना उडून जातात तसे जीवनात घडून येते. जो क्षण आलेला पाहिला तो लगेच आपल्या हातून सुटला व भूत काळात गेला. अशा रीतीने सबंध आयुष्य निघून जाते आणि मग देह पडला की खालच्या योनीत जन्म घेण्यावाचून गत्यंतर नसते. पूर्वकर्माच्या ऋणानुबंधाने प्रपंचातील माणसे एके ठिकाणी गोळा होतात, एका ठिकाणी जन्माला येतात, ती सर्वस्वी आपली मानणे हे पढतमूर्खाचे लक्षण आहे.
आपले म्हणून आलेले हे शरीर सुद्धा जर खरे आपले नाही तर मग इतरांची कथा काय? एका भगवंतावाचून खरोखर आपले कोणी नाही. भावबलाने त्याला घट्ट धरून ठेवावे.
आपल्या कधीही न भरणाºया या पोटासाठी अनेक हलक्या लोकांची नोकरी आपल्याला करावी लागते, त्यांची स्तुतिस्तोत्रे गावी लागतात, त्यांच्यापुढे मोठ्या अदबीने वागावे लागते. मुद्दा असा की, जो पोटाला अन्न देतो त्याला आपले शरीर विकावे लागते. मग ज्याने आपल्याला जन्माला घातले त्याला विसरणे योग्य होईल काय?
अशा भगवंताला सोडून अविवेकी माणसे दृश्य भोगाच्या किंवा इंद्रिय सुखाच्या मागे लागतात. त्यांना कधीही समाधान मिळत नाही. आता श्रीसमर्थ वासनेचा स्वभाव सांगतात. वासना दृश्यावर चिकटते, प्रथम सुख देते पण अंती दु:खात लोटते. म्हणून दृश्याची आवड न ठेवता भगवंताची आवड धरावी. आतापर्यंत ग्रंथ म्हणजे ‘अथातो देवजिज्ञासा’ समजावा. श्रोत्याला भगवंताबद्दल जिज्ञासा निर्माण झाली. यानंतर भगवंत कसा आहे, तो कुठे राहतो, त्याची कृपा कशी करून त्याचे भजन कसे करावे वगैरे प्रश्नांची उत्तरे देण्यात मजा आहे. हे ऐकून भाविक श्रोता विचारतो की, स्वामी, सार्थक कसे घडेल? कोणत्या उपायाने यमलोक चुकेल? देव राहतो कुठे? मला तो कसा भेटेल? हा दु:ख मूळ संसार कोणत्या उपायाने तुटेल? अहो कृपामूर्ती! खात्रीने भगवंताची प्राप्ती होऊन माझी अधोगती चुकेल असा उपाय मला दीनाला सांगा.
हे श्रोत्यांचे बोलणे ऐकून वक्ता म्हणाला की, अगदी मनापासून एकनिष्ठा ठेवून भगवंताचे भजन करावे. त्याने आपोआप विनासायास समाधान लाभेल. श्री सद्गुरूचे चरण घट्ट धरले. त्याचा कंठ दाटून आला आणि डोळ्यांतून दु:खाश्रू गळू लागले. शिष्याचा असा अनन्यभाव पाहून सद्गुरूदाता मनापासून प्रसन्न झाला.
- प्रफुल्ल फडके/बोध दासबोधाचा
No comments:
Post a Comment